Thursday, 26 May 2016

हिंदवी स्वराज्याचा उदयोस्तु !!!



     शिवाजी !!! हे तीन शब्द कानी पडताच मनाचे वारू चौफेर उधळतात, रक्तधमन्या ताठ होऊन आत्म्यास शौर्याचे बाळसे चढते, दिग्विजयी पराक्रम करण्यासाठी बाहू फुरफुरू लागतात, समस्त हिंदूंचा मानबिंदू असलेला भगवा झेंडा अवघ्या विश्वात नाचवण्याची अभिलाषा बळ धरू लागते, आम्हा सर्वसामान्यांच्या आत्म्यास पुनर्जन्माचे वेध लावणारे कोण हे शिवाजी ???
काय ऋणानुबंध त्यांचा नी आमचा ????

     अकल्पितपणे वरील प्रश्नाच्या उत्तराचा घंटानादाप्रमाणे लयबद्ध समर्पक उद्घोष मनात सुरु होतो. सर्वसामान्य ते असामान्यत्वाचा प्रवास घडवणारा श्रीमंत योगी म्हणजे शिवाजी, मृतप्राय झालेल्या हिंदूंच्या स्वाभिमानास पुनश्च गगनचुंबी उभारी देणारा परमवीर म्हणजे शिवाजी, गुलामीचे डोंगर फोडून वाट काढणारा निर्मल जलप्रवाह म्हणजे शिवाजी, अत्याचाराच्या अग्निदाहाचे शमन करणारा वायुदूत म्हणजे शिवाजी, उदधीच्या बेलगाम लाटांस झेलून रोखणारा किनारा म्हणजे शिवाजी, यवनसत्तेच्या लंकेस मनगटाच्या बळाने आणि तलवारीच्या टोकाने होरपळून काढणारा हनुमंत म्हणजे शिवाजी, हिंदवी स्वराज्याचा गोवर्धन करंगळीवर तोलून समस्त रयतेस मायेची सावली देणारा श्रीकृष्ण म्हणजे शिवाजी, रावणस्वरूप यवनांचे मर्दन करून धर्माची पुनर्स्थापना करणारा मर्यादापुरुषोत्तम म्हणजे शिवाजी, फसव्या मायावी रात्रीयुद्धात अधर्मी कौरवांप्रमाणे असलेल्या यवनांवर काळ बनून   कोसळणारा घटोत्कच म्हणजे शिवाजी, अन्यायाच्या समुद्राचे पराक्रमी आचमन करणारा अगस्ती म्हणजे शिवाजी, क्रौर्याचे व अह्वेलनेचे चक्रव्यूह फोडणारा महारथी अभिमन्यू म्हणजे शिवाजी, परवशतेचे हलाहल पिऊन सार्वभौमत्वाची नवी पहाट देणारा महादेव म्हणजे शिवाजी. शिवछत्रपती आणि आपला ऋणानुबंध हा जन्मजन्मांतरीचा आहे. शिवचरित्राचे सखोल अध्ययन करून आपल्याला तो मनात खोलवर रुजवायचा आहे.

     इ.स. १६४४ साली अफझलखानाच्या कटावामुळे आदिलशाहने शहाजीराजांच्या पुणे परगण्याच्या जप्तीचे आदेश काढले आणि हुकुमाच्या तालीमीची जबाबदारी खंडोजी व बाजी घोरपडे कापशीकर ह्या द्वयींवर सोपवली. पुणे प्रांताची नासाडी टाळण्यासाठी उघड संघर्षाचे धोरण शिवछत्रपती व दादोजींनी टाळले आणि पुणे परगणा घोरपड्यांच्या स्वाधीन  झाला. उघड संघर्ष टाळून रोहिरेश्वर डोंगराच्या आश्रयाने लढण्याचा निर्धार करून शिवाजी महाराज आपल्या सवंगड्यांसह रोहिरेश्वराच्या देवालयात आले. हिंदवी स्वराज्यनिर्मितीचा संकल्प मनात पक्का करून स्वराज्यस्थापनेची शपथ जीवाला जीव देणाऱ्या सवंगड्यांसहित रायरेश्वराच्या साक्षीने शिवाजी महाराजांनी वयाच्या १४व्या वर्षी घेतली.

     शिवाजी महाराजांनी तोरणा गड जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली अशी सर्वसाधारण धारणा आहे. James grant duff ह्या इंग्रजी इतिहासकाराने चिटणीस बखरीच्या आधारे तसे विधान केल्याने हा समज जनमानसात रूढ झाला. Grant duff सोडता इतर कोणतेही शिवचरित्र आणि समकालीन पुरावे तोरणा गड जिंकून हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केल्याचे ध्वनित करत नाहीत. इ.स. १६४६ च्या बऱ्याच आधी छत्रपतींची पाऊले हिंदवी स्वराज्यस्थापनेच्या दिशेने पडत होती असे विविध ऐतिहासिक पुराव्यावरून सिद्ध होते. इ.स. १६४२ मध्ये बंगरूळहून पुणे परगण्यात परतल्यानंतर बारा मावळखोरी संघटीत करण्याच्या प्रयत्नासच स्वराज्यस्थापनेचे पहिले पाऊल समजावे लागेल. बंगरूळहून परतल्यानंतर बारा मावळखोरी संघटीत करताना ढमाले देशमुखांकडून कवारीगड दादोजींनी घेतल्याची नोंद सापडते, तसेच इ.स.१६४२-१६४३ मध्ये राजगड हा बेवसाउ किल्ला छत्रपतींच्या नावाने दादोजींनी ताब्यात घेतल्याचे दाखले आढळतात. Grant duff व चिटणीस बखरीने मूळ इतिहासाच्या मांडणीऐवजी तोरणा गडाचा दावा उचलून इतिहासाला सनसनाटी स्वरूप देण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे शिवाजी महाराजांनी आणि दादोजींनी इ.स.१६४२ ते १६४६ मध्ये केलेली बारा मावळखोरी संघटनासारखी अनेक मोलाची कार्ये बरीच झाकोळली गेली. शिवछत्रपती परिपूर्णपणे समजून घेण्यासाठी इतिहास शास्त्रशुद्ध ऐतिहासिक संशोधनाने त्याच्या मूळ स्वरुपात मांडणे अगत्याचे आहे.

     रायरेश्वरास हिंदवी स्वराज्यशपथेनंतर महाराज विद्युतवेगाने स्वराज्यकार्यास लागले. राजगडी १००० - १२०० मावळ्यांचा जमाव जमवून शिवाजी महाराजांनी रोहिड्यावर निकराचे आक्रमण केले आणि रोहिड्याचे पादशाही ठाणे उडवून लावले. हिंदवी स्वराज्याची ध्वजपताका रोहिड्यावर डौलाने फडकू लागली. चांदसिताऱ्याच्या ध्वजसागरास जणू दंड थोपटून मल्लयुद्धाचे आव्हान देऊ लागली. पुणे प्रांत घोरपडे सरदारांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली त्याचदरम्यान शिवाजी महाराजांनी लढाऊ कडव्या मावळ्यांच्या व चतुर मुत्सद्यांच्या मदतीने रोहिडा-राजगडदरम्यानचा,रोहिड्खोरे आणि वेलवंडखोऱ्यातील जुना निजामशाहीचा प्रदेश जिंकून घेण्यास सुरुवात केली. पुणे प्रांतात घोरपडे सरदारांविरुद्ध आघाडी उघडून गनिमी काव्याने घोरपड्यांचा अंमल बसू दिला नाही. शिवाजी आणि दादोजी कोंडदेवांनी मायेने जोडलेले बाजी पासलकर,कान्होजी जेधे इ. भारदस्त वतनदार हिरीरीने स्वराज्यकार्यात भाग घेत होते.

     शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याच्या दिशेने पाऊले पडत असताना इ.स.१६४४ च्या आरंभीपासूनच शहाजीराजे विजापुरास होते. कर्नाटक मोहिमेत फितव्याच्या आरोपावरून कसून चौकशीअंती शहाजीराजांचे निर्दोषत्व सिद्ध झाले आणि आदिलशाहने शहाजीराजांचा यथोचित सन्मान करून त्यांची ५ लक्ष होनांची बंगरूळची जहागीर शहाजीराजांना परत केली. नवाब मुस्तफाखानाच्या चिथावणीनेच अफझलखानाने शहाजीराजांना फसवण्याचा कट रचला,त्यामुळे आदिलशाहची मुस्तफाखानावर खफामर्जी झाली आणि मुस्तफाखानाला आदिलशाहने दस्त करून बेळगाव जिल्ह्यात ठेवले. सुमारे महिनाभर मुस्तफाखान बेळगावच्या कैदेत होता.इ.स. एप्रिल-मे १६४५ च्या सुमारास आदिलशाह व शहाजीराजांमध्ये दिलजमाई झाली. इ.स. १६४५ च्या पावसाळ्यानंतर आदिलशाहने परत खानखानानच्या नेतृत्वाखाली कर्नाटक मोहिम उघडली आणि आदिलशाहने शहाजीराजांची रवानगी कर्नाटक मोहिमेवर केली. कर्नाटक मोहिमेत आदिलशाहीला प्रचंड यश लाभून पाठोपाठ ९ किल्ले शहाजीराजांसमवेत आदिलशाही सरदारांनी काबीज केले, त्यामुळे आदिलशाहच्या मनातील शहाजीराजांविषयीचे किल्मिष पूर्णपणे दूर झाले. शहाजीराजांच्या निष्ठावान चाकरीस्वरूपी इ.स. १६४५ च्या अखेरीस दादोजी कोंडदेवांवर पुन्हा पुणे परगण्याचा कारभार सोपवण्यात आला. राजगड, तोरणा इ. महाराजांनी ताब्यात घेतलेले किल्लेहीबंदोबस्तासाठीशिवाजी महाराजांच्या ताब्यात ठेवण्यात आले.

     इ.स.१६४४-१६४५ ह्या २ वर्षाच्या कालखंडात शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वास बहुरूपी आयाम लाभले. हिंदवी स्वराज्याच्या मनातील आराखड्यांना अनुभवाची जोड मिळून छत्रपतींची विचारशीलता आणि योजनाशक्ती अधिक सुदृढ झाली. ज्या पुणे परगण्यात स्वराज्याची मुहूर्तमेढ झाली होती त्या परगण्यात आपला मित्र कोण आणि अंत्यस्थ  शत्रू कोण ह्याचा बहुमुल्य अनुभव मिळाला. घोरपडे सरदारांविरुद्ध वापरलेले गनिमी काव्याचे महत्व छत्रपतींच्या मनावर कायमचे ठसले. मर्यादित शक्तीसामर्थ्य असूनही महाबलाढ्य पादशाहीचा मुकाबला आपण दुर्गम,दुर्दम्य अश्या निसर्गदाटीचा प्रभावी अस्त्र म्हणून वापर करून करू शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला.

     इ.स.१६४५ च्या आसपासच शिवाजी महाराजांनी स्वतंत्रपणे स्वराज्याचा कारभार व न्यायनिवडा करणे सुरु केल्याचे आढळते. रांझे गावाची पाटीलकी बावाजी गुजराकडे होती. रांझेकर पाटील बावाजी गुजराकडून काही कारणाने बदअंमल झाल्याचा करीणा छत्रपतींच्या कानावर गेला. महाराजांनी स्वतः केलेल्या निवाड्याअंतर्गत रांझेकर पाटलाचा दोष सिद्ध झाला आणि पाटलाचे हात-पाय कलम करण्याची शिक्षा महाराजांनी ठोठावली. रांझेकर पाटील निपुत्रिक होता, त्यामुळे रांझेकर पाटलाच्या पालनपोषणाची व्यवस्था सोनजी गुजरावर सोपवून महाराजांनी सोनजीस रांझे गावची पाटीलकी दिली. रांझेकर पाटीलाच्या निवाड्याने महाराजांच्या कर्तव्यकठोर न्यायासोबतच त्यांच्या ठायी असलेली दयाशीलता व प्रजावत्सलता अधोरेखित होते. न्याय व निष्ठुरतेमधला फरक शिवाजी महाराजांनी रांझेकर पाटीलला शासन करण्यासोबतच त्याच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था लावून दाखवून दिला. रांझेकर पाटलाच्या निवाड्यातून छत्रपतींच्या समतोल बुद्धीचा परिपूर्ण परिचय आपल्याला होतो.

     इ.स. १६४६ साली दादोजी कोंडदेव शहाजीराजांच्या भेटीसाठी कर्नाटक प्रांती गेल्याच्या दाखला आढळतो. इमान, निष्ठा व चिकाटीने भोसले कुळाची सेवा करणाऱ्या दादोजी कोंडदेव गोचिवडेंचे आता वय झाले होते. १२ मावळ प्रांताची वर्धिष्णू शक्ती दादोजींनी छत्रपतींच्या पदरी बांधली होती. छत्रपतींच्या सर्वगुणसंपन्न अशा व्यक्तिमत्व विकासामागे असलेले दादोजींचे योगदान दुर्लक्षून चालणार नाही. छत्रपतींचे पुंडाईचे (स्वराज्यनिर्मितीचे) धोरण दादोजींना फारसे पसंत नसले तरी ह्यामागचे कारण हे गुलामी मानसिकता मुळीच नसून शिवबांच्या काळजीपोटी त्यांची त्याला नापसंती होती. शहाजीराजांची भेट घेऊन जीवघेणा आजार घेऊनच दादोजी दक्खनेत परतले आणि इ.स. ७ मार्च १६४७ रोजी दादोजी कोंडदेवांचा मृत्यू झाला.

     दादोजींच्या मृत्यूने वयाच्या अवघ्या १७-१८व्या वर्षी स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी महाराजांच्या खांद्यावर पडली. पैलू पाडल्याने जसे हिऱ्याचे स्वरूप तेजाने आणि सौंदर्याने झळाळून निघते तसेच कर्तबगार पुरुषाच्या कर्तुत्वाची चुणूक पुरुषाच्या अंगावर जबाबदारी पडल्यावरच बघयला मिळते. दादोजींच्या आजारपणातच विजापूरचा मुहम्मद आदिलशाहही गंभीर दुखण्याने आजारी पडला आणि आदिलशाहीची संपूर्ण सूत्रे बडी बेगमसाहिबाच्या हाती एकवटली. तत्पूर्वीच वजीर मुस्तफाखानाच्या नेतृत्वाखाली मोठी फौज कर्नाटकात रवाना झाली होती. शहाजीराजांच्या पराक्रमाने आणि आदिलशाहीची मोठी फौज कर्नाटकात गुंतल्याने स्वराज्यास काहीशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती. ह्या अनुकूल परिस्थितीचा लाभ हिंदवी स्वराज्यासाठी  उठवण्याचा निर्धार शिवाजी महाराजांनी मनात पक्का केला आणि विश्वाला गवसणी घालण्याच्या ईर्षेने पंख पसरून हिंदवी स्वराज्यरूपी गरुडाने पारतंत्र्याच्या घरट्यातून स्वतंत्रतेच्या आकाशात उत्तुंग गरुडभरारी घेतली.

जय भवानी !!!! जय शिवराय !!!!

चैतन्य देशपांडे
शिवशौर्य प्रतिष्ठान,
अमरावती.

Thursday, 19 May 2016

बारा मावळचे शिलेदार व स्वराज्याची नांदी ....

     आज अनेक राष्ट्रपुरुषांच्या चरित्राचा तर्कसंगत अभ्यास केल्यावर असे ध्यानी येते की शिवचरित्र हे विविध राष्ट्रपुरुषांच्या स्फूर्तीदायी कार्याची जीवनज्योती आहे.टिळक,सावरकरांसारखे अनेक राष्ट्रपुरुष शिवचरित्राचा अभ्यास करूनच राष्ट्रसेवेचा गर्भितार्थ मनात खोलवर रुजवू शकले.तसेच आपल्यालाही उद्याचे लाखाचे पोशिंदे उभे करण्यासाठी शिवचरित्र हे एक प्रभावी साधन आहे.”शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरी” ह्या बौद्धिक विकृतीस फाटा देऊन आता “शिवाजी जन्मावा तो घरोघरी” अश्या वैचारिक निर्धारास बळ द्यायचे आहे.शिवछत्रपतींची डोळ्यात साठवून ठेवण्यासारखी असंख्य रूपे शिवचरित्रकारांनी महत्प्रयासाने चितारली आहेत,ह्या चरित्रांच्या परिपूर्ण अभ्यासानेच आपण नवयुवकांमध्ये राष्ट्राचेतनेचा खळखळणारा समुद्र निर्माण करू शकू.

     धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात शिवछत्रपतींचे स्मरण करताना श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
                           
शिवरायांचे आठवावे रूप  | शिवरायांचा आठवावा प्रताप  ||
शिवरायांचा आठवावा साक्षेप  | भूमंडळी  ||
शिवरायांचे कैसे बोलणे  | शिवरायांचे कैसे चालणे  ||
शिवरायांचे सलगी देणे | कैसे असे  ||

     मराठी घरात जन्म घेऊनही मराठी सोडून इतर भाषांवर प्रभुत्व असलेल्या शिवभक्तांसाठी ह्याचा मतितार्थ असा की,

“Remember how he was..Remember what he achieved..Remember his valour..Remember how he thought..While on this earth..Remember his glorifying persona..Remember how he walked Remember how he talked..Remember how dearly he loved his people”


     शिवछत्रपतींच्या धर्मकार्याचे व परिपूर्ण स्वरूपाचे स्मरण छत्रपती संभाजीना करून देऊन नवउत्साहाने हिंदवी स्वराज्याचे दैवी कार्य करण्याचा उपदेश समर्थ संभाजीराजांना करतात.समर्थांचा हा समर्पक उपदेश आजही आम्हास तंतोतंत लागू पडतो.शिवछत्रपतींचे व्यक्तिमत्व नुसते अभ्यासून नव्हे तर अंगीकारून स्वातंत्रोत्तर पावनपर्वात भारताला विश्वगुरु बनवण्याचे स्वप्न बघणारे राष्ट्रपुरुष तुमच्या-आमच्यातूनच घडतील.

     इ.स. मे १६४२ च्या सुमारास शिवछत्रपती स्वतंत्र ध्वज,पेशवा,अनुभवी मुत्सद्दी,सैन्य व धनसंपत्तीसह बंगरूळहून पुणे प्रांतास परतले.कर्तबगार मुत्सद्द्यांची साथ लाभल्याने बाल शिवबा व दादोजी नवचेतनेने व सुदृढ आत्मविश्वासाने स्वराज्याकार्यास लागले.दादोजीपंतानी पुणे परगण्यात परतताच बारा मावळे काबीज केली असा सूचक उल्लेख सभासदाने केला आहे.पुणे जहागिरीत जी बारा मावळखोरी येतात ती पुढीलप्रमाणे आहेत १)अंदर मावळ २)नाणे मावळ ३)पवन मावळ ४)घोटण मावळ ५)मोसे मावळ ६)मुठे मावळ ७)गुंजन मावळ ८)वेळवंड मावळ ९)कर्यात मावळ १०)जुने मावळ ११)हिरडस मावळ १२)शिरवळ मावळ.भौगोलिकदृष्ट्या अतिदुर्गम अश्या मावळ मुलुखाचे वर्णन करताना समर्थ लिहितात,”दरे शृंग पाठार मैदान दारी,कपारे गव्या विवरे ती भुयारी”.उंच बोडखे सुळके,मोकाट पसरलेली पठारे,गर्द झाडीची वने,नागमोडी वेडेवाकडे घाट व कातळ कडेकपाऱ्यानी नटलेला हा प्रदेश आहे.६ लक्ष फौजेचे चतुरंग सेनाबळ घेऊन हिंदवी स्वराज्य चिरडण्याच्या राक्षसी लालसेने दक्खनेत उतरलेल्या औरंगजेबास ह्याच सह्यांद्रीच्या कडेकपाऱ्यानी व दुर्लभ्य अश्या गडकोटांनी २५ वर्ष झुंजवत ठेवले.दक्खन जिंकण्याची अभिलाषा मनात घेऊन दक्षिणेत उतरलेला औरंगजेब सह्याद्रीच्या उत्तुंग,अभिमानी अश्या निसर्गदाटीसमोर व मराठी आत्मबळासमोर पराभूत झाला व इथेच संपला.स्वतंत्रतेच्या मराठी अस्मितेने औरंगजेबाच्या महात्वाकांक्षी सत्तालालसेला २५ वर्षे दिलेली झुंज ही शिवचरित्राइतकीच प्रेरणादायी व रोमांचक आहे.मराठ्यांच्या ह्या दैदिप्यमान संगरतांडवाचा अभ्यासही आपण यथावकाश करूच.

     मावळखोऱ्यात शेकडो वर्षांपासून मावळे देशमुखांची घराणी नांदत होती.अतिदुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे पादशाहीचे मावळ प्रांतावर असलेले प्रभुत्व हे नामधारी होते.मावळे देशमुख हेच मावळप्रांताचे खरेखुरे सर्वसत्ताधीश होते.प्रत्येक मावळखोरे हे देशमुखांच्या मुठीतील स्वयंभू व वर्धिष्णू शक्ती होती.वर्षानुवर्षाच्या सत्ताउपभोगाने आंडदांड बळजोरी मावळखोऱ्याच्या देशमुखांच्या अंगवळणी पडली होती.बारा मावळचे हे देशमुख अंतर्गत यादवीत एकमेकांच्या यथेच्च उखाळ्यापाखाळ्या काढीत.”बळी तो कान पिळी” असा मावळखोऱ्याचा शुद्ध न्याय होता.बारा मावळखोऱ्याची एकीकृत शक्ती आपल्या पाठीशी उभी केल्यास हिंदवी स्वराज्यनिर्मातीच्या स्वप्नास मोठे पाठबळ लाभेल हे बाल शिवबा,दादोजी व अनुभवी मुत्सद्द्यांनी ताडले.देशमुखांच्या स्वच्छंद बळजोरीस शह देऊन त्यांना धर्मकार्याच्या एका सुत्रात गोवण्याचे शिवधनुष्य दादोजींनी उचलले.साम-दाम-दंड-भेद ह्या कृष्णनीतीचा अवलंब करून बारा मावळचे देशमुख आपल्या बाजूने वळवण्याच्या कार्यास त्यांनी आरंभ केला.रामाजी चोरघे ठार केला.फुलाजी नाईक शिमळकर बांबूने ठोकून शरण आणले.कान्होजी जेधे देशमुखांचा थेट शहाजीराजांशी घरोबा असल्याने ते शिवबाराजे व दादोजींच्या पक्षाचे होते.दादोजींसमोर खरे आव्हान होते ते कृष्णाजी नाईक बांदालाचे.बांदल व जेधे देशमुख हे एकमेकांचे जन्मजन्मांतराचे कट्टर हाडवैरी होते.कृष्णाजी नाईक बांदल व कान्होजी जेधे ह्यांच्यातही संघर्षाची ठिणगी अनेकदा उडाली होती.जेध्यांनी एकदा महात्पराक्रम गाजवून बांदलाना नांदगावच्या संग्रामात नारमोहम केले होते,पण कृष्णाजी नाईक बांदलाने पुढील संग्रामात एका रणझुंजार सहकाऱ्याच्या मदतीने जेध्यांना परास्त करून कारी गाव लुटून फस्त केला होता.बांदलांचा तो रणझुंजार शिलेदार म्हणजे महाभारतातील अभिमन्यूप्रमाणे शिवाजी महाराजांसाठी ४ प्रहर(१ प्रहर म्हणजे ३ तास) चिवट झुंज देऊन गजापुरची खिंड स्वतःच्या रक्ताने व बलिदानाने पावन करणारा बाजीप्रभू देशपांडे !!!!!!! काळ किती बलवान असतो बघा.एकमेकांचे कट्टर हाडवैरी हेच बांदल-देशमुख पुढील काळात खांद्यास खांदा लावून हिंदवी स्वराज्य वृद्धिंगत करण्यासाठी लढले.हिंदवी स्वराज्यासाठी मृत्युवेदीवर प्राणाचे बलिदान करून इतिहासात अजरामर झाले.

     कृष्णाजी बांदलाने बारा मावळखोरी जबरीने आपल्या ताब्यात ठेवली होती.कृष्णाजीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी दादोजी कोंडदेवांनी हिरडस मावळावर आक्रमण केले पण कृष्णाजी व बाजीप्रभूंनी पराक्रमाची शर्थ करून दादोजींचा पराभव केला.अखेर दादोजींनी कान्होजी जेध्यांकडून कृष्णाजी बांदलास भेटीचा निरोप धाडला.त्यानुसार कृष्णाजी बांदल दादोजींना सिंहगडी येऊन भेटला.नानाप्रकारे मनधरणी करूनही कृष्णाजी बांदलाने आडमुठी भूमिका कायम ठेवल्याने दादोजीपंतानी अखेर कृष्णाजी बांदलास कैद करून  त्याचे हात-पाय कलम केले व खऱ्या अर्थाने शिवबाराजांची बारा मावळावर सत्ता प्रस्थापित झाली.

     कान्होजी देशमुख जेध्यांप्रमाणे बारा मावळचे एक मातब्बर वतनदार मोसे खोऱ्याचे बाजी पासलकर स्वराज्यसूत्राच्या जपमाळेत जुळले.बाजी पासलकर हे साक्षात कान्होजींचे श्वसुर होते.देशमुख-जेधे व पासलकरांच्या प्रभावाने हळूहळू सारी मावळखोरी महाराजांकडे रुजू होऊ लागली.कानद खोऱ्यातील झुंजारराव मरळ देशमुख,गुंजन मावळचे हैबतराव शिमळकर,खेडेबाऱ्याचे कोंडे देशमुख व मुठे खोऱ्यातील पायगुडे देशमुख असे सारे भारदस्त वतनदार दादोजी कोंडदेवांनी मायेनी स्वराज्यकार्यासाठी जोडले.दादोजींच्या दूरदृष्टीने व अनमोल कार्याने बारा मावळची अमोघ शक्ती शिवबांच्या पाठीशी स्वराज्यनिर्मितीसाठी उभी केली.

     मावळखोरी संघटीत करण्याचे अवघड कार्य संपन्न होताच दादोजी व शिवबांनी जहागीरीतील किल्ल्यांवर लक्ष केंद्रित केले.भीमा व नीरा नदीमधील प्रदेश जहागीर म्हणून मिळाला म्हणजे फक्त मुलुख ताब्यात होता.पुरंदर,चाकण,तोरणा,राजगड,रोहिडा,सुभानमंगळ,कोंढाणा इ. असे सारे किल्ले आदिलशहाच्या नामजाद सुभेदारांच्या ताब्यात होते.किल्ल्यांचे महत्व हे मोकळ्या मुलुखापेक्षा जास्त होते.किल्ले ताब्यात घेणे म्हणजे सरळसरळ स्वराज्यनिर्मितीच्या कार्यास आरंभ करणे असा अर्थ होता.त्यामुळे शिवबा व दादोजींची पावले सावधगिरीने पडत होती,तरीही ढमाले देशमुखांकडून कवारीगड दादोजींनी घेतल्याची नोंद आढळते.

     सारी मावळखोरी एकसूत्रात गोवण्याचे शुभकार्य सुरु असतानाच इ.स.१६४३ मध्ये रणदुल्लाखानाच्या मृत्यूने शिवबा व शहाजीराजांच्या जीवनाला अनपेक्षित वळण लाभले.रणदुल्लाखान व शहाजीराजांचे घरोब्याचे संबंध होते.रणदुल्लाखान हा आदिलशाहीचा मातब्बर सरदार असल्याने त्याचा पक्ष इ.स. १६४३ पर्यंत आदिलशाही दरबारात प्रबळ होता,पण रणदुल्लाखानाच्या मृत्यूने शहाजीराजेविरोधी मुस्तफाखान,अफझलखान,बाजी घोरपडे इ. सरदारांचे फावले व शहाजी महाराजांबरोबर कर्नाटकात असलेल्या अफझलने चंदीच्या राचेवार मराठ्यांना शहाजीराजे फितूर असल्याची “बदगोह” आदिलशाहला कळवली.इ.स. ऑगस्ट १६४३ मध्ये आदिलशाहने शहाजीराजांना दरबारी हजर होण्याचे फर्मान काढले,तसेच पुणे जहागिरीच्या जप्तीचेही आदेश काढले.शहाजीराजांनी हुकुमाच्या तालीमीची टाळाटाळ आरंभिली व इ.स.१६४४ च्या आरंभीच ते विजापुरास निघून आले.

     पुणे परगण्याच्या जप्तीस आदिलशाहने खंडोजी व बाजी घोरपडे कापशीकर ह्यास नामजाद केले.स्वराज्य संस्थापनेस आदिलशाहीचे हे आक्रमण तात्कालिक कारण ठरले.शिवछत्रपतींच्या मनातील हिंदवी स्वराज्याची संकल्पना मूर्त स्वरूप घेऊ लागली होती.दादोजींचा चोख कारभार व माणसे जोडण्याची कला त्यांनी अंगीकारायला सुरुवात केली होती.जिजाऊमातेची प्रजावत्सलता व न्यायनिष्ठीत लोककल्याणकारी धोरणेही त्यांच्या मनावर ठसत होती.यावेळी महाराजांचे वय फक्त १४ वर्षे होते.बारा मावळची समर्थ शक्ती त्यांच्या पाठीशी उभी होती.बाजी पासलकर,कान्होजी नाईक जेध्यांसारखे अनुभवी मुत्सद्दी तसेच तानाजी व सूर्याजी मालुसरे,येसाजी व कोंडाजी कंक,सूर्यराव काकडे,बाजी जेध्यांसारखे जीवास जीव देणे साथीदार लाभले होते.

      घोरपडेंच्या आक्रमणाने पुणे परगण्याची नासाडी थांबवण्यासाठी उघडपणे संघर्ष देण्याचे धोरण दादोजी व शिवबांनी टाळले.पुणे परगणा घोरपड्यांच्या ताब्यात जाऊन त्यांनी त्रिंबकजी राजे ह्यांच्यावर कारभार सोपवला.रोहिरेश्वराच्या डोंगराच्या आश्रयाने घोरपडेंचा मुकाबला करण्याचे शिवछत्रपती व दादोजींनी ठरवले.छत्रपतींच्या आयुष्यातील बालपर्व संपून पराक्रमी नवपर्वाचा आरंभ होण्याचा हा काळ होता.मनात घर करून बसलेल्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेस प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ जवळ आली होती.छत्रपतींच्या मनाला ३५० वर्षांच्या गुलामगिरीचे पाश तोडून टाकण्याची अनामिक ओढ लागली होती.अशा मनस्थितीतच राजे रोहिडखोऱ्यातील भोर तालुक्यात रायरेश्वराच्या शंभूमहादेवाच्या दर्शनास आले.गुलामगिरीचे बंध झुगारून हिंदवी स्वराज्याचा निर्धार मनात पक्का झाला व परकीय यवनी सत्ता भारतवर्षाच्या क्षितीजपटलावरून समूळ नाहीशी करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची भीष्मप्रतिज्ञा शिवछत्रपतींनी वयाच्या १४व्या वर्षी घेतली.३५० वर्षांच्या गुलामगीरीने जंगलेली हिंदुत्वाची तलवार छत्रपतींच्या स्वराज्यशपथेने नवतेजाने तळपू लागली.

जय भवानी !!!!!! जय शिवराय !!!!!!

चैतन्य देशपांडे
शिवशौर्य प्रतिष्ठान,
अमरावती