नभ मेघांनी आक्रामिले......!!!
अंधकाराच्या
अनुभवाशिवाय प्रकाशाचे मूल्य समजणे शक्य नाही,काळरात्री अन्यायाच्या अनुभूतीविना मंगलमय
स्वतंत्रतेच्या दिवसाचे महत्व कळणे अशक्यप्राय आहे. ७-८ शतकांच्या गुलामगिरीतील
पाशवी अत्याचारांचा दुर्दैवी हिशोब मांडूनच शिवछत्रपतींच्या प्रकाशरूपी
धर्मकार्याचे मोल आपण समजू शकू. यवनांचा निपाःत करून पावनपर्वाचा नवीन अध्याय सुरु
करण्यासाठी महाराजांनी यवनांसाठी रचलेल्या रौद्रभैरवाच्या तांडवसंगीताचा निनाद
आपल्याला मनःचक्षुंच्या तेजपटलात सामावून घ्यायचा आहे.
महाभारतात
धर्म-अधर्म,नीती-अनीती,कर्म-कुकर्म इ. खल तपशीलवारपणे आला आहे.
आयुष्याच्या असंख्य परीस्थितींशी अजाण मनुष्याला संपूर्णपणे अवगत करून देणारे ते एक
महाकाव्य आहे. महाभारतात भगवतगीतेची रचना करून युगंधर श्रीकृष्णाने अवघ्या
विश्वाचे विचारसारथ्य केले आहे. अधर्मी कौरवांचे द्रौपदी वस्त्रहरणाचे राक्षसकृत्य
भीष्म पितामहांसारख्या दिग्विजयी पुरुषाने वचनांच्या जोखडात स्वतःला बांधून घेऊन
उघड्या डोळ्यांनी पहिले, नुसते बघितलेच नव्हे तर फक्त
प्रतीज्ञापालनासाठी कुरुक्षेत्रच्या धर्मयुद्धात अधर्मी कौरवांची कास धरली. तर
दुसरीकडे युगंधर श्रीकृष्णाने राष्ट्रहिताखातर व धर्माच्या संरक्षणासाठी मान-अपमान,
नीती-अनीती व सत्य-असत्याचे सारे बंध मोडून अनेक श्रापांचे बोझे
आपल्या अंगावर घेतले. बोध इतकाच की फक्त प्रतिज्ञारक्षणासाठी अधर्माचा साथ देणारे
आत्मकेंद्री भीष्म होऊ नका तर नीती व असत्याचे सारे पाश तोडून दोषाचे सारे बोझे
धर्मरक्षणास सर्वोच्च मानून विश्वकल्याणासाठी आपल्या शिरी घेणारा श्रीकृष्ण व्हा. ”प्राण जाय पर वचन ना जाय” हे शाश्वत सत्य असले तरी
धर्म व राष्ट्राहितासमोर वचन, नीती, प्रतिज्ञा
हे सर्व गौण आहे हा विचार आपल्या मस्तकी धारण करा. देव, देश
अन धर्माच्या संरक्षणासाठी कृष्णाने सांगितलेल्या कृष्णनीतीचा अवलंब करा.
इ.स. ७ मार्च १६४७ रोजी महाराजांचा भरभक्कम आधार
असलेल्या दादोजी कोंडदेवांचा मृत्यू झाला आणि स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी
छत्रपतींच्या अंगावर पडली. स्वराज्याचे शिवधनुष्य स्वतःच्या खांद्यावर समर्थपणे
तोलायचे आव्हानच शिवछत्रपतींसमोर दत्त म्हणून उभे ठाकले. दादोजींचा मृत्यू शिवाजी
महाराजांसाठी मानसिक व्यथेबरोबरच स्वराज्याच्या दृष्टीनेही चिंता उत्पन्न करणारा
ठरला. इ.स.१६३७ मध्ये शहाजीराजांना आदिलशाहकडून पुणे, सुपे,
इंदापूर, चाकण व बारा मावळ असा प्रदेश जहागीर
म्हणून मिळाला. जहागीरीची व्यवस्था सुरळीतपणे चालण्यासाठी आणि न्यायनिष्ठीत
व्यवस्थेचा चोख अंमल बसवण्यासाठी शहाजीराजांनी प्रत्येक परगण्यात स्वतंत्र अंमलदार
नियुक्त केले होते. पुणे महालाचे दादोजी कोंडदेव मुख्य अंमलदार होते, तसेच काही पोट अंमलदारही शहाजीराजांनी जहागिरीवर व्यवस्थेसाठी नियुक्त
केले होते. पुणे परगण्यात एकूण २८८ गावे होती व व्यवस्थेसाठी परगणा ७ तर्फात
विभागला होता. कर्यात मावळ तर्फेत एकूण ३६ गावे असून कर्यात मावळची मोकासदारी
शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना दिली होती. सांडस खुर्द तर्फेतील २० गावांची
मोकासदारी शहाजीराजांचे चुलतबंधू मंबाजीराजे भोसले ह्यांच्याकडे होती, उर्वरित सर्व ५ तर्फांचा (सुमारे २३२ गावे) अधिकार दादोजी कोंडदेवांकडे होता.
सुपे परगणा संभाजी मोहित्यांकडे होता आणि आणि इंदापूरची मोकासदारी दस्तुरखुद्द
महाराजांकडे इ.स.१६४६ साली आली. बारा मावळच्या काही भागाची व्यवस्था ठाणे शिरवळ
येथून तर उर्वरित बहुतांश भागाची व्यवस्था किल्ले कोंढाणा वरून केली जाई.
दादोजी कोंडदेव हे जसे शहाजीराजांच्या संपूर्ण
जहागीरीची देखरेख करणारे खासगी कारभारी होते, तसेच
आदिलशाहतर्फे किल्ले कोंढाण्याचे व महालांचे मसुरल हजरती (राजमान्य) सुभेदार होते.
शहाजीराजांचे खासगी कारभारी तसेच आदिलशाहचे राजमान्य सुभेदार अशी दुहेरी जबाबदारी
दादोजींच्या खांद्यावर होती. संपूर्ण जहागिरीचा बंदोबस्त कोंढाणा किल्ल्यावरून
केला जात असल्यामुळे कोंढाण्याचे नामजाद सुभेदार म्हणून दादोजी हे संपूर्ण
जहागिरीचे मुख्य अंमलदार होते. दादोजींचा दुहेरी अधिकार लक्षात घेता दादोजी हयात
असताना पुणे जहागिरीत शिवाजी महाराजांनी त्यांच्यामार्फत अनेक अप्रत्यक्ष हालचाली
केल्या. महाराजांच्या हालचालीबाबत कधी शंका उद्भवलीच तर “सरकारी
बंदोबस्तासाठी” अमुक गोष्ट केली असे अधिकृत कारभारीपणाच्या
अधिकाराने दादोजी आदिलशाही दरबारात सांगू शकत होते. दादोजींच्या मृत्यूने
त्यांच्या मुख्य अंमलदाराच्या अधिकाराआडून स्वराज्यकार्य करणे अशक्य झाले .दादोजींच्या
मृत्यूनंतर आदिलशाह कोंढाण्याच्या सुभेदारीवर कोणाची नियुक्ती करेल व तो
स्वराज्यकार्याचा शत्रू असेल की मित्र ह्याची शाश्वती नसल्याने दादोजींचा मृत्यू
स्वराज्याच्या दृष्टीने अहितकारक ठरणार होता. हिंदवी स्वराज्याचे कार्य आता आदिलशाहशी
उघडपणे शत्रुत्व घेऊन करणे आता क्रमप्राप्त झाले होते. दादोजींच्या मृत्यूसमयी
छत्रपतींच्या ताब्यात असलेला मुलुख खालीलप्रमाणे होता.
१) पुणे परगण्यातील कर्यात मावळच्या ३६ गावांचा पोटमोकासा व
खेडेबारे.
२) सुपे परगण्यातील बारकार्डीयाची
लोणी व पणदरे या गावांचा मोकासा.
३)
इंदापूर परगण्यासोबतच रोहिडा, तोरणा, राजगड,
कुवारीगड इ. हे त्या भागातील किल्ले दादोजींच्या मृत्यूपूर्वीच
महाराजांनी शिरवळचे आदिलशाहचे ठाणे उडवून लावले आणि तेथील सुभानमंगळ किल्ला आपल्या
ताब्यात घेतला. बारा मावळच्या काही भागाचा कारभार शिरवळ ठाण्यावरून चाले त्यामुळे
शिरवळ ठाणे महाराजांच्या ताब्यात असणे अपरिहार्य होते.
दादोजींच्या मृत्यूनंतर शहाजीराजांनी शिवाजी
महाराजांना जहागिरीचा वहिवटदार म्हणून नियुक्त केले. आदिलशाहने कोंढाण्याचा नवा
नामजाद सुभेदार नियुक्त केला नसला तरी शिवाजी महाराजांच्या २-३ वर्षांच्या हालचालीकडे
बघून तो स्वराज्यकार्यास जाचक ठरणार हे उघड होते. स्वराज्यावर येणाऱ्या संकटांचा
माग घेऊन महाराजांनी शहाजीराजांचा वहिवटदार म्हणून पुणे जहागीरीची सर्व सूत्रे
हातात घेतली आणि विद्युतवेगाने स्वराज्यकार्यास आरंभ केला. जहागिरीचा संपूर्ण
खजिना आपल्या ताब्यात घेऊन आपला शस्त्रसाठा सुसज्ज केला. सैन्यसंचणी करून घोडदळ व
पायदळ अधिक मजबूत केले. शहाजीराजांकडून संपूर्ण कारभाराचा अधिकार मिळाला तरी
कोंढाणा ताब्यात घेतल्याशिवाय संपूर्ण मुलुखावर महाराजांची सत्ता प्रस्थापित होणे
अशक्य होते, पण कोंढाणा ताब्यात घेणे म्हणजे आदिलशाहशी
उघडपणे शत्रुत्व पत्करणे असा अर्थ होता. त्यामुळे शिवाजी महाराजांनी कोंढाणा
ताब्यात घेण्यासाठी अनुकूल परिस्थितीची वाट बघायचे ठरवले. शिवाजी महाराजांच्या
स्वराज्यशक्तीस बळकट करायच्या हालचाली सुरु असतानाच मिया रहिम अहमद यास आदिलशाहने
कोंढाण्याचा नामजाद सुभेदार म्हणून नियुक्त केले .ह्याच मिया अहमदचा पराभव करून
दादोजींच्या मृत्यूपूर्वी महाराजांनी शिरवळचे ठाणे काबीज केले होते. सुडाग्नीने
पेटलेल्या मिया अहमदने कोंढाण्यावर पोहोचून स्थिरस्थावर होताच हात-पाय पसरायला
सुरुवात केली. शिरवळचे ठाणे परत त्याने आपल्या ताब्यात घेतले आणि स्वराज्यकार्यास
ठिकठिकाणी अडथळे आणून स्वराज्यास प्रखर विरोध सुरु केला.
इ.स.१६४५ पासूनच शहाजीराजे कर्नाटकात होते. खानखानान,
नवाब मुस्तफाखान अशा आदिलशाहच्या मातब्बर सरदारांच्या नेतृत्वाखाली
दक्षिणेतील हिंदू संस्थानिकांविरुद्ध आदिलशाहने मोहिम उघडली होती. आदिलशाहची
प्रकृती बिघडल्याने इ.स.१६४७ च्या सुमारास मुस्तफाखान विजापुरास येऊन दाखल झाला. मुस्तफाखान
फौजेसह विजापुरी असतानाच मिया रहिम अहमदची कोंढाण्याचा सुभेदार म्हणून नियुक्ती
झाली. नवाब मुस्तफाखान हा शहाजीराजांचा द्वेष्टा होता आणि तो फौजेसह विजापूर दरबारी
हजर असल्यानेच महाराजांनी काहीसे नरमाईचे धोरण स्वीकारले व जहागीरीची व्यवस्था
लावण्यात तसेच स्वराज्याची धन व सैन्यशक्ती गुप्तपणे वाढवण्यात ते मग्न झाले. इ.स.१६४७
च्या उत्तरार्धात पुन्हा कर्नाटकातून अस्वस्थ करणाऱ्या बातम्या येऊ लागल्या,
त्यामुळे इ.स.१६४८ च्या जानेवारी महिन्यात मुस्तफाखान परत कर्नाटकात
रवाना झाला. मुस्ताफाखानाने जादा कुमकेची मागणी केल्याने पाठोपाठ खवासखान, खानजमान, अफझलखान इ. असे मातब्बर सरदार फौजफाट्यासह
कर्नाटकात रवाना झाले. आदिलशाहची मोठी फौज कर्नाटकात गुंतल्याने स्वराज्यावरील
दबाव कमी झाला. डोईजड होत चाललेल्या अहमदचा बंदोबस्त करण्याची पक्की खुणगाठ
महाराजांनी बांधली आणि कोंढाणा ताब्यात घेण्याची जबाबदारी पुणे परगण्याचे हवालदार
बापुजी मुद्गल देशपांडे ह्यांच्यावर सोपवली. कोंढाण्याचा हवालदार सिद्दी अंबर वहाब
हा शहाजीराजांच्या मर्जीतील असल्यामुळे बापूजींना कोंढाणा जिंकण्यासाठी युद्ध
करावे लागले नाही आणि इ.स. मार्च १६४८ मध्ये कोंढाणा स्वराज्यात दाखल झाला. कोंढाणा
घेतला ह्याचा अर्थ शिवाजी महाराजांनी इतके दिवसांची गुप्ततेची झूल झुगारून आता
उघडपणे हिंदवी स्वराज्याच्या दैवी कार्यास सुरुवात केली. कोंढाणा ताब्यात
घेतल्याने आदिलशाह भयंकर चिडला आणि शिवछत्रपतींचे हिंदवी स्वराज्यस्वप्नाचे उद्योग
चिरडण्याच्या राक्षसी लालसेने त्याने महाराजांचा बंदोबस्त करण्याच्या मोहिमेवर
फतहखान खुदावंतखानाची नेमणूक केली. इ.स. ऑगस्ट १६४८ मध्ये फतहखानाने स्वराज्यावर
मोहिमेची भरभक्कम तयारी युद्धस्तरावर सुरु केली. फतहखानाचे आक्रमण स्वराज्यावर
सुरु होण्याआधीच महाराजांनी शिरवळचे ठाणे पुन्हा काबीज केले.फतहखानाला
स्वराज्याबाहेरच रोखून ठोकायचे धोरण शिवाजी महाराजांनी अवलंबायचे ठरवले. फतहखानाला
स्वराज्याबाहेरच रोखून शह देण्यासाठी पुरंदरची निवड शिवछत्रपतींनी केली. पुणे
परगण्याच्या आग्नेयेस असलेला पुरंदर हिंदवी स्वराज्यास पाठीशी घेऊन बलदंड
भीमसेनाप्रमाणे यवनी दैत्यांच्या तोंडाशी उभा होता. पुरंदर किल्ल्याच्या आधाराने
आदिलशाही आक्रमणाचा सामना करायचा निर्धार करून पुरंदर ताब्यात घेण्यासाठी इ.स.१६४८
च्या पावसाळ्यामध्ये महाराजांनी चपळाईने हालचाली सुरु केल्या. पुरंदर ताब्यात
घेण्याचे राजकारण शिवछत्रपती करत असतानाच कर्नाटकातून धरणीकंप करणारी बातमी
स्वराज्यात येऊन थडकली. फितव्याच्या आरोपावरून वजीर मुस्तफाखानाने कर्नाटकात
पोहोचताच शहाजीराजांना कैद केले. स्वराज्यावर फतहखानाचे राक्षसी आक्रमण व
शहाजीराजांची कैद अशा दुहेरी कात्रीत शिवाजीराजे अडकले. जणू काळच शिवाजी
महाराजांच्या कर्तुत्वाची परीक्षा घेण्यासाठी उतावीळ झाला होता. १७-१८ वर्षांच्या
वयात महाराजांच्या अंगावर संकटांचा पाऊस सुरु झाला. हिंदवी स्वराज्याचे नभ
चहुबाजूने आक्रमणाच्या मेघाने झाकोळून गेले.साऱ्या संकटांचा पराभव करून भोसले
कुळाचा क्रांतीसूर्य शिवाजी दिग्विजयी होऊन परमतेजाने तळपणार की फक्त आयुष्याच्या
लढाईत नव्हे तर इतिहासात पराभवाच्या गर्तेने तो कुळासहित कायमचा नामशेष होणार असे
कोडे साक्षात नियतीलाही पडले आणि यमदेवांच्या यवनरुपी मृत्युदुतांशी छत्रपतींचा
निकराचा लढा सुरु झाला.
जय
भवानी !!!! जय शिवराय !!!!
चैतन्य
देशपांडे
शिवशौर्य
प्रतिष्ठान,
अमरावती.
Apratim...kharach utkantha shigela pohchali ki pudhe ky honar mhanun..sundar lihlay agdi...
ReplyDelete