Thursday, 23 June 2016

पादशाही जलंधराचे दुःस्वप्न...



पादशाही जलंधराचे दुःस्वप्न...

       इतिहास हा शब्द कानी पडताच अनेकांची माथी चक्रीप्रमाणे रिंगण घेऊन गरगरू लागतात. अध्ययनाच्या नावाखाली वाट्यास आलेले इतिहास नावाचे रुक्ष वन कधी एकदाचे पार करतो अशी हुरहूर अनेकांस लागते. सनाच्या गणितात गुंतलेला इतिहास निर्जीव, मुर्दाड व विरस आहे असा समज अनेकांच्या मनात घर करून बसतो. काय आहे इतिहासाचे शाश्वत सत्य???? खरच तो निर्जीव व निरुपयोगी आहे की काळावर विजय मिळवलेला चिरंजीव, अंतर्यामी व ऋषितुल्य कर्मयोगी आहे???? इतिहास व मनुष्याच्या मर्मबंधाला खरच सत्य व ज्ञानाची कास आहे की नुसत्या बनावी फसवेगिरीची???? इतिहास हा त्याच्या अनुभवाच्या शिदोरीतून विश्वकल्याणाच्या दुर्घट पुण्यपथाचे दिशादर्शन करणारा वाटाड्या आहे की आमच्या वंदनीय मातोश्रींच्या शब्दात गडेमूडदे उखडण्यापुरतेच त्याचे महत्व सीमित आहे????
       वरील प्रश्नांच्या सरबत्तीमुळे इतिहास नावाच्या जीतेन्द्रीयावर विचारांचे शक्तीचक्र आपःसूकच सुरु होते व प्रश्नांच्या समर्पक उत्तरांचे मंत्रबोल आत्म्याचे भावनाविश्व दणाणून सोडतात. इतिहास हा आत्मा सोडून गेलेल्या शरीराप्रमाणे निर्जीव व मुर्दाड नाही तर भूतकाळात घडलेल्या नानाविध घटनांतून आयुष्याच्या दासबोध शिकवणारा चिरंजीवी आहे. सकळसुखी भविष्याचा वेध हा आपण इतिहास नावाच्यादेवदत्तावरस्वार होऊन  भूतकाळाच्या अनुभवविश्वात त्यास चौफेर उधळून घडलेल्या घटनांचा तार्किक अभ्यास करूनच घेऊ शकू. इतिहास नावाच्या अज्ञात व्यक्तीच्या अदृश्य पण डोळस दृष्टीने जे जे मानवी इतिहासाच्या घटनाक्रमांचे गाथापटल समजले व उमजले आहे तेच गाथापटल अनेकांना मात्र आज सरळ डोळ्यांनीसुद्धा दिसत नाही हीच खरी खंत आहे. आत्म्यास परमज्ञान व पूर्णत्व देण्याची अभिलाषा मनी धरून असाल तर इतिहास नावाच्या कल्पवृक्षाचा आधार घ्या. इतिहासाला आपल्या गुरुस्थानी मानून ह्या अंतर्यामी व सर्वज्ञ गुरुकडून नीती, न्याय, प्रेरणा, धर्म, ज्ञान, सत्य, साहस, मनोबल, दया, शील, करुणा व समग्र विश्वकल्याणाचा पाठ त्याच्या अंतर्मनाचा अभ्यास करून आपल्या मनःचक्षुंच्या तेजपटलात सामावून घ्या. आयुष्याच्या समग्र कल्याणाची वाट चोखंदळतांना इतिहासाच्या अनुभवाचा परीस सदैव आपल्या सहवासात असू द्या. इतिहासाचे दुधारी शस्त्र हाती घेऊन चालताना मात्र आपली वाटचाल अंधकाराचे मृत्यूदूत असलेल्या राक्षसी अवगुणांकडे न होता देवत्व प्रदान करणाऱ्या सात्विक गुणांच्या दिशेने व्हावी ह्याचे भान असू द्या.
       भल्याभल्यांना राजकारणाच्या गळफासात अडकवेल असा चतुर डाव शिवछत्रपतींनी खेळून मोगलांशी आदिलशाहीविरुद्ध बोलणी लावली आणि त्याचा यथोचित परिणाम होऊन शिरावर मृत्यूदंडाचे संकट घोंघावत असलेल्या शहाजीराजांची आदिलशाही कैदेतून इ.स.१६ मे १६४९ रोजी सुखरूप सुटका झाली. फतहखानाचे रूप घेऊन आलेल्या यवनी आदिलशाही आक्रमणाचा संग्रामाच्या द्वंदयुद्धात पराभव करून तसेच राजकारणाच्या मायावी शीतयुद्धातही शहाजीराजांच्या सुटकेने महाराजांनी आदिलशाहीला शक्ती व युक्तीच्या दोन्ही आघाड्यांवर चारीमुंड्या चीत केले. शहाजीराजांच्या सुटकेखातर मात्र कोंढाण्यासारख्या दिग्विजयी दुर्गावर पाणी सोडावे लागल्याने महाराज काहीसे नाराज झाले. शहाजीराजे कर्नाटकात बेसावध राहून कैद झाले व त्यांच्या सुटकेसाठी कोंढाणा आदिलशाहच्या गळ्यात बांधावा लागला ही व्यथा महाराजांनी सोनापंत डबीरांजवळ बोलून दाखवली. आयुष्यात अनेक चढ-उतार व उन्हाळे-पावसाळे अनुभवलेल्या सोनोपंतांनी महाराजांची यथार्थ समजूत घातली व शिवछत्रपतींमध्ये पुन्हा नवचेतनेचा संचार होऊन महाराज जोमाने स्वराज्यकार्यास लागले.
       शहाजीराजांच्या सुखरूप सुटकेमुळे आदिलशाही दरबारातील शहाजीविरोधी पक्ष वनातील वणव्याच्या हलकल्लोळाप्रमाणे पेटून उठला असला तरीही नवाब मुस्तफाखानाच्या मृत्यूने हा पक्ष दुर्बळ झाला होता. त्यातच कर्नाटक स्वारीची संपूर्ण जबाबदारी आदिलशाहने खानमहम्मदावर सोपवल्याने आदिलशाही दरबारात खानमहम्मदाच्या पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित झाले. नैसर्गिकपणे आपल्या विरोधी पक्षाच्या सरदारांचा समर्थपणे सामना करण्यासाठी शहाजीराजांनी खानमहम्मद्च्या पक्षाची कास धरली. शहाजीराजे खानमहम्मद पक्षाचे अविभाज्य घटक झाल्याने अनेक शहाजीविरोधी सरदार अनुकूल काळाची वाट पाहत बसले. स्वतःला अजिंक्य व अभेद्य समजणाऱ्या अहंकारी अफझलखानाला मात्र स्वस्थ बसणे कदापि मंजूर नव्हते. हातावर हात देऊन बसणे म्हणजे शहाजीविरुद्ध शिकस्त खाल्ल्याची पावती आहे असे मानून अफझलने तडफेने स्वराज्यविरोधी कारवाया सुरु केल्या. अफझलखान नावाचा साडेसातीचा शनी स्वराज्याच्या शाश्वत कुंडलीत धुमाकूळ घालण्याचा व अडथळे निर्माण करण्याचा वारेमाप प्रयत्न करू लागला.इ.स.१६४९ मध्ये शहाजीराजांच्या सुटकेनंतर थोड्या कालावधीतच जावळीच्या परिसरात अफझलखानाने त्वेषाने स्वराज्यविरोधी कारवाया सुरु केल्या.
       इ.स.१६४७ मध्ये जावळीचा दत्तक चंद्रराव मोरे हा महाराजांच्या समर्थ पाठींब्याने समग्र जावळीचा अधिपती झाला. इ.स. जून १६४९ मध्ये वाई परगण्याचा मोकासा अफझलखानाकडे आल्यामुळे वाई परगण्यात अफझलखानाने हात-पाय पसरायला सुरुवात केली व अफझलखानच्या अफझलगिरीचा प्रत्यय समस्तास येऊ लागला. वाई परगण्यातील काही गावे इ.स. १६३७ पासूनच शहाजीराजांच्या नावे होती. वर्धिष्णू हिंदवी स्वराज्याच्या सीमाही वाई प्रांतास लागून असल्यामुळे अफझलखान हा स्वराज्याच्या उत्तरोत्तर उन्नतीमध्ये मोठा अडसर ठरणार हे उघड होते. काहीही करून शहाजी व त्याच्या पिलावळीला ठेचायची विकृत मानसिकता बनवून बसलेल्या अफझलखानाने इ.स.१६४९ मध्ये वाई प्रांताचा कारभार हाती घेताच महाराजांनी जावळीच्या गादीवर  केलेली चंद्रराव मोऱ्यांची स्थापना अवैध ठरवली. हिंदवी स्वराज्याच्या निर्वेध अश्वमेध रोखून त्यास पुन्हा गुलामीच्या दावणीस बांधायच्या दिशेनेच अफझलखानाचे हे एक पाऊल होते. इ.स. जुलै १६४९ मध्ये कान्होजी नाईक जेध्यांना पत्र लिहून जावळी गैर लोकांनी बळकावली असा कांगावा करत चंद्ररावला हटवण्यासाठी अफझलखानाने जेध्यांकडे सैनिकी मदत मागितली. कान्होजी जेधे हे नुकतेच शहाजीराजांसमवेत आदिलशाहच्या कैदरुपी मृत्यूदाढेतून सुटून आले होते. कान्होजी जेधे हे शहाजीराजांचे निष्ठावान सेवक व भोसले कुळाच्या कल्पवृक्षाचे बळकट आधार होते. भोसले कुळाच्या ह्या बळकट आधारासच धर्मसंकटाच्या मायावी व क्रूर बाहुपाशात अडकवून येनकेन प्रकारे स्वराज्य समूळ नष्ट करण्याचा खानाचा कपटी डाव होता. नाईक व महाराजांत फुट पाडून नाईकांचा स्वराज्यविरोधी कारवायांमध्ये बुद्धिबळाच्या सोंगटीप्रमाणे प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने खानाने फासे टाकण्यास सुरुवात केली. खानाची आज्ञा पाळावी तर महाराजांस दुखावणे भाग पडते व न पाळावी तर पुन्हा आदिलशाहीशी वैर पत्करण्याचा धोका अशा दुहेरी कात्रीत कान्होजीबाबा सापडले. अखेर गळफास बनू पाहणाऱ्या ह्या गुंत्याचा उकल करण्यासाठी कान्होजीबाबांनी थेट छत्रपतींना पत्र लिहून साकडे घातले. कान्होजी नाईक जेध्यांची होणारी अडचण व कुचंबणा शिवछत्रपतींनी अतिशय धोरणीपणाने व समंजस प्रवृत्तीचे दर्शन घडवून समजावून घेतली. नाईकांना आधार देत बिनबाभोट सहकार्याचा आव आणण्याचा सल्ला महाराजांनी दिला. नाईकांच्या खानासोबत राजकारणी हालचालींनी त्यांच्यावर खफामर्जी होणार नाही असा धीरही दिला. महाराजांच्या मार्मिक व चतुरस्त्र राजकारणी उत्तरावरून कान्होजीबाबा नाईक काय उमजायचे ते उमगले व नाईकांनी महाराजांच्या सल्ल्यानुसार आपला हेजीब आबाजीपंतास अफझलखानाकडे वाटाघाटीकरिता पाठवले तसेच त्याससशर्तसहकार्य देण्याचे कबूल केले. नाईकांना फितवण्यासाठी खानाने जौहर खोऱ्याचा मोकासा कान्होजीबाबांना इनाम म्हणून देण्याचे घोषित केले व नाईकांनीही तो स्वीकारून खानाच्या कपटी डावाभोवती गोंधळाचे राजकारणी मंडल घालण्यास सुरुवात केली. चंद्रराव मोऱ्याविरुद्ध सहकार्य करण्यासाठी कान्होजी नाईकांनी अफझलखानासमोर खालीलप्रमाणे ३ अटी मांडल्या.
१) हणमंतराव मोऱ्याने बळकावलेले जोहर खोरे मी काबीज करून देताच ते लगेचच मला मिळाले पाहिजे.
२)जावळीच्या मसलतीत मी भाग घेईन पण मला तिथे २०० लोकांची नायकी मिळाली पाहिजे.
३)हे २०० लोक माझ्या पाटीलकीचे गाव जे वेलंग तेथील ठेवीन.
       पहिल्या २ अटी खानास मंजूर होत्या पण तिसरी अट मान्य करायचे मात्र अफझलखानाने संपूर्णपणे नाकारले. वेलंगऐवजी वाईची खानाशी एकनिष्ठ असलेली माणसेच कान्होजींच्या नायकीखाली असावी अश्या ईर्ष्येने अफझलखानाने कान्होजींकडे तिसरी अट मागे घेण्याचा तगादा लावला. कान्होजींनीही धोरणीपणाने आडमुठी भूमिका घेऊन वृथा कालक्षेप करण्यास सुरुवात केली. कान्होजी व अफझलखान दोघेही आपापल्या भूमिकेवर अडून बसल्याने जावळीवर स्वारी करून स्वराज्याच्या नाकात वेसण घालण्याचे अफझलखानाचे स्वप्नगाडे हळूहळू समयचक्राच्या चिखलात रुतु लागले. योजनाबद्धरित्या केलेल्या कालक्षेपामुळे व कर्नाटकाची बिघडलेली परिस्थिती ह्या दोहोंच्या मिश्रणाने शिवछत्रपतींना अपेक्षित असलेला परिणाम प्राप्त झाला आणि जावळीस्वारीच्या आधीच  अफझलखानाची रवानगी कर्नाटक प्रांतावर झाली. कर्नाटक प्रांतावर रवानगी झाल्याने जावळी प्रांत काबीज करून हिंदवी स्वराज्याचे रोपटे करपून टाकण्याची अफझलखानाची रावणी अभिलाषा धुळीस मिळाली. अफझलखानाच्या रूपाने स्वराज्यावर घाला घालू  पाहणाऱ्या यवनी पादशाही जलंधराचे दुःस्वप्न महाराजांनी वेळकाढूपणाच्या शस्त्राचा प्रभावी वापर करून भंग केले.
       शहाजीराजांच्या सुटकेसाठी ज्या मुरादबक्षाचा हलाहलावरील प्रभावी तोडीप्रमाणे महाराजांनी वापर केला तो मुरादबक्ष महाराज मोगलशाहीत यावे ह्यासाठी धडपडत होता. शहाजीराजांच्या सुटकेसाठी त्याने आदिलशाहास पत्र लिहून आदिलशाहवर दबाव आणला होता, तसेच शहाजीराजांना पत्र लिहून इ.स.१६३७ पूर्वीची जी मोगलांची मनसब शहाजीराजे व संभाजीना देऊ केली गेली होती ती ह्यावेळी पुन्हा द्यायचे वचन दिले. महाराजांशीही त्याचा पत्रव्यवहार सुरु होता. थोडक्यात भोसल्यांना आपल्या पक्षात ओढून आदिलशाहीचा गळा चिरण्याचे गोड स्वप्न मुरादबक्ष दिवसाढवळ्या बघत होता. महाराजांनीही मुरादबक्षची धडपड ओळखून रघुनाथपंत कोरडे ह्यांना मुरादबक्षाकडे वाटाघाटीसाठी पाठवले आणि जुन्नर-अहमदनगरची देशमुखी आपणास मिळावी अशी मागणी केली. १५-१७ वर्षांपूर्वी ह्याच प्रदेशात शहाजीराजांनी अप्रत्यक्ष स्वराज्यनिर्मितीचे प्रयत्न केले होते. मनगटीचे गुलामीचे साखळदंड तोडून सार्वभौमत्वाच्या तलवारीस धार चढवायचा निकराचा प्रयत्न करून बघितला होता. शहाजीराजांच्या दुर्दम्य सामर्थ्याची व अजोड पराक्रमाची साक्ष ठेवून उभा असलेला हा प्रदेश आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्यसीमा विस्तारण्यासाठी ह्या प्रांताची मागणी महाराजांनी मोगलांकडे केली. ह्यावेळी मात्र मुरादबक्षाने ही मागणी दिल्लीला गेल्यावर पुरवू असे मोघम उत्तर देऊन आटोपते घेतले.
       फतहखानाच्या नेतृत्वाखाली स्वराज्यावर झालेल्या पहिल्यावहिल्या आक्रमणाचा रणसंग्रामात संपूर्णपणे पराभव झाला, राजकारणाच्या आकडीने शहाजीराजांची प्राणांत संकटात घालणाऱ्या आदिलशाही कैदेतून सुखरूप सुटका झाली, समस्त भोसले कुळास खाऊ की गिळू करून सदैव पाण्यात बघणाऱ्या जलंधरी अफझलखानाच्या स्वराज्यास तापाचा धोकाही निवळला व मोगलांशी सुरु असलेला राजकारणी पत्रव्यवहारही थंडावला.एकामागोमाग एक अशा संकटांची मालिका काहीशी थंडावल्याने आता महाराजांनी स्वराज्याच्या अंतर्गत व्यवस्थेत लक्ष घालण्यास सुरुवात केली. यौवनाच्या ऐन उमेदीच्या वर्षात संकटांच्या खैबरखिंडीत प्रवेश करणारा शिवाजी तावून-सुलाखून व अनुभवाचा अमूल्य खजिना गाठीशी घेऊन तसेच अजानुबाहूत्वाचे बीज व प्रौढपणाच्या स्थिर विचारशक्तीचे मस्तिष्क घेऊन संकटांच्या खिंडीतून विजयी होऊन बाहेर पडला. हिंदवी स्वराज्याच्या सुवर्णगाथेस आता खऱ्या अर्थाने दैदिप्यमान व ऊर अभिमानाने भरून यावा अशी सरस प्रस्तावना लाभली होती.


जय भवानी !!!!! जय शिवराय !!!!!

चैतन्य देशपांडे
शिवशौर्य प्रतिष्ठान,
अमरावती.

No comments:

Post a Comment