Thursday, 21 April 2016

शिवपूर्वकालीन महाराष्ट्र व शिवाजी : एक युगपुरुष

सृष्टीचा खेळच न्यारा असतो, झाडे तीच असली तरी फळाफळात कमालीचा फरक असतो. काही फळांना कधीच पाड लागत नाही, ती तुरकत वांझोटी निघतात, काहींना उशिरा पाड लागतो, त्यासाठी त्यांना अढीत घालून उबवावे लागते. तर काही फळांना झाडावरच पाड लागतो. राजा शिवछत्रपती म्हणजे झाडाच्या शेंडीला अलगद पिकलेल फळ आहे,ज्याचा मधुर रस अवघ्या भारतवर्षास चाखावयास मिळाला.
इ.स.११९२ मध्ये तरईच्या दुसऱ्या युद्धात मह्हमद घोरीने पृथ्वीराज चौहानचा पराभव केला आणि हिंदू धर्म दिल्लीच्या तख्तास पारखा झाला तो कायमचा. घराचा मालक स्वतःच्याच घरात परकीयांचा दास बनला आणि सुरु झाली शेकडो वर्षांची अपमान, अवहेलना व क्रूर विटंबनेची एक अखंडित मालिका. दस्तुरखुद्द दख्खनेत अनेक लहान मोठ्या शाह्यांनी ह्या काळात सत्ता गाजवली. त्यात प्रामुख्याने अधिसत्ता गाजविली ती आदिलशाही, निजामशाही, इमादशाही व बरीद्शाहीने, इ.स.१५७४ मध्ये निजामशाही ने इमादशाहीचा आणि इ.स.१६१९ मध्ये आदिलशाहीने बरीद्शाहीचा संपूर्ण पराभव केला व त्या दख्खनेच्या सर्वसत्ताधीश बनल्या. भारतीयांचे शेवटचे शक्ती, आश्रय व प्रेरणास्थान असलेले विजय नगर साम्राज्य ५ शाहींच्या युती समोर २६ जानेवारी १५६५ च्या तालिकोटाच्या भीषण रणसंग्रामात रसातळाला गेले.
भारतीय संस्कृती सर्वसमावेशक असूनही यवनांना ती दिर्घ सहवासानंतर देखील सामावून घेवू शकली नाही याची गंभीरपणे नोंद घेतली पाहिजे. भारताला आक्रमणकारी यवन सत्तेची धग जाणवली ती मोहम्मद बिन कासीम च्या वेळी इ.स.७११ मध्ये . या स्वारीची जी वर्णने उपलब्ध आहे त्यावरून मंदिरांचा विध्वंस करणे हजारो लोकांच्या कत्तली करणे, हजारोंना गुलाम म्हणून कैद करणे हे प्रकार त्याने हि केले आहेत. मोहमद बिन कासीमच्या स्वारी नंतर हिंदुस्थान सुमारे ३०० वर्षे यावनी आक्रमणापासून मुक्त होता. मोहमद गजनवी ने ११ व्या शतकात एकूण १७ स्वाऱ्या करून येथून प्रचंड लूट गोळा करून नेली. सोमनाथ मंदिर भग्न करून स्वधर्म प्रसाराच्या नावाखाली क्रूरपणे हिंदूंची हत्या केली. मोह्हमद घोरीने इस्लामी राज्याचा पाया हिंदुस्थानात घातला व कुतुबुद्दीन ऐबक नावाचा गुलाम बंदोबस्तासाठी मागे ठेवला. त्याने दिल्लीत सुल्तानशाहीची स्थापना केली व भारतात यवनी राजवटीचा प्रारंभ झाला. याच गुलाम घराण्यातील बल्बन ने दिल्लीच्या आसपास ‘शांतता प्रस्थापित करण्यासाठी’ एक लाख लोक निर्घुण पणे ठार मारले. बंगाल मध्ये ज्या पद्धतीने सहस्त्रावधी लोकांना सुळावर लटकावले गेले त्या पद्धतीचे क्रौर्य तत्पूर्वी हिंदुस्थानने कधीही पहिले नव्हते.१४ व्या शतकाच्या पूर्वार्धात अल्लाउदिन खिलजीने दख्खनेतील वैभवशाली यादव साम्राज्याचा शेवट करून दिल्लीच्या जुलमी परकीय सत्तेचा दास बनविले. इ.स.१३९८ साली तैमूरलंग याने सिंधू नदी ओलांडून हिंदुस्थानावर स्वारी करून लक्षावधी लोकांची अमानुष कत्तल व लक्षावधी भारतीयांना गुलाम म्हणून कैद केले. तैमूरलंगाच्या अमानवीय क्रौर्यामुळे व प्रचंड लुटीमुळे हिंदुस्थानचे अक्षरशः कंबरडे मोडले व सर्व परिस्थिती पूर्व पदावर यायला एक शतक जावे लागले.कश्यप ऋषींची भूमी असलेल्या कश्मीरमध्ये १४व्या शतकात सिकंदर बुतशिकनने हिंदूंसाठी नरकयातनांचे दर्पणच उभे केले. बाबर, औरंगजेबा सारख्या मोगल बादशाहांचा धर्मांध इतिहास आपल्याला सर्वश्रुत आहेच. शिवपुर्वकालीन हिंदुस्थानातील ७-८ शतकामंधील यवनी राजवटीचे स्वरूप वरवर न्याहाळले तर हिंदुस्थान कोणत्या बिकट परिस्थितीतून  जात होता व शिवाजी महाराज जन्मले नसते तर काय परिस्थिती उद्भवली असती हे कोणालाही उमजूशकले असते.             
यवनसत्तेच्या काळातील हिंदूंची परिस्थिती अत्यन्त विदारक होती. त्यांचे अधिकार दुय्यम दर्ज्याचे होते. कट्टर सत्ताधीश सत्तेवर आला कि धर्मांतर्णाचा सैनिकी वरवंटा ठरलेलाच. शेंडी नाही तर मुंडी दे असा प्रकार राजरोसपणे चालू होता. बळजबरीने जिझिया कर, यात्रा कर लादून आधीच शोषित, पिडलेल्या समाजावर अत्याचारांचे संगरतांडव सुरु होते. या सर्व दुष्ट चक्रात किती मंदिरे लुटली गेली व किती स्त्रियांच्या अब्रूवर वर हात घातला गेला याचा हिशोब मांडणे काळालाही शक्य नाही. इ.स.१००० ते इ.स.१५२५ या कालखंडात ८ कोटी हिंदू परकियांच्या अत्याचारास बळी पडले. अत्याचाराच्या डागाने टाहो फोडून मृतप्राय झालेल्या हिंदू समाजाचा विचार करून मन विदीर्ण होते. अमीर खुसरो, शम्स सिराज अलिफ सारख्या अनेक ( आमच्या माहितीत २१) समकालीन लेखकाच्या लिखाणात त्या काळातील हृदयद्रावक परिस्थितीचे वर्णन तपशीलवार आले आहे, सीताराम गोयलान्सारख्या आधुनिक लेखकांनीहि “Hindu Temples : what happened to them ?” सारख्या पुस्तकातून सत्य मांडण्याचा प्रयंत्न केला. नष्ट केल्यागेलेल्या २००० प्रसिद्ध मंदिरांची यादीच गोयलानी ऐतिहासिक पुराव्यांसकट मांडली आहे, ज्याला ते “Tip of the Iceberg” ची उपमा देतात. तरीसुद्धा रिचर्ड इटन सारखे काही महाभाग फक्त ८० मंदिरे ६०० वर्षाच्या कालखंडात नष्ट केल्या गेल्याचा दावा पुराव्या विना करतात आणि तहेलका सारखी माध्यमे त्याचे दुर्दैवी समर्थन देखील करतात. सत्य हे पाण्याच्या निर्मल प्रवाहाप्रमाणे असते, असत्याचे-ढोंगीपणाचे कितीही डोंगर आडवे येवोत, एकनाएक दिवस असत्याचे डोंगर कापून सत्याचा निर्मल प्रवाह बाहेर पडतोच. हा प्रवाह आपल्यासाठी निर्मल नाही हे देखील तेवढेच खरे !!!
दुर्जनाच्या शक्तीपेक्षा सज्जनांची निष्क्रियता हि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी घातक ठरते. हजारो वर्षांची प्रेर्णामयी संस्कृतीचा वारसा असलेल्या ह्या भारत देशाच्या हातात दास्यत्व्याच्या बेड्या पडल्या त्या आक्रमणकारी सत्ता परमबलशाली होत्या म्हणून नव्हे तर संपूर्ण राष्ट्रात आक्रमणकारी सत्तांचा नंगा नाच भाऊबंदकी मुळे निष्क्रिय सज्जनांनी मूक गिळून स्वस्त बसून पहिला म्हणून. धर्माच्या नावाखाली समाज रुढीग्रस्त झाला होता. युद्ध समयी लढण्याची जवाबदारी एकट्या क्षत्रियाची समजून बाकी समाज तटस्थ राही.दलितांविषयी कळवळा नसल्याने व त्यांना अत्यंत निकृष्ट दर्ज्याची वागणूक मिळत असल्याकारणाने समाजाचा हा मोठा हिस्सा आम्ही सदैव वेगळा ठेवला. राष्ट्राचा समाज जागृत व एकीकृत असणे हे राष्ट्राच्या सुरक्षेसाठी अत्यन्त महत्वाचे आहे. आपला समाज झोपलेला होता, भाऊबंदकीत गुंतला होता म्हणून हि नामुष्कीची वेळ आपल्यावर आली.
ह्या सर्व भीषण अत्याचारांच्या कालखंडात दबलेल्या पिचलेल्या हिंदू धर्मास राजा शिवछत्रपतींनी परीसाहून श्रेष्ठ असा स्वधार्माभिमान दिला, छत्र दिले जातीधर्मातील भेदाभेद नाहीसा करून एकीकृत समाजाची शक्ती राष्ट्रकार्यात खर्च केली.
मात्र आज आपण काय पाहतो ? टिळक, सावरकर ब्राह्मणांचे झाले, आंबेडकर दलितांचे झाले, होळकर धनगरांचे झाले, व दस्तुरखुद्द श्रीमानयोगी मराठ्यांचे झाले. हा शिवाजी महाराजांचा एकीकृत समाज आहे का ? राजकारण्याच्या दीडदमडीच्या मतांसाठीच्या घाणेरड्या राजकारणाने व जातीपातींच्या विभाजनाने आपली वाटचाल परत दास्यत्वाकडे तर होत नाही  आहे ना, हा विचार करून आत्मा अस्वस्थ होतो. हे सर्व राष्ट्र पुरुष एका विशेष जातीऐवजी संपूर्ण राष्ट्राचे का नाहीत हा प्रश्न आपल्या सर्वांना स्वतःला विचारून आत्मपरीक्षण करण्याची आवशकता आहे.
यवनी सत्तांची पराधार्मियांबद्दल असलेली द्वेषाची भावना ७-८ शतकांच्या इतिहासात ठळकपणे दिसून येते. ह्या द्वेषाच्या भावनेचे पर्यावसान धार्मिक हिंसा व जबरी धर्मांतरणात वेळोवेळी झाल्याची साक्षहि इतिहास देतो.पण याउलट शिवाजी महाराजांच्या धोरणांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते कि सामान्य रयतेत धर्माच्या आधारावर भेद-भावाला कुठे देखील स्थान नाही. अपमानाच्या बदल्याचा अर्थ निष्पापांना छळणे, धर्माच्या आधारावर अत्याचार करणे असा मुळीच होत नाही. ७-८ शतकांच्या धर्मांतरणाच्या पाशवी अत्याचाराला त्याच भाषेत उत्तर दिले गेले असते आणि इतिहासाची पुनरावृत्ती झाली असती तर आपल्यात व त्यांच्यात फरक राहिला असता तो कोणता ? नेमका हाच विचार सत्य-असत्य, नीती-अनीती, धर्म-अधर्म आणि सज्जन-दुर्जनातला फरक ठरवतो. सज्जनतेचे आणि सहिष्णुतेचे बिरूद ह्याच कारणाने छत्रपतींना शोभून दिसते.        
छत्रपति शिवरायांचे विचार निव्वळ दगडी स्मराकांवर कोरण्यापेक्षा आपल्या मनाच्या भिंतीवर चिरकाल कोरण्याची नितांत गरज आहे. शिवाजी एक युग पुरुष आहेत कारण बसत्यास उठता, उठत्यास चालता व चालत्यास दौडता करण्याचे सामर्थ्य शिवाजी महाराजांमध्ये होते. धर्ममतांविरुद्ध जाऊन परधर्मात गेलेल्या वा बळजबरीने नेल्या गेलेल्या बांधवांसाठी धर्माची दारे शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांना स्वधर्मात घेवून पुरोगामी विचारांनी खुली केली होती.ह्याच पुरोगामी विचाराचा अभाव शिवपुर्वकालीन हिंदुस्थानात प्रकर्षाने दिसून येतो. शिवाजी जसे एक यशस्वी सेनानायक होते तसेच प्रजेचे मायाळू पालक व कल्याणकारी राजाही होते. राजा शिवछत्रपती हे नुसते एक व्यक्ती नाहीत तर प्रतिक आहेत असीम त्यागाचे,अकल्पित शौर्याचे,परमश्रेष्ठ बलिदानाचे, अटळ निश्चयाचे, कर्तव्य कठोर न्यायाचे, मायाळू पालकाचे, प्रभावी वक्त्याचे, चतुर राजकारणाचे, कुशल युद्धनीतीचे, चपळ बुद्धीचे, पुरोगामी विचारांचे, एकीकृत समाजाचे, प्रखर राष्ट्रभक्तीचे. आज जगाच्या इतिहासाचा अभ्यास केल्यावर किती व्यक्तींमध्ये ह्या सर्व समावेशक व परिपूर्ण गुणाचे दर्शन होते ? आणि म्हणूनच काळ छत्रपति शिवरायांना युगपुरुषाचे विशेषण लावण्यास बाध्य होतो.

निश्चयाचा महामेरू  | बहुताजानासी आधारू  ||
अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंतयोगी ||        

जाणता राजा असलेल्या ह्या युगपुरुषाचा निश्चय धर्मग्रंथात सांगितलेल्या महामेरू पर्वतापेक्षा उंच आहे. दबल्या पिचल्या, अत्याचाराने पिडल्या समाजाचा तो आधार आहे. परमवैभवी असूनही रयतेच्या कल्याणात व राष्ट्राच्या उत्थानात धन्यता मानणारा खराखुरा श्रीमंत योगी आहे.

जय भवानी | जय शिवराय ||



चैतन्य देशपांडे
शिवशौर्य प्रतिष्ठान,
अमरावती.


3 comments: