कुठलेही साम्राज्य हे दैवी कृपेपेक्षा वीरपुरुषांच्या त्याग,शौर्य व बलिदानाच्या भक्कम पाठबळावर उभे राहते.शिवचरित्राचा अभ्यास करताना हिंदवी स्वराज्यासाठी झटणाऱ्या वा प्रसंगी प्राणही न्योछावर करणाऱ्या तसेच पराक्रमात कृष्ण-अर्जुनांप्रमाणे असलेल्या वीरांची मांदियाळीच डोळ्यासमोर उभी राहते.शीतल छायेचा डेरेदार वटवृक्ष उभा राहण्यासाठी बीजकणाला स्वतःला जमिनीत गाडून घ्यावे लागते तसेच न्यायनिष्ठीत व लोककल्याणकारी स्वराज्याच्या निर्मितीसाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या परमबलीदानी वीरपुरुषांची गरज असते.
इ.स. ऑक्टोबर 1636 साली निजामशाहीच्या माध्यमातून अप्रत्यक्ष स्वराज्यनिर्मितीचा शहाजीराजांचा प्रयत्न उधळला गेला व त्यांना आदिलशाहच्या चाकरीत रुजू व्हावे लागून रणदुल्लाखानासोबत त्यांची कर्नाटकात रवानगी झाली.इ.स. १६३७ साली कर्नाटकात जाताना शहाजीराजांना पुणे परगण्याची जहागिरी व मोकासदारी मिळाली.वाई परगण्यातील व कऱ्हाडकडील काही भागही शहाजीराजांना जहागीर म्हणून त्यावेळी मिळाल्याचे दाखले उपलब्ध आहेत.शहाजीराजे कर्नाटकात निघाले तेव्हा शहाजींना जिजाऊ व तुकाबाई अश्या दोन राण्या तसेच संभाजी,शिवबा आणि व्यंकोजी असे तीन पुत्र होते.नुकतेच यौवनात प्रवेश केलेल्या संभाजींची कर्तबगारी हळूहळू दिसू लागली होती तेव्हा त्यांच्या क्षात्रतेजास नवीन उभारी देण्यासाठी शहाजीराजांनी थोरल्या शंभूराजास कर्नाटकस्वारीवर नेण्याचा निर्णय पक्का केला.सर्वच कुटुंब कर्नाटकसारख्या परमुलखात गेल्याने जहागिरीशी तुटण्याचा धोका लक्षात घेता खाशा जिजाबाई व बाल शिवबाराजांना पुणे परगण्यातच ठेवण्याचा निर्णय शहाजीराजांनी घेतला.दादोजी कोंडदेव या मातब्बर कोंढाण्याच्या नामजाद सुभेदारास आपल्या जहागिरीचा मुतालिक नियुक्त करून त्यांच्यावर पुणे परगण्याच्या व्यवस्थेचा भार शहाजीराजांनी सोपवला.७ वर्षांच्या शिवबाचे कर्तुत्व झळाळून निघावे व कारभाराचे शिक्षण त्यांना हळूहळू मिळावे म्हणून कर्यात-मावळची मोकासदारी शहाजीराजांनी शिवबाला दूरदृष्टीने दिली.
इ.स.१६३७ साली शहाजीराजांच्या पुणे परगण्याची परिस्थिती अत्यन्त विदारक होती.आदिलशाही सरदार मुरारपंतानी इ.स. १६२९ साली शहाजीराजांनी केलेल्या उठावामुळे पुण्यावरून गाढवाचे नांगर फिरवले होते.त्यातच इ.स. १६३० ते १६३२ या काळात भीषण दुष्काळ व नंतर १६३४ ते १६३६ मध्ये मोगली आक्रमणाखाली हा प्रदेश भरडून निघाला होता.न्यायप्रणित व्यवस्थेची जागा बेबंदशाहीने घेतली होती.सर्वदूर पुंड-पाळेदार वतनदार बळावल्याने अराजकाची परिस्थिती निर्माण झाली होती.ह्या जहागीरीची चोख व्यवस्था करून एका अर्थी शून्यातून विश्व निर्माण करण्याचे शिवधनुष्य जिजाऊमातांनी उचलले तसेच शिवबाराजांची डोळस जडणघडणही पुनर्निर्माणाच्या कार्यातून करायचा निर्धार जिजाऊमातांनी केला.बालवयात शिवछत्रपतींच्या मनात ठसलेला शहाजीराजांचा सार्वभौम अप्रत्यक्ष स्वराज्यनिर्मितीचा प्रयत्न तसेच जिजाऊमातेचा कर्तव्यकठोर पण लोककल्याणकारी कारभार हेच शिवबाराजांच्या पुढील आयुष्यातील महानतम कार्याचे द्योतक ठरले.बालवयात पाहिलेले प्रसंग वा दिले गेलेले संस्कार हेच आयुष्याचा दिशामार्ग ठरवतात हे शिवछत्रपतींच्या चरित्रातून प्रमाणित होते.
महादेव भट महाभास या परमज्ञानी पंडितांची नियुक्ती करून जिजाऊमातांनी शिवबाराजांच्या शिक्षणाची व्यवस्था लावली.तत्कालीन पद्धत्तीनुसार बालपणी महाराजांना श्रुती,स्मृती,रामायण,महाभारत,इतिहास व पुराणे यातील कथा,संस्कृत व फारसी भाषेचा परिचय,मूळक्षरे,गणित,लेखनवाचन यांचे शिक्षण दिले गेले असावे.भारतवर्षाच्या दैदिप्यमान इतिहासात बाल शिवाजीचे मन रमू लागले.हाती शस्त्र घेऊन पराक्रमाचे डोंगर उभे करण्याची नवचेतना मनात घर करू लागली.छत्रपतींच्या मनाचा मऊ मातीचा गोळा शास्त्रशुद्ध शिक्षणाच्या साच्याने अतिसुंदर व अकल्पित शिल्पाचा आकार घेऊ लागला.ज्ञानधारणेसोबतच अश्वारोहण,कुश्ती,दाणपट्टा चालवणे,धनुष्यबाण,भालाफेक इ. शस्त्रविद्येचे कुशल शिक्षणही दादोजी कोंडदेवांच्या करड्या देखरेखीखाली बाल वयातच शिवाजी महाराजांना दिले गेले.मती गुंग करणारी शस्त्रनिपुणता व प्रसंगावधान त्यांचे ठायी असल्यानेच अफझलखानसारख्या महाबलशाली राक्षसाचा वध शिवछत्रपती करू शकले. James Grant Duff व जदुनाथ सरकारांनी महाराज निरक्षर होते असे ठाम विधान केले आहे पण अलीकडच्या काळात समकालीन पुराव्यांनी हा दावा खोटा ठरतो.१२ एप्रिल १६६३ रोजी फिलीफ गिफर्डने राजापूरच्या वखारीतून सुरतेला जे एक पत्र पाठवले त्यात असा स्पष्ट उल्लेख आहे की “Yesterday arrived a letter from rajah written by himself to rahuji giving him an accompt how that he himself with 400 choice men went to shaistakhan’s camp”.दुसऱ्या सुरत लुटीचे वेळी शिवाजी महाराजांनी स्वतः स्वाक्षरी केलेले पत्र(an autograph letter) फ्रेंचाना पाठवल्याचा उल्लेख डचांनी केला आहे.याशिवाय अनेक तह करारांवर महाराजांनी स्वाक्षरी केल्याचा उल्लेख इंग्रजी पत्रव्यवहारात आढळतो.अशा रीतीने जिजाऊमातेच्या तालमीत व दादोजी कोंडदेवांसारख्या राजकीय गुरूच्या देखरेखीखाली शिवबाराजे तयार होत होते.शिवछत्रपतींच्या परिपूर्ण गुणसंपदेचे वर्णन करताना समर्थ लिहितात,
यशवंत कीर्तिवंत,सामर्थ्यवंत वरदवंत |
पुण्यवंत नीतिवंत,जाणता राजा ||
आचारशील विचारशील,दानशील धर्मशील |
सर्वज्ञपणे सुशील ,सर्वाठायी |
धीर उदार सुंदर ,शूर क्रियेसी तत्पर ||
असे संस्कार सुसंकृत,सुशिक्षित व घरंदाज घराण्यातच मिळणे शक्य होते,त्यातच संस्कारांना बालवयातच अनुभवाची जोड मिळाल्याने शिवछत्रपती कर्तबगार झाले व त्या कर्तबगारीचे भारतवर्षावर असलेले उपकार मांडण्यास आज खरच शब्दसंपदा कमी पडते.
इ.स.१६३६ ते १६४० ह्या ४ वर्षांच्या कालखंडात जिजाऊ व दादोजींनी कर्तबगारी,कर्तव्यकठोर न्याय व लोककल्याणकारी नीतीने पुणे परगण्याचा कायाकल्प घडवून आणला,त्यामुळे सारे मावळखोरे जिजाऊमातेकडे आदराने बघू लागले.शिवबाराजे १० वर्षाचे झाले व त्याकाळी हे लग्नाचे वय समजले जाई.शहाजीराजांच्या संमतीने भोसले घराण्याच्या शिवबाराजांची सोयरिक निंबाळकर-पवार घराण्याच्या सईबाईंशी जोडली गेली व शके १५६२ विक्रम संवत्सर वैशाख शुद्ध पंचमीस (१६ एप्रिल १६४०) शिवबाराजे चतुर्भुज झाले.कर्नाटक मोहिमेत व्यग्र असल्याने शहाजीराजे ह्या समारंभास उपस्थित नव्हते म्हणून इ.स.फेब्रुवारी १६४१ साली दादोजी शिवबाराजे,सईबाई आणि जिजाऊमातांसमवेत बंगरुळसाठी रवाना झाले.सुन्मुख बघून शहाजीराजे प्रसन्न झाले.आपल्या अनुपस्थितीत घडणारा संस्कारी व सर्वगुणसंपन्न शिवबा शहाजीराजांनी डोळे भरून पाहिला.आपला द्वितीयपुत्र परमदिग्विजयी होऊन इतिहासात अजरामर होणार अशी भावना निर्माण झाल्याने परत पाठवताना शिवछत्रपतींची व्यवस्था त्यांनी एका राजाप्रमाणे करून दिली.शामराज नीलकंठ रांझेकर यांना “पेशवे”,माणकोजी दहातोंडे यास “सरनौबत”,बाळकृष्णपंत हणमंते यास “मुजुमदार” व सोनो विश्वनाथास “डबीर” म्हणून नियुक्त करून पाठवले.संपूर्ण जहागीर शिवबाराजांच्या नावे करून त्यांना “पुण्यदेशेश्वर” केले.महाराजांची विख्यात राजमुद्रा यापूर्वीच तयार झाली होती,
प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।
याचा मतितार्थ असा की,”प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढतो आणि पौर्णिमेला विश्ववंदनीय होतो, तशी शहाजीपुत्र शिवाजीची ही मुद्रा अवघ्या विश्वाला भद्र, म्हणजे कल्याणकारी वाटते.”.ही मुद्रा इ.स.१६३७ साली निर्माण झाल्याचे उल्लेख आढळतात.इ.स. मे १६४२ च्या सुमारास शिवबाराजे पुणे परगण्यात सर्व नवनियुक्त मुत्सद्यान्सहित परतले.शिवबाराजांच्या मनात परकीय जुलमी सत्तेविरुद्ध असलेले द्वंद्व आता गतिमान झाले होते.आदिलशाहीचे शक्तिस्थान असलेल्या कर्नाटक प्रांतात हिंदुंवरील जुलूम व क्रौर्याचे दर्शन घडल्याने प्रस्थापित परकीय सत्तेविरुद्ध चीड निर्माण झाली होती.यथोचित संस्कारांनी नवनिर्माणाची भावना मनात मूळ धरू लागली होती.अनादि मी,अनंत मी,अवध्य मी असा दुर्दम्य आत्मविश्वास शिवछत्रपतींच्या ठायी खेळू लागला होता.,त्यामुळे सह्यान्द्रीचा हा कर्मयोगी नवनियुक्त मातब्बर मुत्सद्यांच्या मदतीने व जिजाऊमातेच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्याच्या मुहूर्तमेढीच्या पूर्वतयारीस सर्वशक्तीने लागला.
७-८ शतकांच्या गुलामगिरीच्या कालखंडात शिवाजी महाराजांप्रमाणे अनेक राष्ट्रपुरुषांनी जुलमी दासत्वाच्या बेड्या तोडून हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा प्रयत्न केला.हरिहर,कृष्णदेवरायसारखे राजे दिग्विजयी सम्राट झाले.पण काही वीरपुरुष मात्र पराभवाच्या गर्तेने अहवेलना,विस्मरणाच्या पडद्याआड झाले ते कायमचेच.इ.स.१५५६ साली द्वितीय पानिपतच्या युद्धात अकबराने राजा हेमचंद्र विक्रमादित्य उर्फ हेमूचा पराभव केला आणि भारतीय आप्तस्वकीयांनी त्यास कायमचे वाळीत टाकले.परमदिग्विजयी हेमूच्या कर्तुत्वाचा एका पराभवाने आम्हाला कायमचा विसर पडला.हेमचंद्र विक्रमादित्य हा कुणी व्यसनाधीन,अष्टौप्रहर अफूच्या कैफात राहणारा राजा नव्हता तर पंजाब ते बंगालच्या मुलुखमैदानात लागोपाठ २२ युद्धे जिंकणारा परमवीर होता.पराक्रमाची शर्थ करून त्याने “विक्रमादित्य” ही उपाधी अर्जित केली होती.महिनाभरासाठी का होईना पण दिल्लीश्वर झालेल्या हेमूचा सर्वसाधारण घरात जन्म ते दिल्लीश्वर हिंदुपदपादशाह हा जीवनप्रवास थक्क करून सोडणारा आहे.पानिपतच्या रणमैदानातही हेमूने महत्पराक्रमाने विजयश्री खेचून आणली होती,विजयलक्ष्मी हातात दिग्विजयाचा हार घेऊन उभी होती पण आम्हा भारतीयांचा दुर्दैवाच्या दशावताराने पानिपतच्या रणमैदानावरही पाठलाग केला आणि अचानकपणे आलेला बाण लागून हेमू अंबारीतच कोसळला.जवळ आलेली विजयश्री दूर निघून जाऊन परिणामी पराभवाच्या बेड्या हेमूच्या नव्हे तर आम्हा समस्त भारतीयांच्या हातात पुनश्च पडल्या.इतरांसाठी हेमचंद्र विक्रमादित्य जरी दिल्लीपतीपदाचा पराभूत दावेदार असला तरी आम्हासाठी मात्र साडेतीन शतकांच्या परकीय जुलमी सत्तेविरुद्ध पेटून उठलेला पराक्रमाचा मानबिंदू आहे.शिवछत्रपतींप्रमाणेच हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी बलिदान व समर्पणाचे अत्युच्च उदाहरण घालणाऱ्या हेमुचे आपल्याला पुनःस्मरण व्हावे हेच ह्या उल्लेखाचे प्रयोजन आहे.दैदिप्यमान इतिहासाच्या प्रेरणादायी अभ्यासातूनच गौरवशाली भविष्याचा वेध आपण घेऊ शकू.भारतीय इतिहासाचा अभ्यास करून आपल्या राष्ट्रपुरुषांची ओळख भारतवर्षाला पुनश्च करून देणे ही आज काळाची गरज आणि आपले परमकर्तव्य आहे.आपल्याकडे त्यासाठी निश्चितच तेवढा फावला वेळ आहे.आपण तो राष्ट्रपुरुषांचा अभ्यास करून सत्कारणी लावूया.
जय भवानी !!!!!! जय शिवराय !!!!!!!
चैतन्य देशपांडे,
शिवशौर्य प्रतिष्ठान,
अमरावती.
No comments:
Post a Comment