Thursday, 14 April 2016

शुभपर्वारम्भ ...

     नमस्कार ! शिवशौर्य प्रतिष्ठान स्थापनेने खऱ्या अर्थाने आज एक शुभ व गौरवशाली पर्वाचा आरंभ झाला आहे. ह्या पर्वाअंतर्गतच शास्त्र शुद्ध वादनाने आपल्या दैदिप्यमान संस्कृतीच्या जपणुकीसोबतच राष्ट्राच्या संरक्षणासाठी तत्पर असलेली वा प्रसंगी सर्वोच्च बलिदानासाठी तयार असलेली विचारवंत, देशभक्त आणि मनाने तरुण असलेली भारतीयांची फळीच आपल्याला उभी करायची आहे. ह्याचाच एक भाग म्हणून मराठेशाहीच्या व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील परम् बलीदानी क्रांतीकारकांची ओळख आपल्या समस्त परिवारास व्हावी ह्या करिता देशभक्तीने व बलिदानाने ओतप्रोत अशा लेखांची मालिका आपण लवकरच सुरु करणार आहोत.

     आपल्याला समजून घ्यायचा आहे हिंदू धर्मास पुनर्जन्म देणारा श्रीमान योगी राजा शिवछत्रपती, तमाम रयातेसाठी सर्वोच्च बलिदानाचे उदाहरण घालणारे धर्मवीर संभाजी, संभाजीच्या अमानुष वधाने पेटून अवघ्या महाबलाढ्य मोगलशाहीला होरपळून काढणारी मराठी अस्मिता, मोगलशाहीला अतिशय बिकट व फन्दफितुरीच्या मायाजालात निकराचा लढा देणारा स्थिरबुद्धी राजाराम, औरंजेबाच्या डेऱ्याचे कळस कापून नेणाऱ्या संताजी-धनाजी चा गनिमी कावा, मोगलांच्या दख्खन स्वारीची कंबरडे मोडणाऱ्या "हुकुमतपनाह" रामचंद्रपंत अमात्यांची कुशल युद्धनीती, रणझुंजार पहिल्या बाजीरावाची विजयी घौडदौड, बाळाजी बाजीरावाची चतुर राजनीती, परचक्राचे आवतण येताच दिल्लीच्या रक्षणासाठी चित्यासारख्या पळणाऱ्या व "बचेंगे तो और लढेंगे " हि सिंहगर्जना करत बलिदान देणारा दत्ताजी शिंदे, रणचंडीला आपल्या रक्ताचा अभिषेक करणारे भाऊसाहेब पेशवे व हजारो रणझुंजार मराठ्यांचे अकल्पित शौर्य, पानिपतच्या आघाताने खिळखिल्या झालेल्या मराठेशाहिस नेटाने परत उभ्या करणाऱ्या थोरल्या माधवरावांची कळकळ, मराठेशाहीचा झेंडा द्रोहापर्वाच्या काळात डौलाने फडकवणाऱ्या नाना फडणीस-महादजी शिंद्यांची जिद्द, अवघा हिंदुस्थान इंग्रजांच्या कह्यात असताना प्रत्येक रणसंग्रामात इंग्रजांना दे माय धरणी ठाव करणाऱ्या यशवंतराव होळकरांची अखेरची झुंज, १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती देवून पुढच्या अगणित पिढ्यांना देशभक्तीची उब देणारे असंख्य वीर, आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडक्यांचा प्राणपणाचा  लढा, प्लेग च्या साथीत स्थानिकांवर अमानुष अत्याचार करणाऱ्या रँड नावाच्या राक्षसाचा वध करणारे चाफेकर बंधू , परवशतेच्या तमात कोसळत्या आभाळावर पाय ठेवून उभे राहणारे लोकमान्य टिळक, हसत हसत भारतमातेसाठी मृत्यूला कवटाळणारे चंद्रशेखर आझाद - भगत सिंघासारखे असंख्य क्रांतिकारक, ३८ कोटी देशबांधवांसाठी अर्ध्या जगात गरुड भरारी मारणारे सुभाषबाबू  !!!
     
     किती नावे घेऊ, पूर्वेकडून क्षितिजपटलावर उगवणारा चरैवेती प्रभाकर पश्चिमेकडून उगवायला लागेल पण हि महापुरुषांची यादी संपणार नाही. नुसता रोमांच येतो म्हणून ढोल-ताशा वाजवणारे गुळाचे गणपती नव्हे तर देशाच्या संकट काळात भारतमातेच्या रक्षणासाठी वळणाऱ्या मुठी व पेटणारी मने आपल्याला निर्माण करायची आहेत. हाती ढोल-ताशा घेवून संस्कृतीची जपणूक व संवर्धन करणाऱ्या शिवभक्ताने प्रसंगी हाती शस्त्र घेवून सैनिकांच्या खांद्यास खांदा देवून लढणे हे त्याचे परम कर्तव्य आहे असा निर्धार निर्माण करायचा आहे. अतिशयोक्ती वाटते ना ? नाही हि अतिशयोक्ती अजिबात नाही. हे खरे आहे कि आपली शक्ती व संख्या मर्यादित आहे पण आपले हे भारतमातेच्या सेवेतील योगदान इतकेच पवित्र व प्रभावी आहे जितके रामायणात सेतू बांधतांना दिलेल्या खारीचे आहे, ज्याचे उदाहरण आपण आजही देतो.

     हे विचार लिहितांना समर्थांनी शिवछत्रपतीना लिहिलेल्या पत्रातील अमृतमयी मजकुराचे स्मरण होते, 
"या भूमंडळीचे ठाई | धर्मरक्षी ऎसा नाही |
महाराष्ट्रधर्म राहिला काही | तुम्हा कारणे ||"

     त्याच धर्मराक्षिताचे आपण पाईक आहोत. तोच शिवछत्रपतींचा महाराष्ट्राधर्माचा वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे, हा महाराष्ट्रधर्म आहे संस्कृतीच्या जपणुकीचा, भारतमातेच्या संरक्षणाचा व भारताला विश्वगुरु बनविण्याचा. यातीलच एक छोटेसे पाऊल म्हणून नवयुवकांमध्ये देशभक्तीची जीवनज्योती पेटविणारी हि लेखांची मालिका. या पावन पर्वास आम्ही लवकरच सुरुवात करू.

     बस अधिक काय लिहावे , हजारो देशभक्त वीरांच्या बलिदानाने स्वतंत्र झालेला भारतदेश पुन्हा विश्वगुरु बनवा हीच शिव चरणी प्रार्थना !!!

जय भवानी ! जय शिवराय !


चैतन्य देशपांडे 
शिवशौर्य प्रतिष्ठान, 
अमरावती.

No comments:

Post a Comment