राजकारणाचे मंत्रयुद्ध !!!
अनादि काळापासून सनातन हिंदू
धर्म कोट्याधीकोटी सात्विक मनुष्यांचे उदधीप्रमाणे बेलगाम जीवनप्रवासामध्ये
नभमंडलात ध्रुव ताऱ्याचे रूप घेऊन यथोचित कल्याणाकडे दिशादर्शन करत आला आहे. विश्वकल्याण व
मानवतेची ध्वजपताका मानाने हाती घेऊन ती अवघ्या विश्वात नाचवण्याचे पुण्यकर्म
हिंदू धर्माने अविरत व अखंडितपणे केले आहे. रामायण, महाभारत, सिंधू संस्कृती, सारस्वत संस्कृती, मौर्य संस्कृती इ.
च्या सखोल अभ्यासातून हिंदू धर्माच्या पुरातन वैभवपर्वाचे दर्शन घडते. परिवर्तनशीलता हा
संपूर्ण सृष्टीचा अटल नियम आहे. परिवर्तनशीलतेच्या अभावी अनेकानेक प्रभावी विचारांचा
व संकल्पनांचा लोप झालेला आपल्याला आढळतो. हिंदू धर्माने वेळोवेळी ह्याच परिवर्तनशीलतेचे दर्शन
घडवून धर्मही परिवर्तनाच्या विचारचक्राबाहेर नाही हे सिद्ध केले आहे.
हिंदू धर्म हा
वैभवशाली संस्कृतीचा, आत्म्यास पूर्णत्व देणाऱ्या ब्रह्मग्यानाचा व अखंड कीर्तीचा धनी असला तरी
जातीभेद, कर्मकांड व अवास्तव अंधश्रद्धेसारख्या व्याधींनी काळानुरूप ग्रस्त झाला आहे. समयशक्तीचा
तेजःपुरुष असलेल्या हिंदू धर्मात जातीभेद हे पारतंत्र्याचे बीज आहे. पारतंत्र्याच्या
जातीभेदी बीजाला अनेकदा नवअंकुराची पालवी फुटून मागील १००० वर्षांच्या कालखंडात वेळेवेळी दासत्वाच्या बेड्या हिंदू धर्मियांच्या
हातात पडल्या आहेत. हिंदू धर्माची जननी असलेली भारतमाता परवशतेच्या राहूपाशातून मुक्त झाली पण
हिंदू धर्म मात्र त्याच्या उत्थानाचा ब्रह्मज्ञानी अमृतअर्क असलेल्या रसभरीत फळाला
लागलेली जातीभेदाची कीड समूळपणे नष्ट करू शकला नाही. किंबहुना
जातीपंथातील तेढ व जातीनिहाय अलिप्तपणाची भावना दीडदमडीच्या घाणेरड्या
जातीपातीच्या राजकारणाने म्हणा वा अन्य काही कारणाने स्वतंत्रतेच्या प्रकाशातच
विषवल्लीप्रमाणे वाढीस लागली आहे. पारतंत्र्याचे दुष्टचक्र पुन्हा हिंदूंच्या माथी येऊ
नये म्हणून जातीभेदाचे विषादबीज संपूर्णपणे नष्ट करणे अगत्याचे आहे. यवनी आक्रमणांच्या
इतिहासाचा सखोल अभ्यास करता असे लक्षात येते की ह्याच जातिभेदाच्या विषादबिजामुळे
यवनी परचक्राने दुर्दैवी अत्याचारांचे व गुलामीचे माप आपल्या पदरात टाकले. स्वतंत्रतेसाठी
मृत्यूदेवतेच्या अग्निकुंडात स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या अगणित वीरांचे
पुण्यस्मरण करून संपूर्ण धर्माचे विश्वकल्याणासाठी एकीकरण करण्याच्या मुलमंत्राचे
निष्ठेने पालन करण्याचा निर्धार आपण करूया. जातीभेद नाहीसा करून हिंदूधर्मास पुन्हा विश्वगुरुपदाचा
अभिधीशिक्त अधिपती देवेंद्र बनवण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरु करूया. शिवछत्रपतींच्या
राष्ट्रकार्यास हीच खरीखुरी सलामी ठरेल.
इ.स.१६४८ च्या
ऑक्टोबर महिन्याअखेरीस बलदंड पुरांदरास फतहखान खुदावंतखानाचा दणदणीत पराभव करून
शिवछत्रपतींनी यवनी मृत्यूदुतांविरुद्ध विजयपर्वाचा श्रीगणेशा केला. रणसंग्रामाचे
चक्रव्यूह जिंकून महाराज विजयी झाले असले तरी त्यामुळे आदिलशाही कैदेत असलेल्या
शहाजीराजांवर मृत्यूरुपी चक्रीवादळाचे ढग घोंघावू लागले होते. कर्नाटक मोहिमेवर
नामजाद असलेल्या शहाजीराजांना इ.स.२५ जुलै १६४८ रोजी नवाब मुस्तफाखानाने
फितव्याच्या आरोपावरून वैयतिक वैमनस्य व जळफळाटामुळे दगाबाजीने कैद केले होते. पुरंदरच्या विजयाने
छत्रपतींचा कर्तुत्वसूर्य तेजाने तळपण्यास सुरुवात होता न होताच शहाजीराजांच्या
कैदेने व त्यांच्यावरील प्राणसंकटाने महाराजांच्या कर्तुत्वसुर्यास लगेच ग्रहणाचे
वेध लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. शहाजीराजे कैद झाले तेव्हाच कान्होजीबाबा जेधे, दादाजीपंत लोहकरे व
त्यांचा पुत्र रत्नाजीपंत लोहकरे यांसही आदिलशाहने दस्त करून कनकगिरीच्या
किल्ल्यात कडक बंदोबस्तात ठेवले. शहाजीराजांना कैद करण्याच्या मनसुब्यात शहाजीविरोधी
असलेल्या अफझलखानाने व बाजी घोरपड्याने हिरीरीने साथ दिला. वास्तविकतः मुधोळकर
घोरपडे हे भोसल्यांचे आप्तस्वकीय असले तरीही अनागोंदी व कपलीच्या जहागिरीच्या
तंट्यावरून भोसले व घोरपड्यांमध्ये घोर वितुष्ट आले. बाजी घोरपड्यानी
जुना आकस मनात धरून शहाजीराजांना कैद करण्याच्या कटावात जरासंधी मनोवृत्तीचा परिचय
देऊन यवनी मुस्तफाखानाचा पुढाकार घेऊन साथ दिला व स्वतः शहाजीराजांना जेरबंद करून
मुस्तफाखानासमोर हजर केले. शहाजीराजांना कडक बंदोबस्तात ठेवून मुस्तफाखानाने
जिंजीचा वेढा सुरु ठेवला. पण नियतीचा खेळ कसा अकल्पित असतो बघा, शहाजीराजांना कैद
करून प्राणांत संकटात घालणारा दस्तुरखुद्द मुस्तफाखान स्वतः गंभीर दुखण्याने आजारी
पडला. मुस्तफाखानाचा मृत्यू अटळ आहे अशी बातमी पावताच आदिलशाहने खानमहंमदावर कर्नाटक
मोहिमेची जबाबदारी सोपवून त्यास त्वरेने कर्नाटकास रवाना केले. मृत्यू डोळ्यासमोर
दिसत असला तरीही मुस्तफाखानाची शहाजीराजांविषयीच्या द्वेषाची खुमखुमी अजून जिरली
नव्हती. भोसले कुळाच्या संपूर्ण पतःनाची राक्षसी अभिलाषा पूर्ण करण्यासाठी
शहाजीराजांना विजापुरास बंदोबस्तात नेण्याच्यी जबाबदारी त्याने काळभैरवी दगाबाज
अफझलखानावर सोपवली आणि शहाजीराजांची संपूर्ण मालमत्ता व जीनगी जप्त करण्याच्या
कामगिरीवर खाज्यासरा व मलिक यआतबारखानास नामजाद केले. शहाजीराजांच्या
वकुबाचा, कुळाचा व कार्यांचा संपूर्ण विनाश हीच जणू आपली मृत्युच्या बाहुपाशात
जाण्यापुर्वीची शेवटची इच्छा आहे अशा इर्षेने मुस्तफाखान कामास लागला. भोसले कुळाचा
संपूर्ण विनाश होऊन आपल्या विजयाचा गगनभेदी राक्षसी आनंदचित्कार चोहोबाजूस
निनादणार की कटावाच्या मुंडकटाई राजकारणी संग्रामपटलातुन शहाजीराजे सहीसलामत
सुटणार ह्या मुस्तफाखानाच्या अंतिम प्रश्नाचे उत्तर त्याला काळाने जीवितपणे कधीच
मिळू दिले नाही आणि शहाजीराजांच्या संपूर्ण शक्तीपातासाठी नामजाद केलेली सर्व
सरदार मंडळी मार्गस्थ झालेली असतानाच ७ डिसेंबर १६४८ रोजी नवाब मुस्तफाखान मृत्यू
पावला.
शहाजीराजांचा
लुटलेला सरंजाम ८९ हत्तींवर लादून शहाजीराजांच्या नाचक्कीचा एकही मोका न सोडणाऱ्या
अफझलखानाने शहाजीराजांच्या हातापायात बेड्या ठोकल्या व त्यांची धिंड काढत वाजतगाजत
अफझलखान विजापुरास निघाला. कासवाच्या कवचाप्रमाणे कठोर, आपल्या
विद्युतवेगाने वाऱ्याशी हितगुज करणाऱ्या चित्त्याप्रमाणे चपळ, अवघी वनदाटी गर्जून
टाकणाऱ्या सिंहाच्या सिंहगर्जनेप्रमाणे निर्विवाद व कोपल्यास पराक्रमी गजाप्रमाणे
अजिंक्य अश्या भारतीय क्षात्रतेजाची अफझलखानाने उघडपणे थट्टा मांडली होती. नवरोजचा सण सुरु
असतानाच मार्च १६४९ मध्ये शहाजीराजांच्या जीवनगाथेचा उत्तरार्ध लिहिण्यासाठी
अफझलखान शहाजीराजांना घेऊन विजापुरास येऊन पोहोचला. पायात खोलवर रुतून
बसलेला शहाजी नावाचा काटा आता कायमचा निघून नामशेष होणार अश्या आत्यंतिक आनंदाने
अफझलखान आदिलशाहास समोर गेला. बादशाहने अफझलखानाचे यथोचित स्वागत केले पण
शहाजीराजांची रवानगी “झिंदाने इब्रत” मध्ये करून सर्व
सरदारांस आश्चर्याचा धक्का दिला. पादशाहीच्या काळात राजकीय कैद्याची “झिंदाने इब्रत” मध्ये रवानगी करणे म्हणजे त्यास मृत्युदंड मिळणार
नाही असा सरळ अर्थ होता. शहाजी आता संपला अशी सर्वसाधारण धारणा मनात ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी तो एक
अकल्पित आश्चर्याचा सुखद वा दुखःद धक्का होता. शिवछत्रपतींनी असीम
बुद्धिमत्तेचे व चतुरस्त्र मुत्सद्देगिरीचे दर्शन घडवून मुत्सद्देगिरीच्या
राजकारणी संग्रामपटलावर युद्धपटलाप्रमाणेच आदिलशाहचा धुव्वा उडवून त्यास हा निर्णय
घेण्यास भाग पाडले होते.
फतहखानाचे
स्वराज्यावर आक्रमण होण्याआधीच मुस्तफाखानाने इ.स.जुलै १६४८ मध्ये शहाजीराजांना
जिंजीनजीक कैद केले, त्यामुळे उघड युद्धसंग्राम व राजकारणी हातघाईची लढाई अश्या दोन आघाड्यांवर
तोंड देण्याची वेळ शिवछत्रपतींवर आली. फतहखानाच्या आक्रमणास समर्थपणे तोंड देण्याची जय्यत
तयारी सुरु असतानाच चतुर राजकारणी डाव टाकून महाराजांनी मोगलांशी बोलणी सुरु केली. दक्षिणेचा सुभेदार
शहजादा मुरादबक्षामार्फत शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवछत्रपतींनी थेट मोगल बादशाह
शहाजहानशी बोलणे लावले. युगंधर श्रीकृष्णाच्या मुत्सद्देगिरी व राजनैतिक चतुरस्त्रतेचा आदर्श मनात
ठेवून छत्रपतींनी काट्याने काटा काढायचे धोरण
अवलंबले. शहाजीराजांच्या सुटकेच्या बदल्यात विजापूरकर आदिलशाहीविरुद्ध मोगली चाकरी
करण्याचे आश्वासन मुरादबक्षास देऊन जणू पायाच्या अंगठ्याने अशी गाठ मारली की जी
भल्याभल्यांना हातानेही सोडवणे जमणार नाही. मोगलांशी राजकारणी बोलणी सुरु असतानाच महाराजांनी
फतहखानासारख्या शूर व मातब्बर सरदाराचा पराभव केल्याने शिवाजीचा वापर
आदिलशाहीविरुद्ध परिणामकारक ब्रह्मास्त्र म्हणून होऊ शकतो ह्या शहाजहानच्या
विचारास बळ प्राप्त झाले. इ.स.मार्च १६४९ मध्ये महाराज व मुरादबक्षामध्ये
पत्रव्यवहार होऊन महाराजांनी स्वतःचा वकील मुरादबक्षाकडे वाटाघाटीसाठी पाठवला. मुरादबक्षाने
शहाजहानच्या हुकुमाप्रमाणे महाराजांना पंचहजारी मनसबदारी देण्याची तयारी दाखवली व
पंज्याचे निशाण असलेले पत्रही पाठवले. स्वराज्यावर आक्रमण व शहाजींच्या कैदेने
महाराजांभोवती पराभवाचे व दबावाचे मंडल घालू पाहणाऱ्या आदिलशाहचा कपटी डाव
महाराजांनी समर्थ शक्ती व तरबेज युक्तीचा वापर करून त्याच्यावरच उलटवला. फतहखानाचा पराभव व
महाराजांच्या मदतीने संभाव्य मोगली आक्रमणाचा धोका लक्षात घेता भोसले कुळाच्या
निर्वंशासाठी मुस्तफाखानाने निर्माण केलेल्या वावटळीची धग संपूर्ण आदिलशाहीला
लागल्यावाचून राहणार नाही हे लक्षात आल्यामुळेच आदिलशाहने शहाजीराजांची रवानगी “झिंदाने इब्रत” मध्ये केली. महाराजांच्या अजिंक्य कुटनीतिक बुद्धिमत्तेचे हे एक
उत्तम उदाहरण आहे. आदिलशाहीचा आब राखण्यासाठी शहाजीराजांची बिनशर्त सुटका करण्याऐवजी कंदर्पी, बंगरूळ व कोंढाणा
हे किल्ले मागून शहाजीराजांकडून अटी मंजूर करून घ्यायची जबाबदारी आदिलशाहने
अहमदखानवर सोपवली.
“शीर सलामत तो पगडी
पचास’ ह्या तर्कसंगत न्यायाने कंदर्पी, बंगरूळ व कोंढाणा
आदिलशाहच्या ताब्यात देण्याचे शहाजीराजांनी मान्य केले. कदर्पी व बंगरूळ
आदिलशाहच्या ताब्यात देण्यासाठी संभाजींना तर कोंढाण्यासाठी महाराजांना शहाजीराजांनी
खलिता रवाना केला. किल्ल्यांचा ताबा मिळताच आदिलशाहने शहाजीराजांची सुटका करून त्यांचा पूर्वीचा
मानमरातब त्यांना परत केला. शहाजीराजे आता “महाराज फर्जंद” झाले. फतहखानाचा पराभव, महाराजांची मुत्सद्देगिरी व शहाजीराजांच्या सूटकेने स्वराज्यात हर्षाची लाट
पसरली व जोमाने स्वराज्यकार्य करण्याचा नवउत्साह मावळे-शिलेदारांत संचारला. शिवाजी हा कुणी
१८-१९ वर्षांचा सर्वसामान्य गुंड मस्तवाल पोर नसून अपमान, अहवेलनेचे धनी
असलेल्या हिंदूंना दासत्वाच्या बेड्या तोडून नवचेतनेची सिद्धी देणारा राष्ट्रपुरुष
आहे ह्यावर सामान्य रयतेचा दृढविश्वास बसू लागला. पुरंदरच्या
रणसंग्रामात शत्रूला “दे माय धरणी ठाव” करणाऱ्या
शिवछत्रपतींनी शहाजीराजांच्या सूटकेने राजकारणी मंत्रयुद्धातही आदिलशाहचा पराभव
करून यवनांच्या काळसर्पी विळख्यात असलेल्या भारतवर्षात सार्वभौम शक्तीच्या रूपाने
चंचूप्रवेश केला.
जय भवानी !!!!!!!! जय शिवराय !!!!!!!!
चैतन्य देशपांडे
शिवशौर्य प्रतिष्ठान,
अमरावती.
No comments:
Post a Comment