Thursday, 9 June 2016

यवनी भस्मासुराचा पराभव....



यवनी भस्मासुराचा पराभव
            युगोयुगांपासून धर्म नावाच्या विचारशक्तीने आयुष्याच्या अंधाऱ्या गुहेत प्रकाशमय पलिता होऊन मनुष्यप्राण्यास उत्थानाचा मार्ग दाखवला आहे. मानवता आणि धर्माचे जन्मजन्मांतरीचे दुध-पाण्याचे नाते आहे. किंबहुना मानवतेच्या विचारातूनच धर्म ह्या संकल्पनेचा जन्म झाला आहे. मानवी सभ्यतेचा संपूर्ण इतिहास बघता धर्माच्या नावाखाली अमानुष अत्याचार व नरसंहाराचे अगणित दाखले आढळतात, त्यामुळे धर्म हा मानवतेचा रक्षक नसून भक्षक आहे असा अपसमज मूळ धरणे स्वाभाविक आहे. इतिहासाचा सखोल अभ्यास केल्यावर संपूर्ण विचारांती असे लक्षात येते की जगातील अनेक राजा-महाराजांनी व धर्माची झूल पांघरणाऱ्या ढोंग्यानी धर्माच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःच्या साम्राज्यवादाची महात्वाकांक्षी राक्षसी वासना पूर्ण करून घेतली. इतिहासात अत्याचारांचे राक्षसी संगरतांडव हे एखादा विशिष्ट धर्मच वाईट आहे म्हणून मुळीच घडले नाही तर आपल्या धर्माच्या सदगुणी विचारांच्या प्रसारासाठी इतिहासातील काही व्यक्तींनी  अत्याचाराचा अवगुणी मार्ग निवडला म्हणून घडले. धर्माच्या विवेकी विचाराचा अज्ञानी मनुष्याकडून अविवेकी व राक्षसी विपर्यास केला गेला.

            वास्तविकतः कुठलाही धर्म हे एक दुधारी शस्त्र आहे. धर्म नावाची  दुधारी तलवार मानवतेच्या रक्षणासाठी वापरायची की भक्षणासाठी वापरायची हे संपूर्णपणे ज्या-त्या बलवान पुरुषाच्या विवेकबुद्धीवर व सारासार विचारशक्तीवर विसंबते. इतिहासात जसे धर्माच्या नावाखाली मानवतेचा निर्घुण खून करणारे नरकासुर आहेत तसेच शिवाजी महाराजांसारखे धर्माच्या छत्रछायेखाली अत्याचारांचा आगडोंब विझवून मानवतेची पताका डौलाने फडकवणारे युगपुरुषही आहेत. शिवाजी महाराजांसारख्या थोर वीरपुरुषांच्या चरित्राचा अभ्यास करून आपण धर्म नावाचे विचारअस्त्र मानवतेच्या संरक्षणासाठी कामी लावूया. धर्म म्हणजे अफूची गोळी सारख्या भ्रमित विचाराला तिलांजली देऊन धर्म म्हणजे मानवतेचा अंगरक्षक अशा विचाराला थारा देऊया.

            इ.स.मार्च १६४८ मध्ये कोंढाणा स्वराज्यात दाखल झाला आणि महाराजांच्या समर्थ नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्याचा यवनी आदिलशाहीशी उघड संघर्षाचा शंखनाद झाला. महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहने फतहखान खुदावंतखानास नामजाद केले. इ.स.ऑगस्ट १६४८ मध्ये फतहखानाची स्वराज्यावर स्वारीची जोरकस तयारी सुरु असतानाच महाराजांनी फतहखानाशी मुकाबल्यासाठी पुरंदरची निवड केली. इ.स.१६४८ च्या पावसाळ्यातच चपळाईने हालचाली करून महाराजांनी पुरंदरचे राजकारण केले व चढाई-लढाईविना पुरंदर हस्तगत केला. शिवाजी महाराज पुरंदरच्या राजकारणात व्यग्र असतानाच मुस्तफाखानाने शहाजीराजांना दगाबाजीने कर्नाटकात कैद केल्याची भल्याभल्यांचे मनोबल हादरवणारी खबर स्वराज्यात येऊन धडकली.
                इ.स.१६३७ पासूनच आदिलशाहच्या हुकुमाने शहाजीराजे बहुतांशी कर्नाटकातच होते. तालीकोटा व राक्षसतागडीच्या रणसंग्रामात पराभव पत्करावा लागल्यामुळे विजयनगरचे वैभवी साम्राज्य रसातळाला गेले असले तरी दक्षिणेत ठिकठिकाणी हिंदू संस्थानिकांच्या रूपाने विजयनगर साम्राज्याचे विखुरलेले अंश अस्तित्वात होते. कर्नाटकात पोहोचताच शहाजीराजांनी वर्षानुवर्षे अखंड मेहनत घेऊन हिंदू संस्थानिकांचा विश्वास संपादन केला. रणदुल्लाखानाचा शहाजीराजांशी घनिष्ठ घरोबा असल्याने रणदुल्लाखानाने कर्नाटक मोहीम शहाजीराजांच्या सल्ल्यानेच चालवली. इ.स. १६४३ मध्ये रणदुल्लाखानाच्या मृत्यूनंतर खानखानाननेही शहाजीराजांच्या चालीनेच कर्नाटक मोहीम राबवली. मुस्तफाखान मात्र शहाजीराजांचा कट्टर द्वेष्टा असल्यामुळे कर्नाटक मोहिमेचे नेतृत्व मुस्तफाखानाकडे येताच त्याने शहाजीराजांची कोंडी करण्यास सुरुवात केली. शहाजीराजांनी दक्षिणेतले हिंदू संस्थानिक आपल्या पंखाखाली घेऊन एकप्रकारे संपूर्ण कर्नाटक प्रांतच हस्तगत केल्याने विजापूर दरबारातील  शहाजीविरोधी पक्ष अस्वस्थ झाला होता. शहाजीराजांचा पक्का बंदोबस्त करायचा निर्धार करून मुस्तफाखानाने इ.स.१६४८ मध्ये कर्नाटकात पोहोचताच फितव्याचा कटाव करून शके १५७० श्रावण वद्य प्रतिपदेला (२५ जुलै १६४८) शहाजीराजांना दगाबाजीने जिंजीनजीक कैद केले. नवाब मुस्तफाखानाने शहाजीराजे कैद होताच तानाजी डूरे, विठ्ठल गोपाळ व फरहादखान ह्या सरदारांना बंगरूळ सुभा काबीज करण्यास रवाना केले, त्यामुळे पुणे परगण्यात फतहखानाशी शिवबा आणि बंगरूळ सुभ्यात मुस्तफाखानाच्या नामजाद सुभेदारांशी संभाजी अशा दोन्ही शहाजीपुत्रांवर भोसलेकुळाच्या अस्तित्वासाठी लढा देण्याची वेळ आली.

            इ.स.१६४८ मध्ये पावसाळा संपताच सहस्त्रावधी मातब्बर फौजेसहित प्रचंड युद्धसामग्री घेऊन फतहखान स्वराज्यावर चालून आला. १८-१९ वर्षांच्या शिवछत्रपतींच्या पौरुषत्वाची व पराक्रमाची ही पहिली निकराची कसोटी होती. इ.स. ऑक्टोबर १६४८ मध्येच खानाशी मुकाबल्याची जय्यत तयारी करून महाराज पुरंदरवर मुक्कामी होते. पुरंदर हा बलदंड किल्ला स्वराज्याच्या सीमेवर मोक्याच्या ठिकाणी असल्याने फतहखानाला कोंढाण्यावर सरळ चालून जाणे शक्य नव्हते, त्यामुळे फतहखानाने पुरंदरच्या अलीकडेच बेलसरला तळ ठोकला. बेलसरहून पुरंदर पश्चिमेस फक्त १० मैल अंतरावर होता. बेलसर तळावरून जणू अहंकारी यवनी अधिसत्ताच सार्वभौम तेजःपुंज हिंदवी स्वराज्याला प्राणांत द्वंदयुद्धाचे आव्हान देत होती. फतहखानाने बेलसर मुक्कामी पोहोचताच बाळाजी हैबतरावाच्या नेतृत्वाखाली फाजलशाह व आशफशाह ह्या नामांकित सरदारांसोबत काही फौज शिरवळ ठाणे व सुभानमंगळचा भुईकोट ताब्यात घेण्यासाठी पाठवली. बाळाजी हैबतराव शिरवळवर चालून आला व महाराजांच्या सैन्याकडून त्यास फारसा प्रतिकार न होता त्याने शिरवळ ठाणे व सुभानमंगळ किल्ला फत्ते केला. शिरवळ ताब्यात घेऊन पुरंदरचा रसद पुरवठा तोडणे शक्य होते, तसेच सासवड व शिरवळवरून दुहेरी आक्रमण करून महाराजांना संपूर्णपणे कोंडीत पकडणे शक्य असल्यानेच फतहखानाने सर्वप्रथम मोक्याचे शिरवळ ठाणे काबीज केले. फतहखानाची स्वारीतील एकूण नीती व धोरणे लक्षात घेता तोही काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता असे लक्षात येते. फतहखानाच्या प्रभावी लष्करी धोरणाचा अभ्यास करूनच छत्रपतींचे सामर्थ्य व पुरंदरवरील त्यांच्या दूरगामी आणि प्रभावशाली विजयाचे महत्व आपण समजू शकू. फतहखान बेलसरला मुक्कामी पोहोचण्यापूर्वीच बारा मावळची देशमुख मंडळी व सरदार-दरकदार पुरंदरवर फौजफाट्यासहित हजर झाले होते. महाराजांकडे पुरंदरवर असलेली मर्दमावळ्यांची शिबंदी ३-४ हजाराच्या घरात होती.गुंजण मावळचे शिळमकर देशमुख, मोसे खोऱ्याचे बाजी पासलकर, कारीचे बाजी कान्होजी जेधे, हिरडस मावळचे बाजी बांदल(बाजीप्रभू), गोदाजी जगताप, भिमाजी वाघ, संभाजी काटे, कावजी मल्हार असे सारे मातब्बर लढवय्ये खंदे वीर झाडून स्वराज्यरक्षणासाठी पुरंदरवर जमा झाले होते. आता फक्त हिंदवी स्वराज्याच्या महाराजरूपी श्रीकृष्णाने दैदिप्यमान विजयाच्या दिशेने पांडवरुपी सरदारांचे सारथ्य करण्याची गरज होती.

       फतहखानाला गर्दीस मिळवण्यासाठी शिरवळ ठाणे काबीज करणे अत्यंत निकडीचे होते. शिरवळ काबीज करण्यासाठी महाराजांनी कावजी मल्हारच्या नेतृत्वाखाली गोदाजी जगताप, भिमाजी वाघ इ. परमवीरांसोबत मातब्बर फौज रवाना केली. महाराजांना प्रणाम करून युद्धाच्या आत्यंतिक आवेशाने कावजी मल्हार फौजेसह रणगर्जना करत शिरवळवर चालून गेला. रात्र पुरंदरच्या तळाशी घालवून सौविरी प्रभाकर क्षितीजपटलावर येताच कावजी मल्हार ७ कोसांचे अंतर त्वेषाने पार करून शिरवळला पोहोचला. महाराजांच्या आक्रमणाची कुणकुण लागताच बाळाजी हैबतरावाने युद्धाची तयारी केली. कोटाचा दरवाजा बंद करून तटाच्या आश्रयाने कावजी मल्हारला चिवट झुंज देण्याची तयारी बाळाजी हैबतरावाने केली. रणमदाने बेभान झालेला कावजी मल्हार सैन्यासहित कोटाजवळ येऊन थडकला. पाहता पाहता हिंदवी स्वराज्याच्या लढवय्या मावळ्यांनी कोटाला घेरून खणत्या लावल्या व शिड्या टाकून कोटात शिरायचा प्रयत्न सुरु केला. वरून होणाऱ्या चाके, नांगर, दगड-धोंडे, उकळते तेल इ. माऱ्याची पर्वा न करता जिगरबाज मराठ्यांनी तटाला खिंडार पाडले व जीवाला जीव देणाऱ्या साथीदारांसहित कावजी मल्हार सुभानमंगळ कोटात शिरला. कोटामध्ये आदिलशाही फौज व मराठ्यांमध्ये विजयश्रीसाठी निकराची हातघाई सुरु झाली. युद्धाच्या धुमश्चक्रीत पहिल्याच झपाट्यात इंगळ्याने २५, पोळाने १२, घाटग्याने २३, भिमाजी वाघाने १६ तर कावजी मल्हारने १९ उत्तम योद्धे ठार केले. कावजी मल्हारच्या रूपाने जणू अजिंक्य, परमवीर महादेवपुत्र कार्तिकस्वामीच यवनांचा संहार करू लागला. युद्धाच्या तांडवपर्वातच बाळाजी हैबतराव व कावजी मल्हारची गाठ पडली. दोन्ही शूर सरदारांमध्ये तुंबळ युद्ध जुंपले. आदिलशाही व हिंदवी स्वराज्याच्या भविष्याचा निर्णय जणू ह्या हाणामारीतूनच होणार आहे अशा आवेशाने हैबतराव व कावजी लढू लागले. अखेर कावजीने भाल्याचा निर्णायक वार करून हैबतरावाचे मर्दन केले. नेता नाहीसा होताच आदिलशाही सैन्याचे धैर्य खचले व मराठ्यांनी आदिलशाही फौजेचा दणदणीत पराभव करून सुभानमंगळ काबीज केला. हिंदवी स्वराज्याच्या पादशाही आक्रमणाशी हा पहिलाच सामना असल्याने सुभानमंगळच्या विजयाला आणि कृष्ण-अर्जुनालाही तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या कावजी मल्हारच्या पराक्रमाला मोठे महत्व प्राप्त होते.

       सुभानमंगळ काबीज होताच शिवाजी महाराजांनी विद्युतवेगाने खुद्द बेलसरलाच फतहखानाच्या छावणीवर हल्ला करण्यासाठी एक तुकडी रवाना केली. या तुकडीचे नेतृत्व कोणाकडे होते हे कळत नसले तरी बहुदा ते ६० वर्षांच्या अनुभवी वीर बाजी पासलकरांकडे असावे. बेलसरच्या छावणीवर मराठ्यांच्या तुकडीने अकस्मात हल्ला केला पण इथे मात्र आदिलशाही फौजेने मराठ्यांना चिवट झुंज दिली व खळद-बेलसरच्या लढाईत महाराजांच्या फौजेला पराभव चाखावा लागला. खासे बाजी पासलकर निष्ठेने स्वराज्यसेवा करत ह्या युद्धात कामी आले. खळद-बेलसरच्या लढाईत विजयी ठरलेल्या फतहखानाला शिरवळच्या पराभवाची वार्ता समजली. शिरवळ हातचे गेल्याने डिवचल्या गेलेल्या फतहखानाने खळद-बेलसरच्या विजयोन्मादामध्ये थेट पुरंदरवर स्वारी केली आणि इथेच फतहखान चुकला. बलदंड पुरंदर व महाराजांचे सामर्थ्य कमी लेखण्याची अक्षम्य चूक फतहखानाने केली. पुरंदरच्या लढ्यात महाराजांनी अतुलनीय पराक्रम करून क्षात्रधर्माची शर्थ केली. पुरंदरच्या पायथ्याशी झालेल्या लढ्यात निकराचा प्रतिकार करणाऱ्या मुसेखानाला गोदाजी जगतापाने ठार केले आणि आदिलशाही सैन्य धीर खचून सैरावैरा पळू लागले. आदिलशाही सेनापती फतहखानही आदिलशाही सैन्याचे मनोधैर्य उंचवू शकला नाही व पुरंदरच्या लढ्यात आदिलशाही फौजेचा संपूर्ण पराभव झाला. दारूण पराभवाच्या अकल्पित धक्क्याने फतहखानास विजापुरास परतावे लागले. बंगरूळ सुभ्यातही मुस्तफाखानाच्या नामजाद सरदारांचा दणदणीत पराभव संभाजीराजांनी केला. शहाजीराजांचे दोन्ही परमप्रतापी पुत्र युद्धाच्या वाडनावलातून विजयलक्ष्मीची माळ कंठात घालून  वर आले. शिवरायांनी पुरंदरवर फतहखानाचा दणदणीत पराभव करून भारतवर्षाची दशा-दिशा बदलण्याच्या दिशेने पाऊल टाकले असले तरी शिवबांच्या विजयाने आदिलशाही कैदेत असलेले शहाजीराजे मृत्युदाढेत लोटले जातात की काय ह्या चिंतेने स्वराज्यास ग्रासले होते. युद्धपटलावर यवनी भस्मासुराचा पराभव करणाऱ्या महाराजांची आता राजकारणाच्या संग्रामपटलावर खरी कसोटी लागणार होती.

जय भवानी !!!! जय शिवराय !!!!

चैतन्य देशपांडे
शिवशौर्य प्रतिष्ठान,
अमरावती.

No comments:

Post a Comment