Thursday, 5 May 2016

शहाजीराजांचे स्वराज्यस्वप्न व नवचैतन्याची पहाट

शिवचरित्राकडे इतिहासतील कथाभाग म्हणून नव्हे तर प्रेरणामयी विचारांचा स्त्रोत म्हणून पाहणे ही काळाची गरज आहे.शिवछत्रपतींचा देव,देश अन धर्मासाठी असलेला असलेला प्राणपणाचा लढा आपल्याला इतिहास नावाच्या अज्ञात व्यक्तीच्या डोळस दृष्टीतून समजावून घ्यायचा आहे.

इ.स. जुलै १६२९ मध्ये लखुजीराजांच्या पुत्रपौत्रानसहित केलेल्या निर्घुण हत्येमुळे शहाजीराजे सुडाग्नीने पेटून उठले व त्यांनी पुणे प्रांतात उठाव करून निजामशाही व आदिलशाही मुलुख लुटण्यास सुरुवात केली.शिवनेरीवर शंभूराजांचे लग्नकार्य उरकून गरोदर जिजाऊना तिथेच ठेवून शहाजीराजांनी पुढील मोहिमेसाठी गड सोडला व शके १५५१ फाल्गुन वद्य तृतीयेला(इ.स.१९ फेब्रुवारी १६३०) शिवछत्रपतींनी जन्म घेतला.शहाजीराजांचा बंदोबस्त करण्यासाठी महुम्मद आदिलशाहने मुरारपंत या मातब्बर सरदारास रवाना केले.मुरारपंतानी पुणे परगणा उध्वस्त करून गाढवाचे नांगर फिरवून लोखंडी पहार ठोकली.पुण्याचे वृत्त कळताच शहाजीराजांनी मोगल सेनापती अजमखानाशी मैत्रीचे बोलणे लावले व शहाजीराजे मोगलशाहीचे पंचहजारी मनसबदार झाले.जुन्नर संगमनेरकडील मुलुख ताब्यात घेण्याची जबाबदारी शहजीराजांवर सोपवण्यात आली.अंतर्गत दुफळी व अविश्वासाने खिळखिळ्या झालेल्या निजामशाहीला बुडवायचा चंग  इ.स.१६३१ साली मोगल बादशाह शाहजहानने बांधला व मोगल सेनापती अजमखानास रवाना केले.अजमखानाने निजामशाही बरोबर आदिलशाही मुलुखही लुटावयास सुरुवात केल्यामुळे राजकारणाने वेगळे वळण घेऊन एकीकडे आदिलशाही-निजामशाही तर दुसरीकडे मोगल-शहाजीराजे असे दोन तट निर्माण झाले.भीषण रणकंदनाने अत्याचार,क्रौर्य व लुटालुटीची परिसीमा ओलांडली.अशातच मलिक अंबराचा पुत्र फतहखानाचे मुर्तझा निजामशाहशी खटके उडू लागले व फतहखानाने निजामशाहास कैद करून त्यास वेड लागल्याचे घोषित केले,या कैदेतच निजामशाह पुढे २ महिन्यांनी मृत्यू पावला.मुर्तझा निजामशाहचा बंदोबस्त केल्यावर फताहखानाने हुसेनशाह नावाचे मुल गादीवर बसवून मोगलांशी वाटाघाटी सुरु केल्या.निजाम व मोगलशाहीमध्ये मैत्रीची संधी होऊन हि द्वयी आदिलशाही नष्ट करण्याच्या मागे लागली.मोगली सत्तालालसेचा गंभीर रक्तपिपासू धोका लक्षात येताच शहाजीराजे व पोर्तुगीजांनी आदिलशाही वजीर खवासखान व त्याच्या हाताखालील  सेनापती मुरारपंतास अन्त्यस्थरित्या मदत सुरु केली व मुरारपंतानी अतुलनीय पराक्रमाने मोगल फौजेचा पराभव करून त्यांना राज्याबाहेर हाकलून लावले.

अशा सर्व गोंधळ,अनोगांदीच्या परिस्थितीत शहाजीराजांनी चतुर राजनीतिक डाव खेळला.जीवधन किल्ल्यावरील निजामशाही वंशातील एक मूल हाताशी धरून त्याचे नावे नवीन निजामशाही स्थापन केली व स्वतःकडे राज्याची सर्व सूत्रे घेतली.३०० वर्षांच्या गुलामगिरीच्या कालखंडात सरदारकी असली तरी हिंदू सरदाराना मिळणारी वागणूक ही दुय्यम दर्जाची होती.कुठल्याही यवनसत्तेची सूत्रे आजवर काफर हिंदूंच्या हातात यवनांनी जाणीवपूर्वक  येऊ दिली नव्हती,अशातच शहाजीराजांच्या ह्या अप्रत्यक्ष स्वराज्याच्या प्रयत्नाला मोठे महत्व प्राप्त होते.३०० वर्षाच्या गुलामगीरीने झाकोळल्या गेलेल्या भारतीय क्षात्रतेजाला नवी उभारी मिळण्याचे ते द्योतक होते.शके १५५५(इ.स.१६३३-१६३४) रोजी शहाजीराजांनी पेमगिरी येथे निजामशाहवर छत्र धरले व आदिलशाहकडून ह्या अप्रत्यक्ष स्वराज्यास अधिकृत मान्यता मिळवून घेतली.आदिलशाहचे प्रतिनिधी म्हणून मुरारपंत ह्या प्रसंगी ससैन्य उपस्थित होते व निजामशाहीचे वजीर म्हणून सूत्रे स्वतः शहाजीराजे सांभाळणार होते.राज्याभिषेकानंतर शहाजीराजांनी झपाट्याने त्यांचे बळ वाढवण्यास सुरुवात केली.१२ हजार फौज पदरी ठेवून जुन्नर,सुन्दा,भोरगड,परसगड,माहुली इ. किल्ले ताब्यात घेतले.जुन्नर आता शहाजीराजांची राजधानी झाली त्यामुळे शहाजींची जुन्नरची निजामशाही तसेच फतहखानची दौलताबादची निजामशाही अशा दोन शाह्या अस्तित्वात आल्या.

शहाजीराजे अप्रत्यक्ष स्वराज्यास्वप्न साकार करण्याच्या खटपटीत असतानाच आदिलशाहीत अंतर्गत राजकारणाने पुन्हा उचल खाल्ली.खवासखान व मुरारपंतांच्या वाढत्या प्रभावाने भयभीत होऊन आदिलशाहने मुस्तफाखान व रणदुल्लाखानाच्या मदतीने खवासखानचा निर्घुण खून पाडला.मुरारपंतही महिनाभरात कैद झाले व त्यांची जीभ छाटून गाढवावरून धिंड काढण्यात येऊन तुकडे तुकडे करण्यात आले.मुरारपंतानी केलेल्या इमानी चाकरीचे असे विखारी फलित पंताना मिळाले.शहाजीराजांच्या अप्रत्यक्ष स्वराज्याचे पाठबळ अशा रीतीने उध्वस्त झाले.इ.स. ६ मे १६३६ रोजी शाहजहान व महुम्मद आदिलशाहमध्ये तह होऊन दौलताबादच्या निजामशाहीचा मुलुख अर्धा अर्धा वाटून घेण्याचे ठरले,तसेच शहाजीराजांच्या निजामशाहीला आदिलशाहकडून मिळालेली अधिकृत मान्यताही रद्द होऊन संयुक्त फौजांचे राक्षसी आक्रमण शहजीराजांवर झाले.प्रचंड लष्करी बळपुढे शहाजीराजांचे तोकडे लष्करी सामर्थ्य अपुरे पडले व शहाजीराजांना सपशेल शरणागती पत्करावी लागली.निजामशाहसहित जिंकेलेले सर्व किल्ले आदिलशाहच्या स्वाधीन करून रणदुल्लाखानाच्या मध्यस्थीने शहाजीराजांनी १२००० फौजेनिशी विजापूरची चाकरी पत्करली.पुणे परगणा शहाजीराजांच्या ताब्यात ठेवण्यात येवून मावळच्या बंदोबस्ताची जबाबदारीही सोपवण्यात आली.इ.स. १६३३ ते १६३६ ह्या ३ वर्षांच्या कालखंडात अथक परिश्रम करून शहाजीराजांनी अप्रत्यक्ष स्वराज्यानिर्मितीचा प्रयत्न करून पाहिला.इ.स. १६३६ साली विजापूरची चाकरी पत्करल्यानंतर रणदुल्लाखानसोबत शहाजीराजांची रवानगी कर्नाटक प्रांतात करण्यात आली.

इथे एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.शहाजीराजांच्या अप्रत्यक्ष स्वराज्यास्वप्नात साथ देणारे घाडगे,काटे,गायकवाड,कंक,ठोमरे,चव्हाण,मोहिते,महाडिक,खराटे,पांढरे,वाघ,घोरपडे असे सारे सरदार हिंदूच होते.प्रयत्न सपशेलपणे अपयशी झाला असला तरी दासत्व व नाकर्तेपणाची जुलमी भावना झुगारून स्वायत्त-स्वतंत्रतेच्या कल्पवृक्षाची पालवी मनात फुटली होती.इतिहासाचा सखोल अभ्यास केल्यानंतर ढाल-तलवारींचा वारसा महाराष्ट्राच्या घराघरात शिवपुर्वकालापासून होता असे लक्षात येते,फक्त ह्या शक्तीस धर्मकार्य-राष्ट्रसेवेत लावायच्या परिवर्तनशील मानसिकतेची कमी होती जी निर्माण करण्याच्या दृष्टीने शहाजीराजांनी ह्या प्रयत्नाने एक पाउल टाकले.

प्राचीन काळापासूनच सरस्वतीस्वरूप ज्ञानाची,लक्ष्मीस्वरूप संपत्तीची व दुर्गास्वरूप पार्वतीच्या शक्तीची उपासना आपण करत आलो आहोत.शिवछत्रपतींच्या काळातही ह्याच तत्वांची भरपूर उपासना आपण केली किंबहुना हेच तत्व स्वराज्याशाक्तीचे कारण बनले.स्वातंत्रोत्तर आधुनिक भारतात आपण सरस्वतीस्वरूप ज्ञानाची तसेच लक्ष्मीस्वरूप संपत्तीची उपासना आपण खरपूस करतो पण दुर्गास्वरूप शक्तीची मात्र घोर उपेक्षा मांडली.शिवपूर्वकाळापासून असलेला घराघरातील ढाल-तलवारींचा वारसा जाऊन त्याची जागा चमचा-लिंबू व रांगोळीच्या स्पर्धांनी घेतली.राष्ट्राच्या सुरक्षेची जबाबदारी ही सैनिकांचीच का असावी??साम्राज्यवादी देशांचे भारतवर्षावर आक्रमण झाल्यास सैनिकांच्या खांद्यास खांदा लावून लढण्याची आपण भाषा करतो पण तलवारी-बंदुका वर्षानुवर्षाच्या प्रशिक्षणाशिवाय चालवाव्या त्या कश्या??लष्करीदृष्ट्या समर्थ समाजाचे महत्व ज्यू लोकांना अवघ्या जगात यातनांचा नरकवास भोगून कळले ,आपल्याला ते कधी कळणार??भारतदेश हा साम्राज्यवादी देशांच्या महात्वाकांक्षेने घेरला असल्यामुळे लष्करीदृष्ट्या समर्थ समाजाची निर्मिती हि आज काळाची गरज आहे.स्वघोषित पुरोगामी विचारक सक्तीच्या लष्करी शिक्षणावर लगेच युद्धखोरीची ओरड करायला लागतात.देशाच्या संरक्षणासाठी बळकट सामर्थ्यवान तरुणांची फळी उभी करणे हि युद्धखोरी मुळीच नाही.असो!!!!!!!!!!!!!!!!

इ.स.१६३० ते १६३६ ह्या ६ वर्षातील शिवबाराजांच्या मुक्कामाबद्दल फारसे काळात नसले तरी १६३० ते १६३३ शिवनेरी,१६३३ ते १६३५ सिंदखेडराजा व १६३५ ते १६३६ जुन्नरमाहुलीकडे त्यांचा मुक्काम असावा.सरस्वतीच्या ज्ञानस्वरूपाचा तसेच दुर्गेच्या शक्तीस्वरुपाच्या उपासनेचा आरंभ बाल शिवाजीने केला होता.पित्याच्या वचनासाठी वनवास पत्करणारा मर्यादापुरुशोत्तम श्रीराम,धर्माच्या रक्षणासाठी साम-दाम-दंड-भेद कृष्णनीतीचा अवलंब करणारा युगंधर श्रीकृष्ण,कवचकुंडलाच्या अमोघ शक्तीने अजिंक्य झालेला पण दानवेदीवर इंद्राचा कावा ओळखूनही झटकेसरशी कवचकुंडलांचे दान करणारा दानवीर कर्ण,सत्यवचनासाठी प्राणही न्योछावर करणारा राजा हरिश्चंद्र,एकीकृत भारताचे स्वप्न पाहणारा आर्य चाणक्य,भारतवर्षास दैदिप्यमान स्वरूप प्राप्त करून देणारा समुद्रगुप्त,हिंदूंची आन-बान-शान असलेल्या विजयनगर साम्राज्याचा दिग्विजयी सम्राट कृष्णदेवराय ह्यांचे चरित्र बाल शिवाजींच्या मनावर ठसत होते.शहाजीराजांचे अप्रत्यक्ष स्वराज्यानिर्मितीचे प्रयत्न बालवयातच त्यांच्या मनावर कोरले गेले होते.काय गमावले आहे आणि त्यासाठी काय केले पाहिजे हे अजून कळत नसले तरी काहीतरी गमावले आहे आणि काहीतरी केले पाहिजे अशी भावना मनात धृढ होऊ लागली होती.हिंदवी स्वराज्याचा दिवस आता फार दूर नाही असा विचार मनात घेऊन इतिहास नावाची अज्ञात व्यक्ती सारा खेळ पाहत होती.परवशतेचा अंधकार क्षीण होऊन नवचैतन्याच्या पहाटेची चाहूल भारतवर्षाच्या क्षितीजपटलास लागली होती.बाल शिवाजीच्या कोहिनूर मनावर संस्कारांचे पैलू पडत होते.

जय भवानी !!! जय शिवराय !!!

चैतन्य देशपांडे
शिवशौर्य प्रतिष्ठान,
अमरावती


No comments:

Post a Comment