शिवचरित्र हे नुसती गाथा नसून एक धगधगता ज्वलन्त निखारा आहे,ज्या निखाऱ्याने वणव्याचे स्वरूप घेऊन पाशवी अत्याचाराचे हिंस्त्र वन “हिंस्त्र श्वापदान्सहित” होरपळून काढले.धर्माला,समाजाला नवचेतनेची सुवर्णमयी पहाट देणारे ते एक महाकाव्य आहे.
शिवचरित्र आत्मसात करून अंगीकृत करण्याआधी शिवाजी महाराजांचे मातृकूळ व पितृकुळ समजून घेणे महत्वाचे आहे.शिवपूर्वकाळातील विशिष्ट परिस्थितीत निजामशाही व आदिलशाहीच्या आश्रयाने मनगटाच्या बळावर आणि तलवारीच्या पराक्रमावर काही मराठी कुळे नावरूपास आली.हिंदुना काफर,तुच्छ समजणाऱ्या यवनसत्तांना ह्याच काफारांच्या तलवारीच्या तेजाची नोंद घ्यावी लागली.सिंदखेडचे जाधव,फलटणचे नाईक-निंबाळकर,वेरूळचे भोसले ई. अशी अनेक घराणी पराक्रमाचा व शौर्याचा पदर धरून पुढे आली.सिंदखेडचे जाधव हे महाराजांचे मातृकूळ तर वेरुळचे भोसले हे पितृकुळ.
इतिहासाचा सखोल अभ्यास केल्यानंतर जाधवरावांचे घराणे मूळ यादवांचे आहे असे लक्षात येते.इ.स. १६१० पूर्वीचे तसे काही पुरावेही उपलब्ध आहेत.जाधव घराण्याच्या विविध वंशावळीमध्ये तफावत असली तरी सर्व वंशावळी श्रीकृष्णाशी नाते सांगतात.त्यावरून जाधवकुळ हे देवगिरीच्या यादवांचे वंशज होते असा निष्कर्ष निघतो.महाराजांचे पितृकुळ असलेल्या भोसले कुळाचा संबंध मेवाडच्या राजपूत सिसोदिया वंशाशी आहे.यादवघराणे हे मुळचे चंद्रवंशी तर सिसोदिया हे सूर्यवंशी त्यामुळे श्रीरामाच्या सुर्यवंशाचा आणि श्रीकृष्णाच्या यदुवंशाचा दैवी मिलाफ आपल्याला जिजाऊ-शहाजींच्या ऋणानुबंधाने बघावयास मिळतो.
असो !!! ह्यास निव्वळ योगायोग म्हणावा की नियतीची दैवी योजना ह्याचा निर्णय मी तुमच्या विवेकबुद्धीवर सोडतो.
श्रीराम-कृष्ण ह्यांच्या विचारांचे आणि महात्कार्यांचे ग्रंथ आम्ही अंगीकृत करण्याएवजी नुसते पूजाघरात ठेवून दिले त्यामुळे मर्यादापुरुषोत्तम श्रीरामच्या गुणांचे आणि श्रीकृष्णाच्या कुटील कृष्णानितीचे प्रतिबिंब समाजाने कधीच आत्मसात केले नाही.त्यांच्या देवपणामुळे त्यांच्यासारखे धर्मकार्य आपण करूच शकत नाही असा अपसमज निर्माण होऊ दिला,राम-कृष्ण हे विष्णूचा अंश मानले गेले तरी त्यांनी सर्व महत्कार्य मानवरुपात केले हे आपण सपशेल विसरलो.श्रीराम-कृष्णाच्या विचारांची अहवेलना केल्यामुळेच भारतवर्षाच्या हातात दासत्वाच्या बेड्या पडल्या.म्हणून शिवचरित्र फक्त पूजाघरात अडकून राहू नये व त्यातून धर्मकार्य-राष्ट्रकार्य करण्याची शक्ती निर्माण व्हावी म्हणून शिवचरीत्रास दैवी योजनेचे स्वरूप न दिलेलेच बरे !!!!!
वसुदेवाचा पुत्र म्हणून नव्हे तर धर्मकार्याने,राष्ट्राच्या उत्थानाने आणि समाजाच्या कल्याणने श्रीकृष्णाला त्रेतायुगात “वासुदेव” ही उपाधी प्राप्त झाली.कलियुगात यवनी आक्रमणांनी मरणप्राय झालेल्या हिंदू धर्मासाठी हेच कार्य शिवाजी महाराजांनी करून दाखवले त्यामुळे ह्या युगात “वासुदेव” ची उपाधी छत्रपतीना यथार्थ ठरते.
महाराजांचे आजोबा लखुजीराजे जाधवराव हे प्रारंभी निजामशाहीचे पंचहजारी मनसबदार होते.इ.स. १५९४ ते १६०० ह्या काळात अकबराने निजामशाही बुडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला,पण जाधावरावांच्या लक्षणीय मदतीने चांदबिवीने तो हाणून पाडला.निजामशाहीला मलिक अंबर सारखा मुत्सद्दी ह्याच काळात लाभल्याने ही राजवट पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करू लागली.अशा लखुजीराजांच्या उमेदीच्या काळात पौषी शके फसली १००७ पौर्णिमेला(१२ जानेवारी १५९८) जिजाऊमातेचा जन्म झाला.भोसले घराण्याचा धडाडीचा काळसुद्धा शहाजींचे वडील मालोजीबाबा भोसल्यानपासूनच सुरु झाला.राजकीय अनिश्चितता आणि युद्धाप्रसंगाचा काळ पराक्रमी पुरुषासाठी वरदानच ठरतो.१५८८ ते १६०० ह्या १२ वर्षाच्या काळात अतुलनीय पराक्रम करून मालोजीबाबाने भोसले घराणे नावरुपास आणले.शहाशरीफ पीरला नवस बोलल्यामुळे त्यानुसार इ.स. १५९४ ते १५९६ मध्ये झालेल्या पुत्रांचे नामकरण त्यांनी शहाजी व शरीफजी असे केले.रणझुंजार पराक्रमाच्या जोरावर मालोजीराजे दीडहजारी मनसबदार झाले व भोसले घराण्याचे भाग्य उजळले.पुत्राजन्माबरोबरच मालोजीराजांचे वैभव वाढत जाऊन ते निजामाचे पंचहजारी मनसबदार बनले पण लवकरच ह्या वैभवास द्रूष्ट लागून मालोजीबाबा इंदापूरच्या लढाईत मारले गेले.मालोजीराजांची मनसबदारी त्यांचे जेष्ठ पुत्र शहाजीस मिळाली व शहाजीनेही त्यांच्या पराक्रमाचा दैदिप्यमान वारसा पुढे चालवला.लखुजीराजे व मालोजीराजेंचा निजामशाहीतील पराक्रम समकालीन असल्यामुळे इ.स.१५९९ नंतर भोसले-जाधव घराण्यातील संबंध वृद्धधिगत झाले व त्याचीच परिणीती शहाजी-जिजाऊ लग्नसंबंधात झाली.
धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी वर्णन केलेल्या सिंधुसुधाकाराप्रमाणे बलशाली शहाजीराजे व धर्ममाता जिजाऊ ह्यांचा विवाह इ.स.१६१० च्या आसपास दौलताबादला झाला.अनेक बखरीतून विवाहाआधी भोसले-जाधव घराण्याच्या वैमनस्याचे प्रमाद लिहिल्या गेले आहेत पण काळानुरूप संशोधनाने व ऐतिहासिक पुराव्यांनी ते खोटे असल्याचा निष्कर्ष निघतो.इ.स. १६२३ साली शहाजी-जिजाऊ दांपत्याच्या जेष्ठ पुत्राने जन्म घेतला व त्यांचे “संभाजी” असे नामकरण केल्या गेले.ह्याच संभाजीराजांची इ.स.१६५६ साली कनकगिरीच्या वेढ्यात अफजलखानाने दगाबाजीने हत्या केली,त्यामुळे शिवाजी महाराजांनी केलेल्या अफजलखानाच्या वधामागे स्वराज्य रक्षणाच्या कर्तव्यासोबातच एक भावनिक कंगोरासुद्धा होता.वडीलबंधूच्या स्मरणाप्रीत्यर्थ इ.स. १६५७ साली जन्म घेतलेल्या शिवछत्रपतींच्या जेष्ठ पुत्राचे नामकरण “संभाजी” असे केल्या गेले.
छत्रपतींच्या जन्मापुर्वीचा काळ हा शहाजीराजांसाठी धामधुमीचा होता.आदिलशाही,निजामशाही आणि मोगलशाही अशा यवनसत्ता राज्यविस्ताराच्या राक्षसी लालसेने एकमेकांच्या छातीत आक्रमणाचे सुरे खुपसत होत्या आणि सामान्य रयत मात्र या अंदाधुंदीमुळे आक्रमणाच्या वरवंट्याखाली भरडून निघत होती.इ.स.१६२४ साली भातवाडीच्या युद्धात शहाजीराजांनी व त्यांच्या चुलतबंधुनी पराक्रमाची शर्थ केली व निजामशाही च्या विजयात मोलाची भूमिका बजावली,पण शहाजीराजांच्या पराक्रमाने स्तंभित झालेल्या मलिक अंबरने त्यांच्याविरुद्ध कटकारस्थाने सुरु केली त्यामुळे इ.स.१६२५ मध्ये शहाजीराजानी विजापूरची चाकरी पत्करली.लखुजीराजेसुद्धा इ.स.१६२१ पासून मलिक अंबरशी वितुष्ट आल्यामुळे मोगलशाहीत होते.१६२६-१६२७ च्या काळात निजामशाहीतील मलिक अंबर,इब्राहीम आदिलशाह आणि मोगल बादशाह जहांगीरच्या अकस्मात मृत्यूमुळे भारतीय सत्तासमीकरणाचे आसमंतच ढवळून निघाले.मोगलशाही व आदिलशाहीमध्ये स्थेर्याची जागा धर्माधतेने घेऊन सर्वत्र अनोगांदी व अत्याचाराचे तांडव पसरले.त्यामुळे इ.स.१६२८ च्या आरंभी शहाजीराजे व लखुजीराजे निजामशाहीत परतले,पण असुरी शंकेतून व वैमनस्यातून निजामशाहाने दगाबाजीने भर दरबारात इ.स.२५ जुलै १६२९ रोजी लखुजीराजांची पुत्रापौत्रासह भोसकून हत्या केली.ह्या भीषण हत्यासात्राच्या वेळेस जिजाबाई गर्भवती असून त्या शहाजीराजासमावेत परीन्द्यास मुक्कामी होत्या.लखुजीराजांची हत्या करून निजामशाही सुरक्षित राखता येईल असे हमीदखान व निजाम्शाहाला वाटत होते पण ही हत्याच पुढे निजामशाही नेस्तनाबूत होण्यास कारणीभूत ठरली.लखुजीराजांच्या निर्घुण खुनानंतर शहाजीराजानी थेट निजामशाहीला आव्हान दिले.अनेक प्रतिष्ठीत सरदारांनी अविश्वासाने निजामशाहीतून अंग काढून घेतले व मरणासन्न झालेल्या निजामशाहीला चिरडण्यासाठी मोगलशाहीने आक्रमण केले व निजामशाही मातीच्या ढेकळप्रमाणे गळून पडली.
शिवपूर्वकालीन जाधव,भोसले,नाईक-निंबाळकर,घोरपडे,देशमुख-जेधे इ. ह्या घराण्यांचा बारकाईने अभ्यास केल्यावर त्यांच्या ठायी असलेल्या पराक्रमाचे,शौर्याचे,लढाऊ बाण्याचे,गनिमी काव्याचे,चतुर मुत्सद्दीपणाचे,उच्च प्रशासनक्षमतेचे,कुशल नेतृत्वगुणांचे व प्रखर स्वामीभक्तीचे गुण ठळकपणे दिसून येतात.तरीसुद्धा ह्यापैकी कोणीही हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करू शकला नाही.नेमके इथेच शिवरायांचे महत्कार्य व महत्व अधोरेखित होते.सर्वगुणांनी सुशोभित असलेल्या पराक्रमी पुरुषांचा मेळ साधून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवछत्रपतीनी सत्य करून दाखवले.३०० वर्षाच्या गुलामगिरीने आपला जन्मच चाकरी करण्यासाठी झाला अश्या बुरसट मानसिकतेचा बिमोड करून मराठी वंशाच्या पराक्रमी तलवारी व बळकट मुठी हिंदवी स्वराज्यासेवेस लावल्या.
अन्यायाच्या,अत्याचाराच्या असुरी ढगांनी भारतवर्षाचे तेजस्वरूप आकाश काळवंडले होते.गरोदरअवस्थेतच जिजाऊमातेचे माहेर कापल्या गेले.एकामागोमाग अनेक आघात त्यांना सहन करावे लागले.यापूर्वी त्यांना ५ पुत्र झाले होते पण संभाजीराजे सोडता सर्व अल्पजीवी ठरले.अशा करुणामय परिस्थितीत शहाजीराजे जिजाऊना घेऊन शंभूराजांच्या विवाहास शिवनेरीस आले.शिवनेरीचे गडकरी विजयराव सिधोजी विश्वासराव ह्यांची मुलगी जयंती हिच्याशी शम्भूराजांचा विवाह ८ नवम्बर १६२९ रोजी पार पडला.जिजाऊबाईसाहेबांना तिथेच ठेवून शहाजीराजानी गड सोडला.शिवाईदेवीच्या प्रसादरूपाने शके १५५१ फाल्गुन वद्य तृतीयेला(इ.स.१९ फेब्रुवारी १६३०) भोसले कुळात शहाजीराजांच्या द्वीतीयपुत्राचे आगमन झाले.हिंदवी स्वराज्याच्या दुदुम्भीचे पडघम साऱ्या आसमंतात वाजू लागले.शेकडो वर्षांच्या गुलामगिरीनंतर हिंदूधर्माला पुनर्रउत्थानाची चाहूल लागली.
शककर्त्याने जन्म घेतला !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
चैतन्य देशपांडे
शिवशौर्य प्रतिष्ठान,
अमरावती

Mast re Chaitanya. . Nice information. . .
ReplyDelete