Thursday, 28 April 2016

जाधव-भोसले घराण्यांचा इतिहास आणि शककर्त्याचा जन्म


शिवचरित्र हे नुसती  गाथा नसून एक धगधगता ज्वलन्त निखारा आहे,ज्या निखाऱ्याने वणव्याचे स्वरूप घेऊन पाशवी अत्याचाराचे हिंस्त्र वन “हिंस्त्र श्वापदान्सहित” होरपळून काढले.धर्माला,समाजाला नवचेतनेची सुवर्णमयी पहाट देणारे ते एक महाकाव्य आहे.

शिवचरित्र आत्मसात करून अंगीकृत करण्याआधी शिवाजी महाराजांचे मातृकूळ व पितृकुळ समजून घेणे महत्वाचे आहे.शिवपूर्वकाळातील विशिष्ट परिस्थितीत निजामशाही व आदिलशाहीच्या आश्रयाने मनगटाच्या बळावर आणि तलवारीच्या पराक्रमावर काही मराठी कुळे नावरूपास आली.हिंदुना काफर,तुच्छ समजणाऱ्या यवनसत्तांना ह्याच काफारांच्या तलवारीच्या तेजाची नोंद घ्यावी लागली.सिंदखेडचे जाधव,फलटणचे नाईक-निंबाळकर,वेरूळचे भोसले ई. अशी अनेक घराणी पराक्रमाचा व शौर्याचा पदर धरून पुढे आली.सिंदखेडचे जाधव हे महाराजांचे मातृकूळ तर वेरुळचे भोसले हे पितृकुळ.



इतिहासाचा सखोल अभ्यास केल्यानंतर जाधवरावांचे घराणे मूळ यादवांचे आहे असे लक्षात येते.इ.स. १६१० पूर्वीचे तसे काही पुरावेही उपलब्ध आहेत.जाधव घराण्याच्या विविध वंशावळीमध्ये तफावत असली तरी सर्व वंशावळी श्रीकृष्णाशी नाते सांगतात.त्यावरून जाधवकुळ हे देवगिरीच्या यादवांचे वंशज होते असा निष्कर्ष निघतो.महाराजांचे पितृकुळ असलेल्या भोसले कुळाचा संबंध मेवाडच्या राजपूत सिसोदिया वंशाशी आहे.यादवघराणे हे मुळचे चंद्रवंशी तर सिसोदिया हे सूर्यवंशी त्यामुळे श्रीरामाच्या सुर्यवंशाचा आणि श्रीकृष्णाच्या यदुवंशाचा दैवी मिलाफ आपल्याला जिजाऊ-शहाजींच्या ऋणानुबंधाने बघावयास मिळतो.
असो !!! ह्यास निव्वळ योगायोग म्हणावा की नियतीची दैवी योजना ह्याचा निर्णय मी तुमच्या विवेकबुद्धीवर सोडतो.
श्रीराम-कृष्ण ह्यांच्या विचारांचे आणि महात्कार्यांचे ग्रंथ आम्ही अंगीकृत करण्याएवजी नुसते पूजाघरात ठेवून दिले त्यामुळे मर्यादापुरुषोत्तम श्रीरामच्या गुणांचे आणि श्रीकृष्णाच्या कुटील कृष्णानितीचे प्रतिबिंब समाजाने कधीच आत्मसात केले नाही.त्यांच्या देवपणामुळे त्यांच्यासारखे धर्मकार्य आपण करूच शकत नाही असा अपसमज निर्माण होऊ दिला,राम-कृष्ण हे विष्णूचा अंश मानले गेले तरी त्यांनी सर्व महत्कार्य मानवरुपात केले हे आपण सपशेल विसरलो.श्रीराम-कृष्णाच्या विचारांची अहवेलना केल्यामुळेच भारतवर्षाच्या हातात दासत्वाच्या बेड्या पडल्या.म्हणून शिवचरित्र फक्त पूजाघरात अडकून राहू नये व त्यातून धर्मकार्य-राष्ट्रकार्य करण्याची शक्ती निर्माण व्हावी म्हणून शिवचरीत्रास दैवी योजनेचे स्वरूप न दिलेलेच बरे !!!!!

वसुदेवाचा पुत्र म्हणून नव्हे तर धर्मकार्याने,राष्ट्राच्या उत्थानाने आणि समाजाच्या कल्याणने श्रीकृष्णाला त्रेतायुगात “वासुदेव” ही उपाधी प्राप्त झाली.कलियुगात यवनी आक्रमणांनी मरणप्राय झालेल्या हिंदू धर्मासाठी हेच कार्य शिवाजी महाराजांनी करून दाखवले त्यामुळे ह्या युगात “वासुदेव” ची उपाधी छत्रपतीना यथार्थ ठरते.
महाराजांचे आजोबा लखुजीराजे जाधवराव हे प्रारंभी निजामशाहीचे पंचहजारी मनसबदार होते.इ.स. १५९४ ते १६०० ह्या काळात अकबराने निजामशाही बुडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला,पण जाधावरावांच्या लक्षणीय मदतीने चांदबिवीने तो हाणून पाडला.निजामशाहीला मलिक अंबर सारखा मुत्सद्दी ह्याच काळात लाभल्याने ही राजवट पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करू लागली.अशा लखुजीराजांच्या उमेदीच्या काळात पौषी शके फसली १००७ पौर्णिमेला(१२ जानेवारी १५९८) जिजाऊमातेचा जन्म झाला.भोसले घराण्याचा धडाडीचा काळसुद्धा शहाजींचे वडील मालोजीबाबा भोसल्यानपासूनच सुरु झाला.राजकीय अनिश्चितता आणि युद्धाप्रसंगाचा काळ पराक्रमी पुरुषासाठी वरदानच ठरतो.१५८८ ते १६०० ह्या १२ वर्षाच्या काळात अतुलनीय पराक्रम करून मालोजीबाबाने भोसले घराणे नावरुपास आणले.शहाशरीफ पीरला नवस बोलल्यामुळे त्यानुसार इ.स. १५९४ ते १५९६ मध्ये झालेल्या पुत्रांचे नामकरण त्यांनी शहाजी व शरीफजी असे केले.रणझुंजार पराक्रमाच्या जोरावर  मालोजीराजे दीडहजारी मनसबदार झाले व भोसले घराण्याचे भाग्य उजळले.पुत्राजन्माबरोबरच मालोजीराजांचे वैभव वाढत जाऊन ते निजामाचे पंचहजारी मनसबदार बनले पण लवकरच ह्या वैभवास द्रूष्ट लागून मालोजीबाबा इंदापूरच्या लढाईत मारले गेले.मालोजीराजांची मनसबदारी त्यांचे जेष्ठ पुत्र शहाजीस मिळाली व शहाजीनेही त्यांच्या पराक्रमाचा दैदिप्यमान वारसा पुढे चालवला.लखुजीराजे व मालोजीराजेंचा निजामशाहीतील पराक्रम समकालीन असल्यामुळे इ.स.१५९९ नंतर भोसले-जाधव घराण्यातील संबंध वृद्धधिगत झाले व त्याचीच परिणीती शहाजी-जिजाऊ लग्नसंबंधात झाली.

धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी वर्णन केलेल्या सिंधुसुधाकाराप्रमाणे बलशाली शहाजीराजे व धर्ममाता जिजाऊ ह्यांचा विवाह इ.स.१६१० च्या आसपास दौलताबादला झाला.अनेक बखरीतून विवाहाआधी भोसले-जाधव घराण्याच्या वैमनस्याचे प्रमाद लिहिल्या गेले आहेत पण काळानुरूप संशोधनाने व ऐतिहासिक पुराव्यांनी ते खोटे असल्याचा निष्कर्ष निघतो.इ.स. १६२३ साली शहाजी-जिजाऊ दांपत्याच्या जेष्ठ पुत्राने जन्म घेतला व त्यांचे “संभाजी” असे नामकरण केल्या गेले.ह्याच संभाजीराजांची इ.स.१६५६ साली कनकगिरीच्या वेढ्यात अफजलखानाने दगाबाजीने हत्या केली,त्यामुळे शिवाजी महाराजांनी केलेल्या अफजलखानाच्या वधामागे स्वराज्य रक्षणाच्या कर्तव्यासोबातच एक भावनिक कंगोरासुद्धा होता.वडीलबंधूच्या स्मरणाप्रीत्यर्थ इ.स. १६५७ साली जन्म घेतलेल्या शिवछत्रपतींच्या जेष्ठ पुत्राचे नामकरण “संभाजी” असे केल्या गेले.
छत्रपतींच्या जन्मापुर्वीचा काळ हा शहाजीराजांसाठी धामधुमीचा होता.आदिलशाही,निजामशाही आणि मोगलशाही अशा यवनसत्ता राज्यविस्ताराच्या राक्षसी लालसेने एकमेकांच्या छातीत आक्रमणाचे सुरे खुपसत होत्या  आणि सामान्य रयत मात्र या अंदाधुंदीमुळे आक्रमणाच्या वरवंट्याखाली भरडून निघत होती.इ.स.१६२४ साली भातवाडीच्या युद्धात शहाजीराजांनी व त्यांच्या चुलतबंधुनी पराक्रमाची शर्थ केली व निजामशाही च्या विजयात मोलाची भूमिका बजावली,पण शहाजीराजांच्या पराक्रमाने स्तंभित झालेल्या मलिक अंबरने त्यांच्याविरुद्ध कटकारस्थाने सुरु केली त्यामुळे इ.स.१६२५ मध्ये शहाजीराजानी विजापूरची चाकरी पत्करली.लखुजीराजेसुद्धा इ.स.१६२१ पासून मलिक अंबरशी वितुष्ट आल्यामुळे मोगलशाहीत होते.१६२६-१६२७ च्या काळात निजामशाहीतील मलिक अंबर,इब्राहीम आदिलशाह आणि मोगल बादशाह जहांगीरच्या अकस्मात मृत्यूमुळे भारतीय सत्तासमीकरणाचे आसमंतच ढवळून निघाले.मोगलशाही व आदिलशाहीमध्ये स्थेर्याची जागा धर्माधतेने घेऊन सर्वत्र अनोगांदी व अत्याचाराचे तांडव पसरले.त्यामुळे इ.स.१६२८ च्या आरंभी शहाजीराजे व लखुजीराजे निजामशाहीत परतले,पण असुरी शंकेतून व वैमनस्यातून निजामशाहाने दगाबाजीने भर दरबारात इ.स.२५ जुलै १६२९ रोजी लखुजीराजांची पुत्रापौत्रासह भोसकून हत्या केली.ह्या भीषण हत्यासात्राच्या वेळेस जिजाबाई गर्भवती असून त्या शहाजीराजासमावेत परीन्द्यास मुक्कामी होत्या.लखुजीराजांची हत्या करून निजामशाही सुरक्षित राखता येईल असे हमीदखान व निजाम्शाहाला वाटत होते पण ही हत्याच पुढे निजामशाही नेस्तनाबूत होण्यास कारणीभूत ठरली.लखुजीराजांच्या निर्घुण खुनानंतर शहाजीराजानी थेट निजामशाहीला आव्हान दिले.अनेक प्रतिष्ठीत सरदारांनी अविश्वासाने निजामशाहीतून अंग काढून घेतले व मरणासन्न झालेल्या निजामशाहीला चिरडण्यासाठी मोगलशाहीने आक्रमण केले व निजामशाही मातीच्या ढेकळप्रमाणे गळून पडली.
शिवपूर्वकालीन जाधव,भोसले,नाईक-निंबाळकर,घोरपडे,देशमुख-जेधे इ. ह्या घराण्यांचा बारकाईने अभ्यास केल्यावर त्यांच्या ठायी असलेल्या पराक्रमाचे,शौर्याचे,लढाऊ बाण्याचे,गनिमी काव्याचे,चतुर मुत्सद्दीपणाचे,उच्च प्रशासनक्षमतेचे,कुशल नेतृत्वगुणांचे व प्रखर स्वामीभक्तीचे गुण ठळकपणे दिसून येतात.तरीसुद्धा ह्यापैकी कोणीही हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करू शकला नाही.नेमके इथेच शिवरायांचे महत्कार्य व महत्व अधोरेखित होते.सर्वगुणांनी सुशोभित असलेल्या पराक्रमी पुरुषांचा मेळ साधून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवछत्रपतीनी सत्य करून दाखवले.३०० वर्षाच्या गुलामगिरीने आपला जन्मच चाकरी करण्यासाठी झाला अश्या बुरसट मानसिकतेचा बिमोड करून मराठी वंशाच्या पराक्रमी तलवारी व बळकट मुठी हिंदवी स्वराज्यासेवेस लावल्या.

अन्यायाच्या,अत्याचाराच्या असुरी ढगांनी भारतवर्षाचे तेजस्वरूप आकाश काळवंडले होते.गरोदरअवस्थेतच जिजाऊमातेचे माहेर कापल्या गेले.एकामागोमाग अनेक आघात त्यांना सहन करावे लागले.यापूर्वी त्यांना ५ पुत्र झाले होते पण संभाजीराजे सोडता सर्व अल्पजीवी ठरले.अशा करुणामय परिस्थितीत शहाजीराजे जिजाऊना घेऊन शंभूराजांच्या विवाहास शिवनेरीस आले.शिवनेरीचे गडकरी विजयराव सिधोजी विश्वासराव ह्यांची मुलगी जयंती हिच्याशी शम्भूराजांचा विवाह ८ नवम्बर १६२९ रोजी पार पडला.जिजाऊबाईसाहेबांना तिथेच ठेवून शहाजीराजानी गड सोडला.शिवाईदेवीच्या प्रसादरूपाने शके १५५१ फाल्गुन वद्य तृतीयेला(इ.स.१९ फेब्रुवारी १६३०) भोसले कुळात शहाजीराजांच्या द्वीतीयपुत्राचे आगमन झाले.हिंदवी स्वराज्याच्या दुदुम्भीचे पडघम साऱ्या आसमंतात वाजू लागले.शेकडो वर्षांच्या गुलामगिरीनंतर हिंदूधर्माला पुनर्रउत्थानाची चाहूल लागली.
शककर्त्याने जन्म घेतला !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

चैतन्य देशपांडे
शिवशौर्य प्रतिष्ठान,

अमरावती

Thursday, 21 April 2016

शिवपूर्वकालीन महाराष्ट्र व शिवाजी : एक युगपुरुष

सृष्टीचा खेळच न्यारा असतो, झाडे तीच असली तरी फळाफळात कमालीचा फरक असतो. काही फळांना कधीच पाड लागत नाही, ती तुरकत वांझोटी निघतात, काहींना उशिरा पाड लागतो, त्यासाठी त्यांना अढीत घालून उबवावे लागते. तर काही फळांना झाडावरच पाड लागतो. राजा शिवछत्रपती म्हणजे झाडाच्या शेंडीला अलगद पिकलेल फळ आहे,ज्याचा मधुर रस अवघ्या भारतवर्षास चाखावयास मिळाला.
इ.स.११९२ मध्ये तरईच्या दुसऱ्या युद्धात मह्हमद घोरीने पृथ्वीराज चौहानचा पराभव केला आणि हिंदू धर्म दिल्लीच्या तख्तास पारखा झाला तो कायमचा. घराचा मालक स्वतःच्याच घरात परकीयांचा दास बनला आणि सुरु झाली शेकडो वर्षांची अपमान, अवहेलना व क्रूर विटंबनेची एक अखंडित मालिका. दस्तुरखुद्द दख्खनेत अनेक लहान मोठ्या शाह्यांनी ह्या काळात सत्ता गाजवली. त्यात प्रामुख्याने अधिसत्ता गाजविली ती आदिलशाही, निजामशाही, इमादशाही व बरीद्शाहीने, इ.स.१५७४ मध्ये निजामशाही ने इमादशाहीचा आणि इ.स.१६१९ मध्ये आदिलशाहीने बरीद्शाहीचा संपूर्ण पराभव केला व त्या दख्खनेच्या सर्वसत्ताधीश बनल्या. भारतीयांचे शेवटचे शक्ती, आश्रय व प्रेरणास्थान असलेले विजय नगर साम्राज्य ५ शाहींच्या युती समोर २६ जानेवारी १५६५ च्या तालिकोटाच्या भीषण रणसंग्रामात रसातळाला गेले.
भारतीय संस्कृती सर्वसमावेशक असूनही यवनांना ती दिर्घ सहवासानंतर देखील सामावून घेवू शकली नाही याची गंभीरपणे नोंद घेतली पाहिजे. भारताला आक्रमणकारी यवन सत्तेची धग जाणवली ती मोहम्मद बिन कासीम च्या वेळी इ.स.७११ मध्ये . या स्वारीची जी वर्णने उपलब्ध आहे त्यावरून मंदिरांचा विध्वंस करणे हजारो लोकांच्या कत्तली करणे, हजारोंना गुलाम म्हणून कैद करणे हे प्रकार त्याने हि केले आहेत. मोहमद बिन कासीमच्या स्वारी नंतर हिंदुस्थान सुमारे ३०० वर्षे यावनी आक्रमणापासून मुक्त होता. मोहमद गजनवी ने ११ व्या शतकात एकूण १७ स्वाऱ्या करून येथून प्रचंड लूट गोळा करून नेली. सोमनाथ मंदिर भग्न करून स्वधर्म प्रसाराच्या नावाखाली क्रूरपणे हिंदूंची हत्या केली. मोह्हमद घोरीने इस्लामी राज्याचा पाया हिंदुस्थानात घातला व कुतुबुद्दीन ऐबक नावाचा गुलाम बंदोबस्तासाठी मागे ठेवला. त्याने दिल्लीत सुल्तानशाहीची स्थापना केली व भारतात यवनी राजवटीचा प्रारंभ झाला. याच गुलाम घराण्यातील बल्बन ने दिल्लीच्या आसपास ‘शांतता प्रस्थापित करण्यासाठी’ एक लाख लोक निर्घुण पणे ठार मारले. बंगाल मध्ये ज्या पद्धतीने सहस्त्रावधी लोकांना सुळावर लटकावले गेले त्या पद्धतीचे क्रौर्य तत्पूर्वी हिंदुस्थानने कधीही पहिले नव्हते.१४ व्या शतकाच्या पूर्वार्धात अल्लाउदिन खिलजीने दख्खनेतील वैभवशाली यादव साम्राज्याचा शेवट करून दिल्लीच्या जुलमी परकीय सत्तेचा दास बनविले. इ.स.१३९८ साली तैमूरलंग याने सिंधू नदी ओलांडून हिंदुस्थानावर स्वारी करून लक्षावधी लोकांची अमानुष कत्तल व लक्षावधी भारतीयांना गुलाम म्हणून कैद केले. तैमूरलंगाच्या अमानवीय क्रौर्यामुळे व प्रचंड लुटीमुळे हिंदुस्थानचे अक्षरशः कंबरडे मोडले व सर्व परिस्थिती पूर्व पदावर यायला एक शतक जावे लागले.कश्यप ऋषींची भूमी असलेल्या कश्मीरमध्ये १४व्या शतकात सिकंदर बुतशिकनने हिंदूंसाठी नरकयातनांचे दर्पणच उभे केले. बाबर, औरंगजेबा सारख्या मोगल बादशाहांचा धर्मांध इतिहास आपल्याला सर्वश्रुत आहेच. शिवपुर्वकालीन हिंदुस्थानातील ७-८ शतकामंधील यवनी राजवटीचे स्वरूप वरवर न्याहाळले तर हिंदुस्थान कोणत्या बिकट परिस्थितीतून  जात होता व शिवाजी महाराज जन्मले नसते तर काय परिस्थिती उद्भवली असती हे कोणालाही उमजूशकले असते.             
यवनसत्तेच्या काळातील हिंदूंची परिस्थिती अत्यन्त विदारक होती. त्यांचे अधिकार दुय्यम दर्ज्याचे होते. कट्टर सत्ताधीश सत्तेवर आला कि धर्मांतर्णाचा सैनिकी वरवंटा ठरलेलाच. शेंडी नाही तर मुंडी दे असा प्रकार राजरोसपणे चालू होता. बळजबरीने जिझिया कर, यात्रा कर लादून आधीच शोषित, पिडलेल्या समाजावर अत्याचारांचे संगरतांडव सुरु होते. या सर्व दुष्ट चक्रात किती मंदिरे लुटली गेली व किती स्त्रियांच्या अब्रूवर वर हात घातला गेला याचा हिशोब मांडणे काळालाही शक्य नाही. इ.स.१००० ते इ.स.१५२५ या कालखंडात ८ कोटी हिंदू परकियांच्या अत्याचारास बळी पडले. अत्याचाराच्या डागाने टाहो फोडून मृतप्राय झालेल्या हिंदू समाजाचा विचार करून मन विदीर्ण होते. अमीर खुसरो, शम्स सिराज अलिफ सारख्या अनेक ( आमच्या माहितीत २१) समकालीन लेखकाच्या लिखाणात त्या काळातील हृदयद्रावक परिस्थितीचे वर्णन तपशीलवार आले आहे, सीताराम गोयलान्सारख्या आधुनिक लेखकांनीहि “Hindu Temples : what happened to them ?” सारख्या पुस्तकातून सत्य मांडण्याचा प्रयंत्न केला. नष्ट केल्यागेलेल्या २००० प्रसिद्ध मंदिरांची यादीच गोयलानी ऐतिहासिक पुराव्यांसकट मांडली आहे, ज्याला ते “Tip of the Iceberg” ची उपमा देतात. तरीसुद्धा रिचर्ड इटन सारखे काही महाभाग फक्त ८० मंदिरे ६०० वर्षाच्या कालखंडात नष्ट केल्या गेल्याचा दावा पुराव्या विना करतात आणि तहेलका सारखी माध्यमे त्याचे दुर्दैवी समर्थन देखील करतात. सत्य हे पाण्याच्या निर्मल प्रवाहाप्रमाणे असते, असत्याचे-ढोंगीपणाचे कितीही डोंगर आडवे येवोत, एकनाएक दिवस असत्याचे डोंगर कापून सत्याचा निर्मल प्रवाह बाहेर पडतोच. हा प्रवाह आपल्यासाठी निर्मल नाही हे देखील तेवढेच खरे !!!
दुर्जनाच्या शक्तीपेक्षा सज्जनांची निष्क्रियता हि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी घातक ठरते. हजारो वर्षांची प्रेर्णामयी संस्कृतीचा वारसा असलेल्या ह्या भारत देशाच्या हातात दास्यत्व्याच्या बेड्या पडल्या त्या आक्रमणकारी सत्ता परमबलशाली होत्या म्हणून नव्हे तर संपूर्ण राष्ट्रात आक्रमणकारी सत्तांचा नंगा नाच भाऊबंदकी मुळे निष्क्रिय सज्जनांनी मूक गिळून स्वस्त बसून पहिला म्हणून. धर्माच्या नावाखाली समाज रुढीग्रस्त झाला होता. युद्ध समयी लढण्याची जवाबदारी एकट्या क्षत्रियाची समजून बाकी समाज तटस्थ राही.दलितांविषयी कळवळा नसल्याने व त्यांना अत्यंत निकृष्ट दर्ज्याची वागणूक मिळत असल्याकारणाने समाजाचा हा मोठा हिस्सा आम्ही सदैव वेगळा ठेवला. राष्ट्राचा समाज जागृत व एकीकृत असणे हे राष्ट्राच्या सुरक्षेसाठी अत्यन्त महत्वाचे आहे. आपला समाज झोपलेला होता, भाऊबंदकीत गुंतला होता म्हणून हि नामुष्कीची वेळ आपल्यावर आली.
ह्या सर्व भीषण अत्याचारांच्या कालखंडात दबलेल्या पिचलेल्या हिंदू धर्मास राजा शिवछत्रपतींनी परीसाहून श्रेष्ठ असा स्वधार्माभिमान दिला, छत्र दिले जातीधर्मातील भेदाभेद नाहीसा करून एकीकृत समाजाची शक्ती राष्ट्रकार्यात खर्च केली.
मात्र आज आपण काय पाहतो ? टिळक, सावरकर ब्राह्मणांचे झाले, आंबेडकर दलितांचे झाले, होळकर धनगरांचे झाले, व दस्तुरखुद्द श्रीमानयोगी मराठ्यांचे झाले. हा शिवाजी महाराजांचा एकीकृत समाज आहे का ? राजकारण्याच्या दीडदमडीच्या मतांसाठीच्या घाणेरड्या राजकारणाने व जातीपातींच्या विभाजनाने आपली वाटचाल परत दास्यत्वाकडे तर होत नाही  आहे ना, हा विचार करून आत्मा अस्वस्थ होतो. हे सर्व राष्ट्र पुरुष एका विशेष जातीऐवजी संपूर्ण राष्ट्राचे का नाहीत हा प्रश्न आपल्या सर्वांना स्वतःला विचारून आत्मपरीक्षण करण्याची आवशकता आहे.
यवनी सत्तांची पराधार्मियांबद्दल असलेली द्वेषाची भावना ७-८ शतकांच्या इतिहासात ठळकपणे दिसून येते. ह्या द्वेषाच्या भावनेचे पर्यावसान धार्मिक हिंसा व जबरी धर्मांतरणात वेळोवेळी झाल्याची साक्षहि इतिहास देतो.पण याउलट शिवाजी महाराजांच्या धोरणांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते कि सामान्य रयतेत धर्माच्या आधारावर भेद-भावाला कुठे देखील स्थान नाही. अपमानाच्या बदल्याचा अर्थ निष्पापांना छळणे, धर्माच्या आधारावर अत्याचार करणे असा मुळीच होत नाही. ७-८ शतकांच्या धर्मांतरणाच्या पाशवी अत्याचाराला त्याच भाषेत उत्तर दिले गेले असते आणि इतिहासाची पुनरावृत्ती झाली असती तर आपल्यात व त्यांच्यात फरक राहिला असता तो कोणता ? नेमका हाच विचार सत्य-असत्य, नीती-अनीती, धर्म-अधर्म आणि सज्जन-दुर्जनातला फरक ठरवतो. सज्जनतेचे आणि सहिष्णुतेचे बिरूद ह्याच कारणाने छत्रपतींना शोभून दिसते.        
छत्रपति शिवरायांचे विचार निव्वळ दगडी स्मराकांवर कोरण्यापेक्षा आपल्या मनाच्या भिंतीवर चिरकाल कोरण्याची नितांत गरज आहे. शिवाजी एक युग पुरुष आहेत कारण बसत्यास उठता, उठत्यास चालता व चालत्यास दौडता करण्याचे सामर्थ्य शिवाजी महाराजांमध्ये होते. धर्ममतांविरुद्ध जाऊन परधर्मात गेलेल्या वा बळजबरीने नेल्या गेलेल्या बांधवांसाठी धर्माची दारे शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांना स्वधर्मात घेवून पुरोगामी विचारांनी खुली केली होती.ह्याच पुरोगामी विचाराचा अभाव शिवपुर्वकालीन हिंदुस्थानात प्रकर्षाने दिसून येतो. शिवाजी जसे एक यशस्वी सेनानायक होते तसेच प्रजेचे मायाळू पालक व कल्याणकारी राजाही होते. राजा शिवछत्रपती हे नुसते एक व्यक्ती नाहीत तर प्रतिक आहेत असीम त्यागाचे,अकल्पित शौर्याचे,परमश्रेष्ठ बलिदानाचे, अटळ निश्चयाचे, कर्तव्य कठोर न्यायाचे, मायाळू पालकाचे, प्रभावी वक्त्याचे, चतुर राजकारणाचे, कुशल युद्धनीतीचे, चपळ बुद्धीचे, पुरोगामी विचारांचे, एकीकृत समाजाचे, प्रखर राष्ट्रभक्तीचे. आज जगाच्या इतिहासाचा अभ्यास केल्यावर किती व्यक्तींमध्ये ह्या सर्व समावेशक व परिपूर्ण गुणाचे दर्शन होते ? आणि म्हणूनच काळ छत्रपति शिवरायांना युगपुरुषाचे विशेषण लावण्यास बाध्य होतो.

निश्चयाचा महामेरू  | बहुताजानासी आधारू  ||
अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंतयोगी ||        

जाणता राजा असलेल्या ह्या युगपुरुषाचा निश्चय धर्मग्रंथात सांगितलेल्या महामेरू पर्वतापेक्षा उंच आहे. दबल्या पिचल्या, अत्याचाराने पिडल्या समाजाचा तो आधार आहे. परमवैभवी असूनही रयतेच्या कल्याणात व राष्ट्राच्या उत्थानात धन्यता मानणारा खराखुरा श्रीमंत योगी आहे.

जय भवानी | जय शिवराय ||



चैतन्य देशपांडे
शिवशौर्य प्रतिष्ठान,
अमरावती.


Thursday, 14 April 2016

शुभपर्वारम्भ ...

     नमस्कार ! शिवशौर्य प्रतिष्ठान स्थापनेने खऱ्या अर्थाने आज एक शुभ व गौरवशाली पर्वाचा आरंभ झाला आहे. ह्या पर्वाअंतर्गतच शास्त्र शुद्ध वादनाने आपल्या दैदिप्यमान संस्कृतीच्या जपणुकीसोबतच राष्ट्राच्या संरक्षणासाठी तत्पर असलेली वा प्रसंगी सर्वोच्च बलिदानासाठी तयार असलेली विचारवंत, देशभक्त आणि मनाने तरुण असलेली भारतीयांची फळीच आपल्याला उभी करायची आहे. ह्याचाच एक भाग म्हणून मराठेशाहीच्या व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील परम् बलीदानी क्रांतीकारकांची ओळख आपल्या समस्त परिवारास व्हावी ह्या करिता देशभक्तीने व बलिदानाने ओतप्रोत अशा लेखांची मालिका आपण लवकरच सुरु करणार आहोत.

     आपल्याला समजून घ्यायचा आहे हिंदू धर्मास पुनर्जन्म देणारा श्रीमान योगी राजा शिवछत्रपती, तमाम रयातेसाठी सर्वोच्च बलिदानाचे उदाहरण घालणारे धर्मवीर संभाजी, संभाजीच्या अमानुष वधाने पेटून अवघ्या महाबलाढ्य मोगलशाहीला होरपळून काढणारी मराठी अस्मिता, मोगलशाहीला अतिशय बिकट व फन्दफितुरीच्या मायाजालात निकराचा लढा देणारा स्थिरबुद्धी राजाराम, औरंजेबाच्या डेऱ्याचे कळस कापून नेणाऱ्या संताजी-धनाजी चा गनिमी कावा, मोगलांच्या दख्खन स्वारीची कंबरडे मोडणाऱ्या "हुकुमतपनाह" रामचंद्रपंत अमात्यांची कुशल युद्धनीती, रणझुंजार पहिल्या बाजीरावाची विजयी घौडदौड, बाळाजी बाजीरावाची चतुर राजनीती, परचक्राचे आवतण येताच दिल्लीच्या रक्षणासाठी चित्यासारख्या पळणाऱ्या व "बचेंगे तो और लढेंगे " हि सिंहगर्जना करत बलिदान देणारा दत्ताजी शिंदे, रणचंडीला आपल्या रक्ताचा अभिषेक करणारे भाऊसाहेब पेशवे व हजारो रणझुंजार मराठ्यांचे अकल्पित शौर्य, पानिपतच्या आघाताने खिळखिल्या झालेल्या मराठेशाहिस नेटाने परत उभ्या करणाऱ्या थोरल्या माधवरावांची कळकळ, मराठेशाहीचा झेंडा द्रोहापर्वाच्या काळात डौलाने फडकवणाऱ्या नाना फडणीस-महादजी शिंद्यांची जिद्द, अवघा हिंदुस्थान इंग्रजांच्या कह्यात असताना प्रत्येक रणसंग्रामात इंग्रजांना दे माय धरणी ठाव करणाऱ्या यशवंतराव होळकरांची अखेरची झुंज, १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती देवून पुढच्या अगणित पिढ्यांना देशभक्तीची उब देणारे असंख्य वीर, आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडक्यांचा प्राणपणाचा  लढा, प्लेग च्या साथीत स्थानिकांवर अमानुष अत्याचार करणाऱ्या रँड नावाच्या राक्षसाचा वध करणारे चाफेकर बंधू , परवशतेच्या तमात कोसळत्या आभाळावर पाय ठेवून उभे राहणारे लोकमान्य टिळक, हसत हसत भारतमातेसाठी मृत्यूला कवटाळणारे चंद्रशेखर आझाद - भगत सिंघासारखे असंख्य क्रांतिकारक, ३८ कोटी देशबांधवांसाठी अर्ध्या जगात गरुड भरारी मारणारे सुभाषबाबू  !!!
     
     किती नावे घेऊ, पूर्वेकडून क्षितिजपटलावर उगवणारा चरैवेती प्रभाकर पश्चिमेकडून उगवायला लागेल पण हि महापुरुषांची यादी संपणार नाही. नुसता रोमांच येतो म्हणून ढोल-ताशा वाजवणारे गुळाचे गणपती नव्हे तर देशाच्या संकट काळात भारतमातेच्या रक्षणासाठी वळणाऱ्या मुठी व पेटणारी मने आपल्याला निर्माण करायची आहेत. हाती ढोल-ताशा घेवून संस्कृतीची जपणूक व संवर्धन करणाऱ्या शिवभक्ताने प्रसंगी हाती शस्त्र घेवून सैनिकांच्या खांद्यास खांदा देवून लढणे हे त्याचे परम कर्तव्य आहे असा निर्धार निर्माण करायचा आहे. अतिशयोक्ती वाटते ना ? नाही हि अतिशयोक्ती अजिबात नाही. हे खरे आहे कि आपली शक्ती व संख्या मर्यादित आहे पण आपले हे भारतमातेच्या सेवेतील योगदान इतकेच पवित्र व प्रभावी आहे जितके रामायणात सेतू बांधतांना दिलेल्या खारीचे आहे, ज्याचे उदाहरण आपण आजही देतो.

     हे विचार लिहितांना समर्थांनी शिवछत्रपतीना लिहिलेल्या पत्रातील अमृतमयी मजकुराचे स्मरण होते, 
"या भूमंडळीचे ठाई | धर्मरक्षी ऎसा नाही |
महाराष्ट्रधर्म राहिला काही | तुम्हा कारणे ||"

     त्याच धर्मराक्षिताचे आपण पाईक आहोत. तोच शिवछत्रपतींचा महाराष्ट्राधर्माचा वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे, हा महाराष्ट्रधर्म आहे संस्कृतीच्या जपणुकीचा, भारतमातेच्या संरक्षणाचा व भारताला विश्वगुरु बनविण्याचा. यातीलच एक छोटेसे पाऊल म्हणून नवयुवकांमध्ये देशभक्तीची जीवनज्योती पेटविणारी हि लेखांची मालिका. या पावन पर्वास आम्ही लवकरच सुरुवात करू.

     बस अधिक काय लिहावे , हजारो देशभक्त वीरांच्या बलिदानाने स्वतंत्र झालेला भारतदेश पुन्हा विश्वगुरु बनवा हीच शिव चरणी प्रार्थना !!!

जय भवानी ! जय शिवराय !


चैतन्य देशपांडे 
शिवशौर्य प्रतिष्ठान, 
अमरावती.