Monday, 11 July 2016

जावळीच्या निसर्गलंकेचे विजयपर्व.....!!!

हिंदवी स्वराज्य !!! शिवछत्रपतींच्या जनमानसास भोवून टाकणाऱ्या लढवय्या व प्रेरक आयुष्याच्या कर्मगाथेच्या भागीरथीचा उगम ह्या दोन शब्दांत दडलेला आहे.हिंदवी स्वराज्य नावाच्या हिमनगातून निघणारा निर्मल जलप्रवाह पुढे विशालकाय भागीरथीचे रूप घेऊन गुलामीच्या साखळदंडाने जखडलेल्या भारतीयांची न्याय,सुबत्ता,शांती,सुख व संपन्नतेची तहान शमवणारे स्वप्नचित्र इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभे करतो.शिवचरित्राचे मनन-चिंतन आत्म्याविश्वात सुरु झाले की अत्याचाराने पिडलेल्या,दबल्या-दबल्या-पिचल्या समाजासाठी जणू समग्र कल्याणाची भागीरथी मागे घेऊन समोर धावणारे शिवछत्रपती त्रैलोक्यमंडळ हलवून टाकण्याइतके उत्साहाचे भरते देऊन जातात.

हिंदवी स्वराज्यस्थापनेचे आयाम आपल्या कल्पनाशक्तीपेक्षा ऐतिहासिक,सामाजिक तसेच पौराणिकदृष्ट्या फार मोठे आहेत.सनातन हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार सुरु असलेल्या कलीयुगामध्ये म्लेंच्छचेच अधिराज्य होईल,अत्याचार,अनाचार,अनीती व अधर्माचे अवडोंबर चहूदिशांनी पसरेल अशी काही "पुराणे?" वर्णन करतात.वेद,उपनिषद किंवा महाभारतात कलियुगाची कल्पना रंगवलेली नसली तरीही वायू,गरुड किंवा लिंगपुराणामध्ये कलियुगाचे अत्यंत निराशावादी चित्र रंगवलेले आपल्याला दिसून येते.निराशावादी विचारांचा दुष्प्रचार काही पुराणांच्या(?) माध्यमातून झाल्याने वा त्याचे चुकीच्या पद्धतीने विवेचन केले गेल्यामुळे निष्क्रियतेची छाया शिवपूर्वकाळात संपूर्ण समाजावर पसरली होती.जातीवर्णभेदासोबातच धर्म नावाच्या विचारशक्तीसोबत रूढ झालेल्या अशा बुरसट संकल्पना सज्जनांच्या निष्क्रियतेच्या कारण बनल्या.विश्वकल्याणाचे अमृत देणाऱ्या हिंदू धर्माच्या ग्रंथांचे व संदेशांचे तार्किक विवेचन न होता धर्मकपिलेच्या अंगास चिकटलेले काही गोकरूही आपण रुद्राक्ष समजून पूज्य मानले.विश्वाच्या अंतरंगात टिकून राहण्यासाठी जसे प्रत्येक भौतिकी वस्तू,समाज व विचाराला परीवर्तनशीलतेची गरज असते तसेच धर्मही परिवर्तनशीलतेच्या चक्रव्यूहातून मुक्त नाही.एकीकडे पापशक्ती व अनाचार कलियुगात वाढीस लागणार,आता आशा,प्रेरणा,शांती व सुखास जागा नाही अशी पोपटपंची करणारे स्वघोषित "धर्मपंडित" हिंदू समाजाला निराशावादाच्या तळ नसलेल्या विहिरीत ढकलण्याचे काम जणू त्यांना श्रीविष्णूनेच प्रगट होऊन स्वप्नसाक्षात्कार दिला आहे अशा उत्साहाने करत असताना शिवछत्रपतींचे "हे राज्य व्हावे हे श्रींचे मनी फार आहे" असे साक्षात सरस्वतीबोल धर्माच्या नावाखाली रूढ झालेल्या चुकीच्या संकल्पनाना छेद देतात आणि धर्मही परिवर्तनशील असू शकतो ह्या दाव्यास चुकीच्या रूढींना धक्का देऊन हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेने बळ देतात.देवत्वाचा कारुण्यमय अंश प्रत्येक मानवदेही वसतो अशी आपली हिंदूधर्मीयांची श्रद्धा आहे.छत्रपतींच्या मुखाद्वारे बाहेर पडलेली ही देववाणी ह्याच देवत्वाच्या अंशाचे प्रतिक आहे.हाच प्रत्येकाच्या ठायी वसणारा देवत्वाचा अंश आपल्याला धर्माच्या संदेशांमध्ये काळ व परिस्थितीरूप बदल करण्याचा अधिकार देतो.धर्म नावाचे "पुष्पक' विमान हे नेहमी आशावादाच्या वैकुंठाकडे प्रवास करते निराशावादाच्या नरकसाम्राज्याकडे नाही असा विचार दृढ करूनच धर्मावर श्रद्धा ठेवा.धर्म नावाचा विचार डोळे बंद करून मनन करण्यासाठी नव्हे तर उघड्या डोळ्यांनी अर्जित करण्याकरिता आहे हे सदैव ध्यानी असू द्या.हिंदवी स्वराज्यस्थापनेचे ऐतिहासिक,सामाजिक व पौराणिक आयाम अजून सखोलतम अभ्यासाने समजावून घ्या.

इ.स.१६५५ साली शहाजीराजांची रवानगी पुन्हा कर्नाटक प्रांतात झाली आणि ६ वर्षांपासून शिवछत्रपतींची स्वराज्यविस्ताराच्या आघाडीवर होणारी कुचंबणा थांबली.छत्रपती श्रीरामसेनेने रामसेतू बांधताना दाखवलेल्या उत्साहाच्या तोडीस तोड उत्साहाने स्वराज्यविस्ताराचे आराखडे बांधू लागले.शहाजीराजे कर्नाटकात रवाना होताच छत्रपतींची नजर हिंदवी स्वराज्याच्या दक्षिण-पश्चिमेस असलेल्या दुर्गम,दुर्घट पण नैसर्गिक संपन्नतेची कुबेरनगरी असलेल्या जावळी प्रांतावर येऊन खिळली.जावळीचे मोरे घराणे आदिलशाहीचे पिढीजात मातब्बर वतनदार होते.८-१० पिढ्या सत्ताविलास भोगून अकुत धनसंपत्तीचे धनी झालेल्या मोऱ्यांचा मुलुखही थोडाथोडका नव्हता.महाडपासून महाबळेश्वरपर्यंतचा डोंगरी मुलुख तसेच बव्हंशी सुभे सातारा मोऱ्यांच्या अधिपत्याखाली होता.सह्याद्रीच्या निसर्गसाम्राज्यात मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे मोऱ्यांची जावळी वाईचा सुभा,सह्याद्रीविश्व व पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर बळाच्या अधिकाराने अधिसत्ता गाजवत होती.जावळीचे महत्व हेरूनच दूरदृष्टीने शिवछत्रपतींनी इ.स.१६४७ मध्ये माणकाईने दत्तक घेतलेल्या कृष्णाजी बाजी चंद्ररावास विजापूरच्या नाराजीचा धोका पत्करून नुसत्या जावळीच्या सिंहासनावर नव्हे तर एकप्रकारे शक्तीतख्तावर बसवले.शिवछत्रपतींची जावळी मोहिमेची समरगाथा ग्रहण करण्याआधी जावळी स्वारीची पार्श्वभूमी अर्जित करणे अगत्याचे आहे.कृष्णाजी बाजी चंद्ररावावर निकडीच्या समयी केलेल्या उपकारक कृत्यामुळे चंद्रराव स्वराज्याचे सवंगडी होतील आणि हिंदवी स्वराज्यवृक्ष संवर्धन व वाढीस मोऱ्यांच्या सहकार्याचे खतपाणी लाभेल अशी छत्रपतींची अपेक्षा होती.परंतु क्लिष्ट,चंचल मनुष्यस्वभावाचे उत्तम उदाहरण पेश करून चंद्रराव मोऱ्याने लवकरच महाराजांशी उघडपणे शत्रुत्व आरंभिले.चंद्ररावाची मोरे घराण्याच्या वैभववृद्धीची महत्वाकांक्षा उपकारांच्या मर्मबंधांना चिरडून हिंदवी स्वराज्याच्या क्रांतीसूर्यास राहूकाळाचे ग्रहण लावण्याचे वेध घेऊ लागली.मोऱ्यांच्या गादीवर ताख्नाशीन झाल्यावर चंद्ररावाची मनस्थिती पालटल्यामुळे उदयोन्मुख व वर्धिष्णू हिंदवी स्वराज्यसत्तेचे अभिमानी व अहंकारी मोऱ्यांच्या सत्तासंग्रहाशी खटके उडण्यास सुरुवात झाली.


कृष्णाजी चंद्ररावाने आपली आदिलशाहशी अखंडित निष्ठा जाहीर करून जुलूम-जबरदस्ती करण्यास सुरुवात केली व चंद्ररावाचे शिशुपालप्रताप गुन्हे स्वराज्यकार्यात हरतऱ्हेने अडथळा आणण्याचा प्रयत्न करू लागले.मोऱ्यांचे बळही थोडेथोडके नव्हते.१०-१२ हजार मातब्बर फौज पदरी होती तसेच परंपरागत सत्ताउपभोगाने जावळीची मोऱ्यांची मसनद प्रचंड सामर्थ्याची धनी झाली होती.हातातील सत्तासूत्राच्या बळकटीनेच शिरजोर झालेला चंद्रराव आता उपकारकर्त्याचेच सत्तासमीकरण बिघडवण्याचे स्वप्न बघत होता. बिरवाडी भागातील काही गावांचा अधिकार बाजी पाटील व मालोजी पाटलांकडे होता,पण चंद्ररावाने सत्तालालसेने ग्रहित होऊन फौजेबळाने त्यांना हुसकावून लावले व ती गावे स्वतः बळकावली.चंद्ररावाच्या शकुनी अन्यायाने परागंदा झालेले बाजी व मालोजी इ.स.१६५१-५२ च्या सुमारास महाराजांच्या आश्रयास आले व त्यांनी महाराजांना त्यांच्यासोबत न्याय करण्याची विनंती केली.निव्वळ सत्तालोलुपतेमुळे चंद्ररावाने गावे बळकावल्याचे लक्षात घेऊन महाराजांनी बाजी व मालोजी पाटीलांची हिंदवी स्वराज्यसमर्थनाने गावांच्या अधिकारावर पुनर्स्थापना केली आणि पुढे जाऊन हिंदवी स्वराज्य-मोऱ्यांच्या संघर्षवणव्याचे रूप घेणारी पहिली ठिणगी पडली.स्वराज्यातील मुसेखोऱ्याचा गावकुलकर्णी रंगो त्रिमल वाकडे याने एका विधवेशी सिंदळकीचा गुन्हा केला व छत्रपतींच्या न्यायदंडकास घाबरून प्राणभयाने तो चंद्ररावाच्या आश्रयास आला.चंद्ररावानेही अकारण स्वराज्यास वाकुल्या दाखवायची अभिलाषा धरून रंगो त्रिमलास अभयदान दिले व छत्रपतींचा रोष ओढवून घेतला.हिंदवी स्वराज्याच्या प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत चाललेल्या स्वप्नवत वैभवाने चिंतीत होऊन चंद्ररावाने थेट आता स्वराज्यावर आक्रमणाचे शस्त्र उगारले.चिखलीचा रामाजी वाडकर व चंद्ररावाचे कर्ण-अर्जुनाप्रत हाडवैर होते.पुढे वैरभावातूनच बलदंड राजसत्तेचा मनमानी वापर करून चंद्ररावाने रामाजीस ठार केले.रामाजीचा पुत्र लुमाजी प्राणभयाने स्वराज्याच्या हद्दीत येणाऱ्या रोहिडखोऱ्यातील पलसोसी गावास आश्रयी आला तेव्हा चंद्ररावाने लुमाजीचा पाठलाग करीत उघडपणे स्वराज्यात घुसून लुमाजीची हत्या केली.स्वराज्यास हरप्रकारे नारमोहम करण्याची अढी पक्की मनात बांधून बसलेला चंद्रराव आता बळासोबतच भेदनीतीच्या आकडीनेही हिंदवी स्वराज्याचे सौंदर्यविश्व व संघटीत स्वराज्यशक्ती छीन्नविछीन्न करण्याचा प्रयत्न करू लागला.गुंजणमावळच्या देशमुखीबद्दल शिंदे-शिलिमकर व चोरघे यांचा तंटा होता.हिंदवी स्वराज्याच्या सत्तापर्वात शिलिमकरांचा पक्ष दुर्बळ तर बळजोरीने चोरघे शिरजोर होऊन गुंजणमावळच्या देशमुखीवर आपला हक्क सांगू लागले.खेडेबाऱ्याच्या कोंडे-देशमुखांनीही आयत्या जळीत सरपणावर भाकऱ्या भाजण्यासारखे प्रताप करून गुंजणमावळच्या देशमुखीवर आपला मालकीहक्क सांगण्यास सुरुवात केली.परंतु गुंजणमावळच्या देशमुखीच्या अधिकारसंघर्षात सर्व दावेदारांवर संधिसाधू धूर्तशिरोमणी चंद्ररावाने वरचढ ठरून घाटावरील देशमुखी मोऱ्यांचीच असल्याचे जाहीर केले.गुंजणमावळच्या सत्तासंघर्षात महाराजांनी शिलिमकरांचा पक्ष उचलून धरला.शिलिमकर स्वराज्याचे एकनिष्ठ सरदार होते.फतहखानाचे आक्रमण स्वराज्यावर झाले असता शिलिमकरांनी प्राणपणाने लढून स्वराज्यसेवेचे कर्तव्य पर पाडले होते.शिलिमकर हे स्वराज्याचे शिलेदार असले तरी जावळीच्या मोऱ्यांशी त्यांचा रक्तसंबंध होता.चंद्रराव हे शिलिमकरांचे मामा होते.महाराजांच्या पक्षाचे दावेदार असलेल्या शिलिमकराना चंद्ररावाने रक्तसंबंधांचे फासे वापरून विचलित करण्यास सुरुवात केली.महाराज तुमचे अहित चिंतितात,तुमच्या वकुबाचा वापर करून पुढे स्वतः महाराज गुंजणमावळची देशमुखी बळकावतील अशा कलीचा संचार चंद्ररावाने काही लोकांकरवी शिलिमकरांच्या मनात केला.चंद्ररावाच्या भेदयुक्तीने भ्रमित होऊन शिलिमकरांनी चंद्ररावाची कास धरली व शिलिमकर “शकजादे” झाले.महाराजांना झाल्या प्रकाराचे यथासांग इतिवृत्त कळताच शिलिमकरांसारखे इमानी स्वराज्यसेवक भ्रमित झाल्याचे बघून अस्वस्थ झालेल्या महाराजांनी शिलीमकरांना इ.स.१६५५ मध्ये तातडीचे अभयपत्र रवाना केले.हैबतराव शिलिमकरांना महाराजांनी महादेवाची व आऊसाहेबांची आण घेऊन पुन्हा विश्वासात घेतले व स्वराज्यसूत्रात बांधले.मस्तवाल,शिरजोर मोऱ्यांच्या हरामखोरीने झाल्या प्रकरणात डीचवल्या गेलेल्या महाराजांनी चंद्ररावाला जरबेचे पत्र पाठवले.मोऱ्यांची स्वराज्यातील लुडबुड व बदअंमल थांबला नाही तर जावळी मारून चंद्ररावास कैद करण्याची चेतावनीही दिली,पण मद्याच्या नशेने मदमस्त झालेल्या गजाप्रमाणे सत्तेचा व बळाचा सोमरस आकंठपणे उपभोगीत करून मस्तवाल झालेल्या चंद्ररावाने “तुम्ही राजे काल जाहला.तुम्हास राज्य कोणे दिधले?मुस्तकद राजा आपले घरी म्हटल्यावर कोण मानितो?येथे उपाय कराल तर तो अपाय होईल.यश न घेता अपयशास पात्र होऊन जाल” असा उर्मट व उन्मत्तपणाचा जवाब महाराजांना दिला.सामोपचाराचा शेवटचा प्रयत्न म्हणून महाराजांनी चंद्ररावास अखेरचे निर्वाणीचे पत्र लिहिले.शरण येण्याचा पर्याय स्वीकारून भविष्यात होऊ घातलेला रक्तपाताचा युद्धअध्याय टाळायची संधी महाराजांनी मोऱ्यांना देऊ केली.शरण न आल्यास “मारले जाल” अशी सुस्पष्ट व खुली चेतावनीही दिली,पण आपल्याच राजसत्तेच्या धुंदीत असलेल्या चंद्ररावाने महाराजांना झिडकारले व हिंदवी स्वराज्य-जावळीसत्ता संघर्षवणव्याने पेट घेतला.


सामोपचाराने आता प्रकरण मिटत नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसत असल्याने अंगात रणचंडीचा संचार झालेल्या शिवछत्रपतींनी जावळी स्वारीची जोरकस तयारी आरंभली.शहाजीराजे तसेच वाईचा सरसुभेदार अफझलखानाची मोठ्या फौजेसाहित कर्नाटकात रवानगी झाल्याने आदिलशाही दरबाराचे सारे लक्ष दक्षिणेवर खिळले होते.त्यातच मुहम्मद आदिलशाह गंभीर दुखण्याने शेवटच्या घटका मोजत असल्याने आदिलशाही दरबारात अनोगांदी व गोंधळाचे वातावरण होते.सर्वदूर परिस्थितीचा माग घेऊन मोऱ्यांच्या कुमकीस कोणीही येणार नाही ह्याची खातरजमा होताच महाराज जावळीची निसर्गरूपी सुवर्णलंका सर करण्याच्या उद्योगास लागले.६ वर्षांच्या चढाया-लढायांच्या दुष्काळाने झुंजीसाठी आतुरलेले सरदार-दरकदार व मावळे जावळीस्वारीत पराक्रमाचे डोंगर उभे करण्याचा निर्धार करून लागले.चंद्ररावाचे प्रमुख कारभारी व सैन्य जावळीच्या जोहोरबेट,चतुर्बेट,सिवथर खोरे व खुद्द जावळी अशा ठिकाणी विखुरलेले होते.रघुनाथ बल्लाळ सबनीस,संभाजी कावजी कोंढाळकर,सूर्यराव काकडे,कान्होजी नाईक जेधे,बांदल देशमुख,शिलिमकर देशमुख इ. मातब्बर सरदारांस नामजाद करून जावळी मोहिमेची सूत्रे दस्तुरखुद्द महाराजांनी हातात घेतली.सुनियोजितपणे संभाजी कावजी कोंढाळकराने चतुर्बेटावर,रघुनाथ बल्लाळ सबनिसांनी जोहरखोऱ्यावर तर सूर्यराव काकडे,जेधे,बांदल,शिलिमकर इ. या मातब्बर सरदारांनी खुद्द जावळीवर हल्ला केला.जावळीची अहंकारी व अभिमानी अधिसत्ता नव्याशिक्या पण सामर्थ्यशाली,बलदंड,उत्साह व शौर्याचा खळखळता समुद्र सदेही धारण करणाऱ्या हिंदवी स्वराज्याशी निकराचे संग्रामयुद्ध करू लागली.चंद्रराव मोऱ्यांकडून प्रतापराव मोरे,हणमंतराव मोरे हे भाऊबंद,बाबाजीराऊ हा कारभारी व मुरारबाजी देश्पांड्यासारखा पराक्रमी सेनानायक मोरे घराण्याच्या सत्ताअस्तित्वासाठी निकराची झुंज देऊ लागला.नवनिर्माणाच्या प्रेरणेतून व अत्याचाराच्या अग्निदाहात निर्माण झालेल्या राखेतून पुनर्जन्म घेणाऱ्या हिंदवी राजमनाच्या आत्यंतिक त्वेष,निर्धार व पराक्रमासमोर मोऱ्यांचे समर्थबळ तोकडे पडू लागले.चतुर्बेट कावजी कोंढाळकराच्या हाती पडले,जोहरखोरेही रघुनाथपंतानी काबीज केले.हणमंतराव मोरे युद्धपर्वाच्या संगरतांडवात मारला गेला,तर प्रतापराव मोरे विजापुरास पळून गेला.खासा चंद्रराव व मुरारबाजीने बराच काळ जावळी लढवली,पण हिंदवी स्वराज्याच्या तळपत्या क्षात्रतेजासमोर जावळीचे शक्तीवैभव फिके पडले.चंद्ररावास सपशेल माघार घ्यावी लागून तो कुटुंबकबिल्यासह प्राणभयाने बलदंड रायरीच्या आश्रयास गेला.चंद्ररावाच्या पलायनाने जावळी महाराजांच्या ताब्यात आली आणि मन्मथ नाम संवत्सर शके १५७७ पौष वद्य चतुर्दशीस (इ.स.१५ जानेवारी १६५६) जावळीवर हिंदवी स्वराज्याचे पवित्र निशाण डौलाने फडकू लागले.


बघता बघता इवलेसे भासणारे हिंदवी स्वराज्य सामर्थ्य,बलिदान व पराक्रमाच्या तपोबळावर पादशाही सत्ताविश्व नभआक्रमणाने झाकोळून टाकायचे आव्हान देऊ पाहत होते.जावळी सर केल्यावर जावळीची सुभेदारी कृष्णाजी बाबाजी ह्यास तर वीरो रामास मुजुमदारी देऊन महाराजांनी जावळीची व्यवस्था लावली.जावळीची व्यवस्था लागताच चंद्ररावाचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी जातीने किल्ले रायरीकडे दरकूच करण्याचा निर्धार केला..अजिंक्यत्वाचे प्रतिक असलेल्या रायरीला आपल्या निर्धाराच्या आत्मबळासमोर झुकवून रायरीच्या अजिंक्यत्वाचे हरण करण्याचा मानस मनी धरून महाराज इ.स.३० मार्च १६५६ रोजी रायरीकडे कूच झाले.इ.स.६ एप्रिल १६५६ रोजी शिवछत्रपती रायरीच्या पायथ्याशी पोहोचताच स्वराज्याच्या शिलेदारांनी रायरी काबीज करण्याचा निकराचा प्रयत्न आरंभला.इरेस पेटून चंद्ररावानेही महिनाभर रायरी लढवला पण त्याचे बळ अपुरे होते.शेवटी हैबतराव व बाळाजी नाईक शिलिमकरांच्या मध्यस्थीने रायरी महाराजांच्या स्वाधीन करून चंद्रराव महाराजांस शरण आला.हिंदवी स्वराज्यास धुळीस मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या चंद्ररावाचे पुढे काय करावे ह्या विवंचनेत छत्रपती सापडले होते. एकीकडे चंद्ररावास स्वराज्यधारेत शामिल करून वाल्याचा वाल्मिकी करावा की त्याच्याहातून घडलेल्या गुन्ह्याखातर त्यास कडक शासन करावे असा अहोरात्र महाराजांचा खल सुरु होता तर दुसरीकडे नुकताच वर्धिष्णू हिंदवी स्वराज्यात दाखल झालेला किल्ले रायरी उर्फ “रायगड” छत्रपतींच्या पराक्रम व कर्तुत्वाने नतमस्तक होऊन त्यांची पायधूळ आपल्या मस्तकी लेवून जीवन कृतार्थ झाल्याच्या हर्षोल्हासाने दिमाखात हिंदवी स्वराज्यवैभवाकडे कौतुकाने बघत होता.

जय भवानी !!!! जय शिवराय !!!!

चैतन्य देशपांडे
शिवशौर्य प्रतिष्ठान,
अमरावती.  


 

Friday, 1 July 2016

हिंदवी स्वराज्याचा समुत्कर्ष

शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यस्वप्नाचे सार असलेले शिवचरित्र हे अत्यंत रोमहर्षक,प्रेरणादायी व अज्ञानाच्या अंधकारात चाचपडणारया मनुष्याला कर्तुत्वाची तसेच विचारांची नवी डोळस दृष्टी देणारे एक परीसकाव्य आहे.शिवचरित्रात शिवछत्रपतींच्या आयुष्यातील विविध घटनांचे वर्णन करताना शब्दसंपदेचे अमृतकुंभ ओसंडून वाहू लागतात.शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यनिर्मितीच्या समरगाथेतील एक एक घटना आत्म्यास परमतेजाची प्राप्ती करवणाऱ्या नैतिक आत्मबळाचे वरदान नकळतपणेच आपल्याला देऊन जाते.”शिवरायांचे आठवावे रूप | शिवरायांचा आठवावा प्रताप |” ह्या समर्थांच्या गूढ व सार्थक उपदेशाचें अविरतपणे पालन करूनच देव,देश अन धर्माची पताका आपण अवघ्या विश्वात उंचावू शकू.शिवछत्रपतींच्या सद्गुणांचा दैवी अंश आपण आपल्या अंतरंगात सामावून घेतला तर विश्वाच्या अटकेपार झेंडे रोवणे आपणास कठीण नाही.

ज्ञान,तेज,बल,कर्म,नीती,धर्म,सत्य,दया,शील,पराक्रम व कर्तुत्वाची फळप्राप्ती देणारा कल्पवृक्ष आपल्या आत्म्याच्या स्वप्नआकाशात शिवचरित्राचे बीज पेरल्यानेच अंकुरित होऊन फोफावणार आहे.शिवचरित्राच्या तेजोवनात भटकंती करताना छत्रपतींच्या कर्तुत्वाने जसे मन भारावून जाते तसे जगातील सर्व हिरे-माणके व धनसंपत्तीहून मूल्यवान असलेल्या हिंदवी स्वराज्यासाठी पराक्रमी सरदारांनी वेळेवेळी दाखवलेला अतुलनीय पराक्रम,समर्पण भाव वा प्रसंगी दिलेले सर्वोच्च बलिदान आत्म्यास हेलावून टाकते.डोळ्यांसमोर उभा राहतो तो नुकत्याच अंकुरित झालेल्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी पुरंदरपर्वात बाजी पासलकरांनी दिलेला प्राणांत लढा,अफझलखान नावाच्या जहरी सर्पाचा विषज्वर ताप देत असतानाही अफझलस्वारीच्या प्रसंगी कान्होजी नाईक जेध्यांनी दाखवलेली प्रखर स्वामीनिष्ठा,हा-हा म्हणता थेट छत्रपतींवर हल्ला करून स्वराज्याचा अश्वमेध रोखू पाहणाऱ्या सय्यद बंडास नरकपुरीचे दर्शन घडवणाऱ्या जीवा महालाचे प्रसंगावधान,स्वराज्याचा श्रीकृष्ण सिद्दी जौहर नावाच्या कंसकैदेतून व यवनांच्या यमुनापुरांतून सुखरूप सुटून जावा म्हणून शिवा काशीदने पत्करलेले हौतात्म्य,”बाजी तर लाख होतील,पण लाखाचा पोशिंदा शिवबा मात्र एकच आहे” ह्या पराकोटीच्या पावन विचाराने छत्रपतींच्या रक्षणासाठी शर्थीने गजापुरची पावनखिंड लढवणाऱ्या बाजीप्रभूंचा भीमपराक्रम,छत्रपतींच्या आग्र्याच्या काळकैदेतून सुटकेनंतर पकडल्या गेलेल्या रघुनाथपंत कोरड्यानी यातनांच्या नरकवासात हिंदवी स्वराज्यस्वप्नासाठी दाखवलेली सहनशीलता,कर्तव्यास सर्वोच्च मानून ऐन पोराच्या लगीनघाईत महत्प्रयासाने कोंढाण्यास काबीज करणाऱ्या तानाजीने सिंहाच्या काळजाने पराक्रमाच्या यज्ञवेदीवर जीवनाची आहुती देऊन केलेले सर्वोच्च बलिदान,अवघ्या ७० मावळ्यानिशी सूर्याच्या तेजाने अन राहूच्या चालीने बलदंड पन्हाळ्याचा पाडाव करणाऱ्या कोंडाजी फर्जन्दाची बुद्धीकुशलता,छत्रपतींचे शब्द मनावर घेऊन “वेडात मराठे वीर दौडले ७” ह्या उक्तीचे जनक असलेल्या प्रतापराव गुजरांनी स्वराज्यसेवेखातर दाखवलेला कर्तव्यकठोर निर्धार व अकल्पित शौर्य.प्रेरणा,लढाऊ बाणा,चिकाटी,बलिदान,उत्साह व स्वराज्यनिष्ठेचा ह्या निर्मळ प्रवाहात आकंठपणे अभ्यंगस्नान करूनच आयुष्याच्या संग्रामपटलावर आपण यशस्वी वाटचाल करू शकू.

इ.स.१६४९ मध्ये अफझलखानाचा स्वराज्यकार्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा डाव छत्रपतींनी राजकारणाचे व वेळकाढूपणाचे अस्त्र प्रभावीपणे वापरून उधळून लावला.स्वराज्यविरोधी आदिलशाही कारवाया यादरम्यान काहीश्या थंडावल्याने महाराज स्वराज्याच्या अंतर्गत व्यवस्थेत लक्ष घालण्यास मोकळे झाले.बाजी पासलकर स्वराज्यरक्षणासाठी लढता लढता पुरंदर मोहिमेत धारातीर्थी पडले असता त्यांच्या इच्छेनुरूप महाराजांनी मोसे खोऱ्याची देशमुखी कृष्णाजी पासलकरांच्या नावे केली.कृष्णाजी पासलकरही लवकरच स्वर्गवासी झाल्याने साबाजी पासलकर व धर्माजी पासलकर ह्या द्वयीमध्ये मोसेखोऱ्याचा देशमुखीवरून घनघोर तंटा सुरु झाला.यवनी आक्रमणाच्या संकटाची तलवार सदैव डोक्यावर टांगती असताना अंतर्गत हेवेदावे व दुफळीमुळे स्वराज्याच्या एकीकृत शक्तीस निर्माण होणारा धोका ओळखून शिवाजी महाराजांनी इ.स.१६५१-१६५२ च्या सुमारास गोतसभा बोलवून स्वतः जातीने मोसे खोऱ्याच्या देशमुखीचा निवाडा केला.रोहिडखोऱ्यातील केदारजी बिन नरसोजी व खंडोजी बिन धर्मोजी खोपडे देश्मुखांमध्ये असलेला वतनदारीचा तंटाही मिटवला.यवनी आक्रमणापासून लाभलेला उसंतीचा काळ प्रभावीपणे वापरून  वर्धिष्णू स्वराज्यशक्ती  बळकट करण्याच्या निर्धाराने छत्रपती तडफेने कामास लागले.स्वराज्यावर येणाऱ्या भावी राक्षसी संकटांच्या निकराच्या सामन्यासाठी जणू हा पूर्वतयारीचा काळ होता.एकीकृत व समर्थ स्वराज्याची शक्ती स्वराज्याच्या पाठीशी उभी करण्यासाठी चोख राज्यकारभार,प्रखर न्यायव्यवस्था व लोकाभिमुख धोरणांचा अवलंब शिवछत्रपतींनी मुत्सद्यांच्या मदतीने नव्या उभारीने सुरु केला.नवीन सैन्यसंचणी करून स्वराज्याचे लष्करी सामर्थ्य वाढवले.शस्त्रसाठा वाढवून स्वराज्याचे शस्त्रागार सुसज्ज व अद्यावयत केले.श्रींची इच्छा असलेल्या हिंदवी स्वराज्याचा अभ्युदय व्हावा व उत्तरोत्तर उन्नती व्हावी अशा दैवी विचाराने पछाडलेले शिवछत्रपती देवब्राह्मणांना साकडे घालत होते.कर्तव्यकठोरपणे कोणाचाही मुलाहिजा न बाळगता हिंदवी स्वराज्याची लोककल्याणकारी धोरणे राबवणारे शिवछत्रपती सत्पुरुशांसमोर नम्र होत होते.”सुर्योपासक श्रेष्ठ अनुष्ठाते” श्रीमहाबळेश्वरचे वेदमूर्ती गोपाळभट बिन श्रीधरभट ह्यांच्याकडून छत्रपतींनी स्वराज्यवृद्धीसाठी मंत्र उपदेश संपादिला,तसेच “आपल्या अभ्युदयार्थ स्वामींनी सुर्यानुष्ठान करावे” अशी विनंती महाराजांनी त्यांना करून गोपाळभटांना इ.स.१८ फेब्रुवारी १६५३ च्या पत्रातील नोंदीनुसार वर्षासनही नेमून दिले.चाकणच्या सिद्धेश्वरभट ब्रह्मे ह्या सत्पुरुशावरही महाराजांची श्रद्धा होती.”त्यांच्या अनुष्ठानबळेच आपण राज्यास अधिकारी झालो व सकल मनोरथ चिंतिले ते पावलो” असा विश्वास असल्याने व संकटसमयी सिद्धेश्वरभटांनी हात दिल्याने त्यानाही महाराजांनी इ.स.१७ ऑगस्ट १६५३ रोजी वर्षासन नेमून दिले.हिंदवी स्वराज्यस्वप्न प्रत्यक्षात उतरवून जगवण्यासाठी छत्रपतींचे प्रभावी व चोख कारभारासोबतच आशीर्वादाचे पाठबळ उभे करण्याचे चौफेर प्रयत्नच वरील प्रसंगातून ध्वनित होतात.

हिंदवी स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी छत्रपतींच्या कर्तबगारीसोबतच असलेले जिजाऊमातेचे योगदानही दुर्लक्षून चालणार नाही.छत्रपतींच्या कर्तुत्व व विचारसामर्थ्याला जिजाऊरुपी त्रिदेवीसंगम दैवी शक्तीचा मोठा आधार होता.दस्तुरखुद्द जिजाऊमाता स्वराज्याच्या कारभारात करडी नजर ठेवून लक्ष घालीत होत्या.गणो गबाजी तबीब ह्याला पुणे परगण्यातील मौजे बेहरवडे येथील जमीन शहाजीराजे व महाराजांकडून इनाम मिळालेली होती.काही कारणाने २४ मे १६५१ ते २३ मे १६५२ दरम्यान शिवाजी महाराजांनी एका खुर्दखतानुसार त्याचे इनाम अमानत केले.आपल्यावर अन्याय झाल्याची भावना होऊन गणो तबीब तक्रार घेऊन निवाड्यासाठी जिजाऊबाईसाहेबांकडे आला.गणो तबिबाची जबानी पटल्याने त्यांनी “चिरंजीव राजेश्री सिउबाचे खुर्दखताचा उजर न करणे” असे स्पष्ट शब्दात लिहून त्याचे इनाम त्याला परत केले.जिजाऊंचे अघाढ पुत्रप्रेम स्वराज्यकार्याच्या,न्यायाच्या व चोख कारभाराच्या मुळीच आड आले नाही असा निष्कर्ष वरील घटनेवरून निघतो.जिजाऊंच्या न्यायी बाण्याची,प्रभावी निवाड्याची व संमोहित करून टाकणाऱ्या व्यक्तिमत्वाची प्रचीतीही आपल्याला येते.शिवछत्रपतींच्या महात्कार्याचा गाभा संपूर्णपणे जिजाऊंच्या त्यांच्यावरील संस्कारशक्ती व विचारशक्तीने बनला आहे असे ध्यानी येते.जेजुरीच्या गुरव पुजाऱ्यांच्या झगड्याचा निवाडाही जिजाऊमातांनीच केला.हिंदवी स्वराज्याच्या प्रभावी लोकाभिमुख व्यवस्थेवर असलेली जिजाऊंची छाप ऐतिहासिक पुराव्यांतून ठायी ठायी दिसून येते.छत्रपती व जिजाऊंचा हा सारा आटापिटा हिंदवी स्वराज्य हे कसे यवनी पादशाहीपेक्षा संपूर्णपणे वेगळे,आपलेसे वाटणारे,लोकाभिमुख,न्यायनिष्ठीत व लोककल्याणकारी आहे हे समाजमनावर बिंबवण्यासाठी सुरु होता.सामान्य रयत जर मायेच्या सूत्रात बांधली गेली तर स्वराज्यावर येणाऱ्या कुठल्याही संकटाचा निर्धाराने सामना करून एकीकृतपणे विजयी होईल ह्या विचारावर संपूर्ण निष्ठा असल्यानेच छत्रपतींनी लोकाभिमुख धोरणे प्रभावीपणे राबवली.किंबहुना चोख राज्यव्यवस्थाच एकप्रकारे संकटांच्या द्रोहपर्वातून हिंदवी स्वराज्याच्या दैदिप्यमान समुत्कर्षाचे कारण ठरली.

इ.स.१६४९ नंतर छत्रपतींनी लोकाभिमुख राज्यकारभाराची चोख व्यवस्था लावून सामान्य रयतेच्या मनात हिंदवी स्वराज्याविषयी आपुलकी व आस्था निर्माण करण्याचे प्रयत्न हिरीरीने केले.कैदेतून सुटका झाली असली तरीही शहाजीराजे इ.स.१६४९ पासून विजापुरातच असल्याने महाराजांचे हात स्वराज्यविस्तारासाठी बांधले गेले होते.छत्रपतींची ३-४ वर्षे प्रभावी राज्यव्यवस्था निर्माण करण्यात निघून गेली असली तरीही शहाजीराजे विजापुरात असेपावेतो स्वराज्यसीमा विस्तारणे शिवछत्रपतींना शक्य नव्हते.मुहम्मद आदिलशाहची प्रकृती अस्वस्थ असल्याने आदिलशाही दरबारात दोन पक्षांमध्ये सत्तास्पर्धेला दरम्यानच्या काळात ऊत आला होता.खानमहंमदाच्या पक्षाचे शहाजीराजे,फतहखान व मलिक याकूत हे बादशाहशी निष्ठेने वागत होते तर दुसऱ्या पक्षाची सूत्रधार बडी बेगमसाहिबा उर्फ ताज-उल-मुक्खद्दीरत आपल्या चालीने आदिलशाही कारभार चालवू इच्छित असल्याने दोन्ही पक्षांमध्ये सत्तास्पर्धा व शह-काटशहाच्या राजकारणाला ऊत येऊन आदिलशाही अन्त्यस्थरित्या खिळखिळी होऊ लागली.अशातच दक्खनची मोगल सुभेदारी शहजादा औरंगजेबला मिळाली व दक्खनेत येऊन औरंगाबादला तळ ठोकताच औरंगजेबाने औरंगी कपटनीतीचा आरंभ केला.अत्यंत कपटी,दगाबाज व अतिमहत्वाकांक्षी म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या औरंग्याचे पाय दक्खनभूमीला लागताच दक्खनेचे राजकारण ढवळून निघण्यास सुरुवात झाली.आदिलशाही व कुतुबशाही खालसा करून मोगली सल्तनतचा परचम दक्षिणेपर्यंत भिडवण्याच्या इर्षेने औरंगजेबाने बुद्धीबळातील अश्वाप्रमाणे मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली.कुतुबशाहीतील कर्तुत्ववान व पराक्रमी सरदार मीर जुमला उर्फ महम्मद सय्यद ह्यास फितूर करून औरंगजेबाने कुतुबशाहीला पहिल्याच दणक्यात मोठा हादरा दिला.प्रचंड सैन्यशक्ती व औरंगजेबाच्या पाठबळावर मीर जुमला रावणाचे रूप घेऊन अवघ्या दक्षिणेत थैमान घालू लागला.कुतुबशाहीला धाब्यावर बसवून आदिलशाही मुलुखातही मीर जुमल्याने औरंगजेबाच्या आशीर्वादाने उत्पात सुरु केला.औरंगजेबाशी सख्य करून अवघा दक्षिणप्रांत आपल्या घशात घालण्याचे दुःस्वप्न मीर जुमला बघू लागला.दक्षिणेत मीर जुमला डोईजड होत चालल्याचे बघून आदिलशाहने खान महम्मदाला मीर जुमल्याच्या बंदोबस्तासाठी पाठवले.पण मीर जुमल्याने चांगलाच पराक्रम गाजवून हळूहळू आदिलशाही प्रांतात घुसून थेट शहाजीराजांच्या बंगरूळ प्रांताला आपली सीमा भिडवली.मीर जुमल्याच्या बंदोबस्ताची तातडीची गरज ओळखून इ.स.१६५५ मध्ये आदिलशाहने शहाजीराजांची रवानगी पुन्हा कर्नाटक प्रांतात केली.आदिलशाही हुकुमानुसार शहाजीराजे कर्नाटक मोहिमेवर कूच झाल्याने महाराजांवर स्वराज्यविस्तारासाठी असलेले बंधन नाहीसे झाले आणि जणू चाणक्याच्या सार्वभौम स्वराज्यतडफेने शिवछत्रपती स्वराज्यविस्तारासाठी योजना आखू लागले.

शहाजीराजांची कर्नाटक प्रांताची रवानगी होताच स्वराज्यविस्तारासाठी छत्रपतींची नजर जावळीवर खिळली.हिंदवी स्वराज्याच्या दक्षिण-पश्चिम सीमेला लागुनच चंद्रराव मोऱ्यांची जावळी अजिंक्यपणाच्या दिमाखात उभी होती.मोरे घराणे हे आदिलशाहीचे जावळीचे पिढीजात जहागीरदार होते.८-१० पिढ्या खपून त्यांनी आपले वैभव कुबेराचे डोळे दिपून जावे एवढे वाढवले होते.मोरयांकडे १०-१२ हजार फौज होती.महाडपासून महाबळेश्वरपर्यंतचा डोंगरी मुलुख व सातारा जिल्हा त्यांनी काबीज केला होता.जावळीसारख्या मोक्याच्या जागी असलेल्या सत्तेमुळे वाईचा सुभा,सह्यान्द्रीमंडळ आणि पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर मोरे आपली सत्ता गाजवीत.कोकण व घाटमाथ्यातील मोक्याचे सर्व रस्तेही मोऱ्यांच्या ताब्यात होते.जावळीच्या समर्थ सत्ताधीशांशी मित्रत्वाचे फायदे ओळखून छत्रपतींनी इ.स.१६४७ मध्येच माणकाईने दत्तक घेतलेल्या कृष्णाजी बाजी चंद्ररावास विजापूरच्या नाराजीचा धोका पत्करूनही जावळीच्या गादीवर प्रस्थापित केले.छत्रपतींच्या उपकाराने  चंद्रराव गादीवर आला असला तरी छत्रपतींच्या स्वराज्यकार्याने व हिंदवी स्वराज्यविस्ताराने चंद्ररावाने महाराजांशी उघडपणे शत्रुत्व आरंभले.हिंदवी स्वराज्य वाढीस लागल्याने चंद्रारावच्या स्वराज्यविस्ताराच्या लालसेस पायबंद बसत होता.नवख्या पण सामर्थ्यशाली हिंदवी स्वराज्याचा पुरातन,अभिमानी व अहंकारी जावळीच्या सर्वसत्ताधीशांसोबतचा हा निकराचा संघर्ष होता.हिंदवी स्वराज्य कार्यास पायबंद घालण्यासाठी चंद्रराव मोऱ्यानी कपटनीती व दडपशाहीचे सत्र आरंभले.इ.स. १६५५ पर्यंत शहाजीराजे विजापुरातच असल्याने व मोरे घराणे आदिलशाहीचे परंपरागत मात्तबर वतनदार असल्यानेच महाराजांना मोऱ्याविरुद्ध उघड हालचाल करणे शक्य नव्हते. इ.स. १६५५ मध्ये शहाजीराज्यांच्या कर्नाटक रवानगी नंतर मात्र परिस्थिती झपाट्याने बदलू लागली. स्वराज्याच्या विस्तारासाठी असलेले महाराजांवरचे बंधन ६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर नाहीसे झाले. डोईजड होत चालेल्या मोऱ्याचा पक्का बंदोबस्त करण्याची खुण-गाठ बांधून निश्चयाचा महामेरू राजा शिवछत्रपती तडफेने बेत आखु लागला. ६ वर्षांच्या शांततापर्वात हिंदवी स्वराज्याच्या वृधिंगत केलेल्या सामर्थ्याच्या कसोटीचा आता आरंभ होणार होता. कर्तुत्वतेजाने तळपणारे नवेशिके हिंदवी स्वराज्य आत्ता बलाढ्य, सत्तारुपी मुळे जमिनीत घट्टपणे रुजवून बसलेल्या, सैन्य तसेच धनशक्तीने सामर्थ्यवान मोऱ्याशी निकराची झुंज देणार होते. छत्रपतींच्या सर्वश्रुत असलेल्या व समस्तास भावणाऱ्या विजयपर्वाचा आत्ता आरंभ होणार होता. ५-६ वर्षांच्या स्थैर्याने, छत्रपती व मुसात्द्यांच्या चोख कारभाराने व जिजाऊमातेच्या निवाड्याने तसेच भरभक्कम आशीर्वादाने पुरंदरच्या रणसंग्रामात परमतेजाने तळपलेला हिंदवी स्वराज्याचा कोहिनूर आता राज्यव्यवस्थेच्या तसेच सामान्य रयतेच्या सकळसुखाच्या कोंदणातही “न भूतो न भविष्यति” असा झळाळून यवनी पादशाहींचे डोळे दिपवत होता.      

जय भवानी !!!!! जय शिवराय !!!!!

चैतन्य देशपांडे
शिवशौर्य प्रतिष्ठान,

अमरावती.